ऑक्टोबर १३ २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#३)

ह्यासोबत

                         ॥ सद्गुरूनाथाय नमः ॥

अभंग # ३.
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासि भजे ॥३॥
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

पाठभेदः १.अगुण=अवगुण   २.जन्मांनी=जन्मोनी

ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात "मंथुनी नवनीता तैसें घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु॥" हा उपदेश केला आहेच. आता तिसऱ्या अभंगातूनही ते  जरा वेगळ्या अंगाने समजावून देत आहेत. ज्यांची बौद्धिक क्षमता जरा चांगली आहे असे विचारी साधक त्रिगुणात्मक प्रकृती,पंचमहाभुतांचा पसारा ह्यांचा विचार करीत असतात. शेवटी हे असार आहे, मिथ्या आहे ह्या विचारापर्यंत ते येतात. नामधारकाने हे सगळे मार्ग न चोखाळता सार आणि असार ह्यात फार लक्ष न घालता "हरिपाठी" स्थिर व्हावे असे ज्ञानदेवांना वाटते; कारण सारासार विचार करूनच भक्तांच्या हाती संतांनी नाम दिले आहे.
" संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ।
ज्ञानदृष्टी अवलोकिले । सार काढिले निवडोनि ॥
ते हे श्रीहरीचे नाम । सर्व पातकां करी भस्म ॥
अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नरनारी ॥"
असे संत निळोबा सांगून जातात. तर.. तुकाराम महाराज सांगतात,
"सत्य साच खरे । विठोबाचे नाम बरे ॥" अथवा
"सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाही नामी॥"

मी भावनगरला असता तेथील "दिव्य जीवन संघ" ह्या संस्थेत गीता आणि उपनिषद ह्यावर अभ्यासवर्ग चालत असत. तेथे अगदी सुरुवातीला पंचिकरणशास्त्र शिकविले जात असे. पंचमहाभूतं,त्रिगुण,पंचदेह ह्या सर्वांतून  बाहेर पडताना फार कष्ट पडायचे. मनात नाना प्रश्न आणि शंका घेऊनच आम्ही दुसऱ्या दिवशी जे स्वामीजी हे अभ्यासवर्ग घेत त्यांना भंडावून सोडत असू. हे सगळे ऐकायला, सांगायला ठीक आहे.पण आपल्याला ह्यातून हाती काय सापडले? आपल्या शंका, समस्या ह्यांचे निराकरण झाले का? असा विचार मनात येऊ लागे. मग संतांचा मार्ग अधिक भावू लागला.
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
मानवी मन-बुद्धी कार्यकारण संबंधातूनच विचार करते. कार्यकारणभाव सोडून विचार करणे आपल्याला जमत नाही. जेथे मानवी बुद्धीला गुणात्मक विचार करून प्रकृतीबद्दल विचार करता आला आणि जेथे त्याची बुद्धी कुंठीत होते तेथे मग तो ईश्वराला 'निर्गुण' संबोधायला लागतो. पण या संबंधीचे निर्णय हे बुद्धीच्या पलीकडे जावून अनुभवानेच घ्यायचे असतात. म्हणून मनाला  हरिनामाचा छंद न लावता शब्दज्ञानात गुरफटवणे व्यर्थ आहे. कारण मन देवाबद्दल ज्या ज्या कल्पना करते त्या त्या शेवटी अपूर्णच ठरतात.
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासि भजे ॥३॥
हे चराचर विश्व व्यक्त आहे. पण ते जेथून उदयाला येते ते तत्त्व अव्यक्त आहे. हे चराचर विश्व विविध आकारांनी भरलेले आहे. पण ते जेथून निर्माण होते ते तत्त्व निराकार आहे. याचा अर्थ असा की, त्या परब्रह्मतत्वाला स्वतःला विशिष्ट आकार नाही. तरीही नाना प्रकारचे आकार घेण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. अशा त्या परमात्म्याचे, हरिचे तू ध्यान कर,स्मरण कर. अथर्वशिर्ष्यात एक छान श्लोक आहे.
"त्वम देहत्रयातीतः । त्वम अवस्थात्रयातीतः ॥
त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम्॥ "
जेथूनी चराचर त्यासी भजे ह्या ओवीशी साधर्म्य नाही का दाखवत ?
विश्वरूपाने तोच नटलेला आहे हे लक्षात ठेवून त्याचे नामस्मरण केल्याने काय होते? तर..
"ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मांनी पुण्य होय"
साधनेचे अखंडत्व फक्त नामस्मरणातच आहे. ध्यान म्हणजे कृत्रिम स्थिती आहे. नामजप म्हणजे सहज स्थिती!  ध्यान आणि नामस्मरणाचा उद्देश्य मनोलय आणि बुद्धीलय हाच आहे. ध्यानामध्ये तात्पुरता मनोलय असतो तर नामस्मरणामध्ये मनोलय झाला की कायमस्वरूपी असतो. कारण ही सहज स्थिती असते. नामसंकिर्तनयोगात परावाणी म्हणजे समाधी.
        ध्यानी-मनी,जागृती-स्वप्नी भगवंत ही तुर्यावस्था आहे. तुर्यावस्था स्थिर झाली की तीच उन्मनी! ही उन्मनी अवस्था प्राप्त होणे म्हणजे फार मोठे भाग्य!
"उन्मनीच्या सुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥"

अशी ही उन्मनी स्थिती ज्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले आहे अशाच भाग्यवंताला प्राप्त होते. असे जरी असले तरी ही स्थिती याच जन्मात "याच देही याच डोळा" प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय संतांनी आपल्यासाठी करून ठेवली आहे. ती म्हणजे हरिनाम ! म्हणूनच ज्ञानदेव सांगतात...
हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥

    

                  ॥ श्री. सद्गुरुचरणी समर्पित ॥


 

Post to Feedसुंदर
रसाळ निरूपण
माझे मत!

Typing help hide