मार्च १३ २०१०

स्मरणाआडचे कवी-३ (विठ्ठल भगवंत लेंभे)

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी - विठ्ठल भगवंत लेंभे

लक्षात राहावेत, असे नसतीलही; पण काही कवी दुर्लक्षित करण्याजोगेही नसतात. प्रसिद्धीची, लौकिकाची प्रभावळ अशांना लाभत नसली तरी त्यांनी जे काही लिहिलेले असते, त्याची दखल आज ना उद्या थोड्याफार प्रमाणात साहित्यक्षेत्राला घ्यावीच लागते. मान्यतेची पहिली पंगत, पंक्ती या वर्गातील कवींना लाभली नाही तरी ते लिहीतच राहतात... विपुल प्रमाणात. आणि मग आपोआपच त्यांचे स्वतःचे स्थान निर्माण होत जाते.

विठ्ठल भगवंत लेंभे हे कवी असेच होते. फारसे लक्षात न राहणारे; पण दुर्लक्षिण्याजोगेही नव्हेत.  १८५०  साली जन्मलेले लेंभे यांना ७० व्रर्षांचे आयुष्य लाभले. १९२० मध्ये ते हे जग सोडून गेले. त्यांच्या जन्म-मृत्यूची ही वर्षे लक्षात ठेवण्यापेक्षा, ते लोकमान्य टिळकांचे समकालीन होते, एवढे ध्यानात ठेवले तरी पुरे! टिळकांपेक्षा सहा वर्षांनी मोठे इतकेच. समकालीन असण्याबरोबरच टिळकांशी त्यांचे साधर्म्य आणखी एका गोष्टीत होते. लेंभे यांचेही निधन ऑगस्टलाच झाले!

लेंभे यांची कविता छंदोबद्ध, लयबद्ध, कमालीची प्रासादिक आहे. तिच्यातील भाषावैभव वाखाणण्याजोगे आहे. कवितेचे जुने वळण व विचारांचे नवे वळण, हे ठळक वैशिष्टय त्यांच्या कवितेचे सांगता येईल.
बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर यांनी त्यांच्या कवितेचे वर्णन कसे केले होते पाहा -

सारी सुंदर सौम्य गोड रचना देते प्रसादासवे
प्रेमानंद मनी भरोनी, नयनी ही वाहवी आसवे
या गंधर्वपुरात उंच तळपे होवोनी सौदामिनी
सत्ता सदहृदयावरी करितसे ही भूवरी भामिनी

देवी वागतसो जणो, दिसतसे गंभीर राणी जशी
हीचे दर्शन वाचकांस म्हणजे आहे शिराणी जशी
ओजाने करुण, प्रधान रस ही जीवंतसा दाखवी
निर्माता जन जो हिचा निपुण तो आहे कवी हो कवी!

"लेंभे यांची कविता' या छोटेखानी पुस्तकात गोपाळ गोविंद अधिकारी यांनी लेंभे यांचे व्यक्तिचित्र सुबोध भाषेत उभे केले आहे. १९२४ साली अधिकारी यांनीच हे पुस्तक प्रकाशित केले होते. विख्यात कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.

