सप्टेंबर २८ २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)

ह्यासोबत

                    ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # १.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥
पाठभेद...
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे । द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥

श्री.ज्ञानदेवांना "ज्ञानियांचा राजा" का म्हणतात ह्याची झलक हरिपाठातील ह्या पहिल्याच अभंगातून नजरेत भरते. आधुनिक शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास हरिपाठ हा "ज्ञानियांच्या राजांचा" अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक शोधनिबंधच आहे. एखाद्या scientific journal मध्ये जेंव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेंव्हा प्रामुख्याने Abstract, Methods & methodology, results आणि शेवटी conclusion  अशा ४  भागात ढोबळमानाने लिहिलेले असते. ह्या धर्तीवर म्हणायचे झाल्यास अभंग#१ हा ज्ञानदेवांच्या शोधनिबंधातील abstract म्हणायला हरकत नसावी. त्यांचे हे लेखन ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीयलेखनच आहे हे म्हणायला भरपूर वाव आहे. अध्यात्मशास्त्रातील वेद,शास्त्रं,पुराणे ह्या ग्रंथांचे त्यांनी दिलेले संदर्भ आणि नामस्मरणासंबंधी केलेले स्वतःचे अनुभवकथन... 
"ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥"
 हे त्यांचे अनुभव लक्षात घेऊन शेवटी त्यांनी काढलेले अनुमान
"लटिका व्यवहार सर्व हा संसार । वाया येरझार हरीवीण ॥" हेही ज्ञानोत्तर भक्तीची फलश्रुतीच आहे. वरील अनुमान आणि "अहं ब्रह्मास्मि" च्या अनुभूतीतून " ब्रह्म सत्य । जगत् मिथ्या ॥"ही वेदांतांच्या अभ्यासकांनी केलेली गर्जना ह्यात काय फरक आहे? मला तरी काही दिसत नाही.
          "देव"ही संकल्पना मानवी जीवनात कशी अस्तित्वात आली असावी ? सर्वसामान्य माणूस म्हणतो की 'मी' देव मानतो किंवा देव मानत नाही.पण हे दोन्हीही त्याच्या कल्पनेचेच खेळ असतात.वास्तव फार दूर असते. "मी" हा प्रत्येकाच्या ठायी आहेच. परंतु "मी जीव ऐसा करिता संकल्प । प्राणि झाला अल्प देहबुद्धीचा". सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली भिती,वासना ही ह्याचीच फलनिष्पत्ती आहे. सर्वात मूलभूत भिती आहे ती मरणाची आणि लालसा आहे ती जगण्याची.मात्र "किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥ " ही त्याची शोकांतिका आहे.प्राचीन भारतीय ज्ञानी अभ्यासकांनी ह्या "मी"चा आणि मरणाचा विचार केला,चिंतन केले आणि अध्यात्मशास्त्र जन्माला आले असावे. भारतीय ज्ञानवंतांची एक खुबी आहे. त्यांनी अंतिम सत्य तर शोधलेच. पण तेथपर्यंत सर्वसामान्य माणूस कसा पोहचेल हेही पाहिले. अध्यात्मशास्त्रातील स्वतःला आलेली दिव्य अनुभूती इतरांनाही यावी ह्या शुद्ध हेतूनेच त्यांनी देव ही संकल्पना उभी केली असावी.        

            सर्वसामान्य माणसाची देवाबद्दलची कल्पना वेगळी आहे. ज्ञानदेवांनी हरिपाठात मांडलेला विषय लक्षात घेवूनच "देव" ही संकल्पना विचारात घेतली पाहिजे.ज्ञानदेवांनी लिहिलेला "हरिपाठ" हा अध्यात्ममार्गातील साधक, मुमुक्षू ह्यांच्यासाठी आहे. ज्ञानदेवांसारखा 'ज्ञानियांचा राजा' शब्दप्रयोगाबाबतीतही तेवढाच सावध असणार हे मान्य करायलाच हवे. त्याप्रमाणेच आपण त्या शब्दांकडे पाहिले पाहिजे.