लेंभे यांच्याविषयीची ही माहिती इथे देताना मी अधिकारी यांच्या त्या व्यक्तिचित्राचाच आधार घेतलेला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळच्या तळेगाव ढमढेरे येथे लेंभे यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते काही काळ त्यांचे मामा हरिपंत यांच्याकडे राहायला होता. हरिपंतमामा कीर्तने करीत असत. याच व्यवसायासाठी ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. कीर्तनकाराचा आवाज जसा उत्तम असायला हवा, तसेच प्रसंगी त्याला स्वतंत्रपणे पद लिहिता येणेही गरजेनुसार आवश्यक असे. त्यामुळे हरिपंतमामांना काव्याचा नाद होताच. मामाकडील मुक्कामात लेंभे यांनी रघुवंशाचे काही सर्ग व मोरापंतांच्या आर्या पाठ केल्या होत्या. लेंभे यांची बुद्धिमत्ता व ग्रहणशक्ती पाहून मामाने त्यांना अलंकारशास्त्राची माहिती मराठीतून करून दिली होती. तेव्हापासून कविता करण्याचा छंदच लेंभे यांना जडला. या वेळी त्यांचे वय १२-१३ वर्षांचे असेल-नसेल. मराठी व संस्कृत शिकल्यानंतर इंग्रजी शिकावे, असे लेंभे यांना वाटू लागले. आई-वडिलांनी मग वडीलभाऊ रामचंद्रपंत यांच्याबरोबर त्यांना पुण्याला पाठविले. त्यांचा तिथे सराफीचा व्यवसाय होता. वडीलभावाच्या घरी बुधवार पेठेत ते त्या वेळी राहत असत. गोखल्यांची इंग्रजी शाळा त्या वेळी पुण्यात प्रसिद्ध होती. याच शाळेत लेंभे इंग्रजी शिकू लागले. पण पुढे ही शाळा सोडून ते सरकारी शाळेत दाखल झाले. इंग्रजी शिकत असतानाच ते प्रसंगानुरूप कविता रचू लागले. त्यांच्या या रचना एका मित्राने एके दिवशी सहज म्हणून पाहिल्या. त्या मित्राच्या म्हणण्यानुसार, त्या काव्यात शब्दचमत्कृतीपलीकडे काही जास्त स्तुती करण्यासारख नव्हते! असे असले तरी लेंभे यांच्यावर लहानपणापासूनच भाषा प्रसन्न होती, इतके खरे.

कविता रचण्याच्या लेंभे यांच्या कौशल्यासंदर्भात एक किस्सा सांगितला जातो. इंग्रजी कवितेचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रश्न परीक्षेत आला असता लेंभे यांनी त्या कवितेचे भाषांतरही पद्यातच करून टाकले होते. हे भाषांतर खूपच चांगले झाले असले पाहिजे. कारण त्याबद्दल शिक्षकांनी त्यांची मनमुराद स्तुती केली होती व म्हटले होते, "तू एक चांगला कवी होशील. ' शिक्षकांनी केलेल्या या प्रशंसेमुळे लेंभे यांना मोठे प्रोत्साहन मिळाले.

मॅट्रिकच्या परीक्षेसाठी भरावयाचे पाच रुपये वडीलभावाकडून न मिळाल्याने ते परीक्षेला बसू शकले नाहीत व खूपच निराश होऊन गेले. वडीलभावाच्या घरातील वातावरणही काहीसे गढूळ असल्यामुळे पुण्यात त्यांचे मन रमेनासे झाले. मग ते उरुळी कांचनला काकांकडे राहू लागले. काका तिथे स्टेशनमास्तर होते. तारा घेण्याचा व करण्याचा सराव त्यांनी काकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. पुढे काकांनी आपला शब्द खर्च करून लेंभे यांना तारमास्तरची नोकरी मिळवून दिली. दौंड स्टेशनवर ते ही नोकरी करू लागले. ही नोकरी तीन-चार वर्षे केल्यानंतर काकांच्या मदतीने ते स्टेशनमास्तर बनले. या वेळी त्यांची कर्मभूमी होती पाटस रेल्वे स्टेशन. नोकरीच्या दृष्टीने लेंभे हे आता स्थिरस्थावर झाले होते. इकडे पुण्यातील सराफीचे दुकानही डबघाईलाच आलेले होते. त्यामुळे वडीलभाऊ रामचंद्रपंत यांनी दुकान मोडून लेंभे यांच्याकडे जाण्याचे ठरविले. लेंभे यांना वडीलभावाचा आधार पुन्हा मिळाला. आता मागे तसा कसलाच लळालोंभा नसल्यामुळे लेंभे यांना कवितेवर लक्ष केंद्रित करता आले. "सुरतरंगिणी' या त्यांच्या प्रसिद्ध खंडकाव्याची आखणी व रचना पाटस येथेच झाली असावी, असा अंदाज आहे.

पुढे पाटसहून त्यांची बदली पाकळी (हे गाव कुठे आहे, ते माहीत नाही) येथे झाली. पाकळीहून यादगिरी, यादगिरीहून कात्रज अशी त्यांची बदली होत राहिली. पुढे मुंबई-नागपूर-नारगाव (बोदवड)-धामणगाव अशा त्यांच्या बदल्या झाल्या. दरम्यानच्या काळात वडील, वडीलभाऊ अशी त्यांची जवळची माणसे निवर्तली. काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या. धामणगावहून ते जबलपूरजवळील मीरगंज येथे बदलून गेले. या निसर्गरम्यस्थळी त्यांचे मन रमले. याच ठिकाणी काही उत्तमोत्तम काव्य त्यांच्याकडून लिहून झाली. शंकर गणेश देशपांडे व एकनाथ गणेश भांडारे हे जिवाभावाचे दोन मित्र त्यांना इथेच, याच काळात लाभले. पुढे सावदे-वरणगाव-जेऊर अशा विविध गावी त्यांच्या बदल्या झाल्या. रेल्वेत त्यांनी एकूण ४२ वर्षे नोकरी केली व नंतर तिला त्यांनी रामराम ठोकला व ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात पोस्ट ऑफिसात बसून तारा, पत्रे, अर्ज वगैरे लिहून ते पोटापुरते मिळवीत असत. पुण्यात त्यांनी बरीच स्फुट काव्ये लिहिली. "आनंदकंद' हे काव्य त्यांनी इथेच लिहिले.

लेंभे-देशपांडे-भांडारे या मित्रत्रयीने स्वतःची हस्तलिखित मासिके सहा-सात वर्षे चालविली. देशपांडे यांच्या मासिकाचे नाव "मकरंद', तर लेंभे यांच्या मासिकाचे नाव "मधुकर' होते. भांडारे यांच्या मासिकाचे नाव उपलब्ध नाही. विशेष म्हणजे या तिन्ही मासिकांची परस्परांवर तीव्र टीका चाले!

लेंभे यांनी विपुल कविता लिहिलेली असली तरी त्यांना चांगल्या लोकांची संगती पाहिजे तितकी न मिळाल्यामुळे त्यांच्या एकंदर लिखाणास एकांगीपणा आला असल्याचे मत अधिकारी यांनी नोंदविलेले आहे. नवमतवादी व सुधारणाप्रिय वाङ्मयसेवकांशी लेंभे यांचा संबंध न आल्यामुळे ते ठराविक साच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत. केशवसुत, रेव्हरंड ना. वा. टिळक, माधवानुज, विनायक यांसारख्या प्रख्यात कवींशी लेंभे यांचा स्नेह जडला असता तर त्यांच्या काव्याला काही निराळेच वळण मिळून त्यांचा काव्ये सध्या आहेत, त्यापेक्षाही तेजस्वी उतरली असती, असेही अधिकारी यांचे निरीक्षण आहे. स्त्रियांची बहारदार वर्णने उत्तानस्थितीत न जाता फक्त लेंभे यांनीच रेखाटलेली आहेत, असेही अधिकारी यांनी म्हटले आहे.

पुण्यास आल्यावर लेंभे यांचा परिचय कवी रेंदाळकर ("अजून चालतोचि वाट माळ हा सरेना, विश्रांतिस्थळ कधी यायचे कळेना', ही प्रख्यात कविता लिहिणारे) यांच्याशी झाला. कवी अनंततनय यांच्याकडेही दर रविवारी लेंभे यांची बैठक असायची. रेंदाळकर हे त्या वेळी "करमणूक' या मासिकाचे संपादक असल्याने लेंभे यांची कविता मोठ्या प्रमाणावर तेथे प्रसिद्ध झाली. "आनंदकंद' हे (अपूर्ण) महाकाव्य प्रथम करमणूकमधूनच महाराष्ट्रातील वाचकांपुढे आले.
गोविंदाग्रज, बालकवी या त्यावेळच्या तरुण कविमंडळींशी तोंडओळख असण्यापलीकडे लेंभे यांचा त्यांच्याशी संबंध आला नाही. लेंभे आणखी काही वर्षे जगते तर रेंदाळकरांचे अनुयायी झाल्याखेरीज राहिले नसते, असाही अधिकारी यांचा एक अंदाज होता.