'देव' हा शब्द 'दिव्य' ह्या संस्कृत शब्दाच्या अपभ्रंशातून तयार झाला असावा असे मला वाटते. स्वामी अरविंदबाबूही आपल्या लिखाणात divine mother असा शब्दप्रयोग करतात.प्रत्यक्ष सद्गुरू जेंव्हा देवाची ओळख करून देतात आणि त्याच्या स्वरूपाची अनुभूती येते तेंव्हा आपल्या जाणीवेलाही त्या दिव्यत्वाचा स्पर्श होतो. 
अध्यात्मशास्त्राच्या अपेक्षेत देवाची ३ रूपे आहेत.
१. निर्गुण स्वरूप... हे जीवाला सर्वथैव अगम्य आहे.
२‌‌. सगुण रूप...  म्हणजे सच्चिदानंद रूप जे आकळण्याच्या पलीकडे आहे पण प्रतीतीला मात्र येते. ह्या रूपाची तीन पदे आहेत. सत्, चित् आणि आनंद.
समजुतीसाठी जरी तीन पदांचा वेगवेगळा विचार केला तरी प्रत्यक्षात ही पदे वेगळाली नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना वेगळे करताही येणे शक्य नाही.
३. साकार रूप... स्वतः निराकार असूनही अनंत आकार घेण्याचे सामर्थ्य त्याचे ठिकाणी आहे.
       असा हा देव "हृदयात" राहतो असे म्हणतात. मी एका हृदयरोगतज्ञाच्या व्याख्यानाला गेलो असता त्यांनी 'हृदय' ह्या शब्दाची फोड केली होती. ती अशी...
री द य म्हणजे जेथून येते आणि जेथे जाते ते ठिकाण. स्थूल देहाबाबतीत हे पटकन लक्षात येते. शरीरातील रक्त जेथून जाते आणि जेथे परत येते ते हृदय. स्थूल शरीरातील रक्ताप्रमाणे आपल्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्मदेहातील"मी"ह्या स्फुरणाबाबतही असे म्हणता येईल. ते ठिकाण हे शरीरातील हृदयापेक्षा वेगळे आहे. पण हरिपाठात ज्ञानदेव नामजपाच्या अपेक्षेत देवाकडे पाहत आहेत.
"परेहुनि परते घर । तेथे राहू निरंतर ॥
सर्वांचे जे अधिष्ठान । तेचि माझे रूप पूर्ण ॥"
 नामदेवांचा वरील अभंग लक्षात घेतला आणि ज्ञानदेवांचे (नामजपाद्वारे वाणीचा हात धरून) संजीवन समाधीसुखाचे अनुभवकथन पाहिले तर"देवाचिये द्वारी" लक्षात येईल. नामसाधनेला वैखरीपासून सुरूवात होते आणि हळूहळू ह्या नामाला सूक्ष्मता येते आणि ते आतल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेत स्थिर झालेले नाम अंतःकरणाला व्यापणास सुरूवात होते. तेथे नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. साधक स्वप्रयत्नाने येथवर पोचतो. पण पुढे परा वाणीत जप होण्यासाठी एकतर ईश्वरीकृपा तरी हवी किंवा सद्गुरूंनी अनुग्रह केला पाहिजे. सद्गुरू