केशवसुत यांच्या "नवा शिपाई' या कवितेवर लेंभे यांनी प्रतिकूल टीकाही केलेली होती! लेंभे यांना साधी भाषा लिहिणे आवडत नसे. मराठी शब्दांबरोबर संस्कृत शब्द ठेवून विचारांप्रमाणे भाषेलाही भारदस्तपणा आणण्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे!! लहानपणी ते मोठाली लांबलचक यमके जुळविण्याच्या भानगडीत पडत; पण पुढे ही यमके जुळविण्याची त्यांची आवड पार नाहीशी झाली होती.  यासंदर्भात लेंभे एका पत्रातून काय म्हणतात पाहा, "" प्रथम अनुप्रास यमकादिकांनी युक्त पद्ये रचण्याची इच्छा होऊन कवी तसे करू पाहतो; परंतु आता मला ते प्रशस्त वाटत नाही. त्याने रामदास, तुकाराम इत्यादी संतकवींप्रमाणे काव्ये रचण्यास सुरवात करावी. आधी अभंग, मग साकी, नंतर दिंडी, पुढे श्लोक (लहान) व शेवटी शार्दूलविक्रीडित, स्रग्धरा इत्यादिकांसारख्या वृत्तांवर श्लोक करावे. तथापि, शेवटी शब्द जुळविलाच पाहिजे. ''

लेंभे यांचा स्वभाव प्रथम प्रथम अगदी भोळा होता. कोणी काही सांगो, त्यावर ते सत्य म्हणून विश्वास ठ
ठेवीत असत. आपल्यासारखेच सर्व जग निष्कपटी आहे, असे त्यांना वाटे. याचा परिणाम मात्र त्यांना भोगावा लागला. त्या वेळेपासून ते फार सावध झाले व व्यवहारात अगदी कसोशीने वागू लागले. त्यांना त्यांच्या नातलगांकडून बराच त्रास झाला असावा, असे त्यांच्या पत्रांवरून दिसते. आपणास सर्वच आयुष्य कष्टमय स्थितीत काढावे लागणार व लागत आहे, असे ते प्रत्येकापाशी म्हणत असत. काही केले तरी आपणास सुख मिळणे नाही, अशी त्यांची जणू खात्रीच होती आणि ते काही खोटेही नव्हते. वयाच्या सत्तरीच्या आसपासही मान हलत आहे, हात थरथरत आहेत, तोंडावाटे धड शब्द निघत नाही, अशा स्थितीत पोस्टातल्या खांबाला टेकून तारा, पत्रे वगैरे अगदी मरेपर्यंत लिहावी, खरडावी लागली, यावरून ते किती दुर्दैवी होते, याची कल्पना यावी!
...............

लेंभे यांच्या कवितेचा नमुना -

आकाशी त्या दाटल्या मेघमाला
एकीएकी वीज देई भयाला
सों सों वाजे, हालवी वायू, झाडी
वेगें मोठे वृक्ष नाना कडाडी
एकाएकी वीज जैशी चकाके
एकाएकी विश्व तेणे लखाखे
एकाएकी दृष्टी जाई दिपोनी
हृत्कंजाचे होउनी जाय पाणी
एकाएकी येउनीया सरारा
वेगें भूतें ठोकिती अंबुधारा
धों धों नादे पर्वती नर्मदा ती
गर्जोनी दे सर्व विश्वास भीती

("सुरतंरगिणी' या खंडकाव्यातील पाचव्या सर्गाचा काही भाग)


 

Post to Feedधन्यवाद !
सहमत
खानसाहेबांशी सहमत
दोघांचेही मनापासून आभार...
या कवींचे देणें ....
सुधीरजींशी सहमत...
आपण हें प्रदीपजींना उद्देशून ...
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.
माहिती

Typing help hide