काही काळ ह्याचा अनुभव देतात. मी तर असे म्हणेन की जे संत असा अनुभव साधकाला / शिष्याला देऊ शकतात तेच खरे सद्गुरू! तो अनुभव खरंच दिव्य असतो. सद्गुरू सत्शिष्याला परा वाणीची एक झलक दाखवून साधकाला साधनेची दिशा देतात. देवाच्या दारात नेऊन उभे करण्याचे काम सद्गुरू करतात. पण त्यासाठी आपल्या मनाची कवाडे उघडता आली पाहिजेत. त्यासाठी हवी श्रद्धा! श्रद्धेने जर देवाच्या दारात जीवनातील प्रत्येक क्षण नामाने भरत राहिलो तर "चारी मुक्ति" साधता येणे सोपे आहे. काही ठिकाणी "क्षणभरी" म्हणजे क्षणभर असा अर्थ घेतात. पण  ज्ञानदेवांनीच हरिपाठाच्या २७व्या अभंगात सांगितले आहे,
" सर्वसुख गोडी साही शास्त्री निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥ "
ह्यावरून असे समजायला हरकत नसावी की प्रत्येक क्षण नामाने भरता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाच्याठायी 'उभा' राहा म्हणजे सावध राहा. तसे पाहिले तर ट्रॅफिक हवालदारही नोकरीवर 'उभा' असतो. पण त्याचे अधिक लक्ष असते ते कोणता वाहनचालक नियमभंग करतो आणि मी त्याच्याकडून हप्ता वसूल करतो.देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवानही 'उभा'असतो. पण तो सावध असतो ते शत्रूंकडून काही हमला होणार नाही ह्याची काळजी घेत सीमांचे रक्षण करण्याबाबतीत. भक्तांचे ४ प्रकार गीतेत वर्णनिले आहेत. अर्थार्थी,आर्त,जिज्ञासू आणि ज्ञानी ! ज्ञानदेव 'हरिपाठ' हा जिज्ञासू / मुमुक्षू साधकासाठीच लिहीत आहेत. त्याची तुलना फक्त देशरक्षणासाठी सावध असणाऱ्या जवानाशीच व्हावी असे वाटते. मुमुक्षू साधक जर सावधपणे देवाच्या दारात उभा राहिला तर चारी मुक्ती साधता येतात.
मुक्तीची भाषा फक्त ज्ञानीच करतात. साधेनेची फलश्रुतीच ती आहे. संत मात्र  " न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग देई सदा ॥" हेच मागणे मागतात.  किंवा
"मोक्ष तुमचा देवा । दुर्लभ तो तुम्ही ठेवा ॥ "
हे देवाला ठणकावून सांगतात. जन्ममृत्यूतून सुटण्याची भाषा त्यांची नसते. उलट ते सांगतात,
"का रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावे नाम॥"
समाधिसुखाचीही आस त्यांना नसते. कारण त्यांनी नामसंकीर्तनातून ब्रह्मरसाचे सेवन केले असते.म्हणूनच ते म्हणतात,
"समाधिचे सुख सांडा ओवाळूनी । ऐसा या किर्तनी ब्रह्मरस॥"

मुक्ती ही, काही सर्वसामान्य माणसे समजतात तशी मेल्यावर मिळविण्याची गोष्ट नाही. मेल्यावर जीवाचे काय होते यापेक्षा जीवंतपणीच त्याचे काय झाले पाहिजे याचाच संत अधिक विचार करतात.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी सांगतात,
"मेल्यावरी मोक्ष मिळती । ऐसे जे म्हणती, ते अति मूर्ख ॥"
ह्याचवेळी संतांना अपेक्षित असेलेले मरण कसे असावे?तर ते असावे...
"आपुले मरण पाहिले म्या डोळा। जाहला तो सोहळा अनुपम्य॥" असे!
संतांचा मोक्ष हा उधारीचा नसून रोकडा आहे.ते सांगतात,
"मुखी नाम हाती मोक्ष।ऐसी साक्ष बहुतांसी॥"
नामसंकिर्तनातूनही ही मुक्ती साधता येते. अध्यात्मशास्त्रात सांगितलेल्या मुक्तीचे चार प्रकार आहेत. 
१. सलोकता...
   "मद्भक्ता यत्र गायंति तत्र तिष्ठामि नारद"
२. समीपता... नामधारकाला देवाच्या सान्निध्याने ही मुक्ती लाभते. कारण
"जेणे नाम धरिले कंठी। धावे त्याच्या पाठीपाठी ॥"
३. सरूपता... "प्रभुच्या नामाचा उच्चार व त्याच्या स्वरूपाचे स्मरण" असे नामस्मरण सतत केल्याने 'मी' देह नसून 'ज्ञानरूप,चिद्रूप,चैतन्यरूप आहे' याचा बोध सद्गुरूकृपेने त्याला प्राप्त होतो. ही नामधारकाची सरूपतामुक्ती होय.
४. सायुज्यता...म्हणजे एकरूपता‌. साधक आपल्या आनंदस्वरुपाशी समरस होतो आणि त्याचे मुखी येते,
'ब्रह्मानंदी लागली टाळी । कोण देहाते सांभाळी॥'
देवाच्या दारात नामाने क्षण भरीत राहिले तर मुक्ती मिळणारच. पण हे आहे अंतिम साध्य!
"हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा॥" ज्ञानदेवांच्या ह्या आज्ञेचे "असोनि संसारी जिव्हे वेगु करी" असे पालन केले तर अगणित पुण्यप्राप्ति होते. नामस्मरणाचे अनेक प्रकार आहेत. मला स्वतःला जिव्हेने वेगात घेतलेले नामच अधिक छान वाटते; फलदायी वाटते. जिभेच्या ठायी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रिये वास करतात हे सहज कळते. पण ह्याच जिभेच्या ठायी मन हे गुप्त रुपाने वास करीत असते. मन नामावरून इतरत्र भरकटू लागले की जिभेचा वेग मंदावतो. साधक खरेच सावध असेल तर त्याला हे लगेचच कळते आणि तो पुन्हा जोमाने नामस्मरण करू लागतो. त्याचा आंतरिक प्रवास अधिक सुलभ होतो.  वेदशास्त्रें बाह्या उभारुन नामधारकाला आपलेसे करतात. त्यातील शिकवणीची गोडी लागली की ज्ञानलालसा अधिक तिव्र होते. अशा साधकाला ज्ञानदेव विश्वास देतात तो असा,
"ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा।द्वारकेचा राणा पांडवाघरी॥
ज्ञानदेव 'पांडव' हा शब्द ज्ञानेश्वरीत अर्जुनालाच उद्देशून वापरतात.
"परि तयापाशी पांडवा । मी हारपला गिवसावा ॥
जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥"
गीतेत संवाद आहे तो गुरु-शिष्यांचाच! अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला शरण जातो आणि त्याचा सद्गुरु म्हणून स्विकार करतो; तेव्हाच श्रीकृष्ण त्याला गीता उपदेश करतो.हरिपाठातही 'पांडव' हा शब्द अर्जुनाच्याच अपेक्षेत ज्ञानदेव वापरतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे अर्जुन हा एक श्रेष्ठ नामधारक होता. हरिपाठात ज्ञानदेवांना "नामसाधने"बद्दलच सांगायचे आहे. मग 'पांडव' हा शब्द अर्जुनाशिवाय आणखी कुणाच्याबाबतीत ते वापरतील? इथे एक गोष्ट मात्र बऱ्याचदा दुर्लक्षिली जाते. 'द्वारकेचा राणा'श्रीकृष्ण असा जेव्हा ज्ञानदेव उल्लेख करतात तेव्हा त्यांना शिष्याच्या अपेक्षेत सद्गुरू हेच अपेक्षित आहे. कारण सद्गुरूच साधकाला देवाच्या दारात क्षणभर तरी उभे करून त्याला चारी मुक्तींचा अनुभव करुन देवू शकतात. किंबहुना सद्गुरू म्हणजे सर्वेश्वराचे साकार रूपच! कदाचित म्हणूनच संत म्हणतात,
"सद्गुरूवाचुनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधि-आधि॥"

               ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

 

    

Post to Feedधन्यवाद
व्वा - अप्रतिम !
छान
सुंदर!
धन्यवाद!
हरिपाठ अभंग १
खुपच छान
अश्या अध्यात्मिक निरुपणांच्या उपस्थितीने.....
हरिपाठ... श्री. ज्ञानदेवांचा!
हरिपाठ

Typing help hide