मार्च २००६

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२३)

ह्यासोबत
 ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २३.

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ । तेथें काही कष्ट न लागती ॥
अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारू असें ॥
ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥

पाठभेदः सर्व मार्गा = सर्वत्र ; तेथे = येथे ;मनाचा = नामाचा

हरिपाठ लिहिण्यामागे ज्ञानदेवांची मूळ प्रेरणा आणि हेतू आहे तो नामस्मरण साधनेने हरिप्राप्ती सहज आणि सुलभ आहे हे साधार सांगणे. संसारी लोकांनी परमार्थाकडे वळून सहज असणारा देव सहज आणि विनासायास कसा प्राप्त करून घ्यायचा हे सांगण्यासाठीच हरिपाठाचे प्रयोजन आहे. ज्ञानेश्वरी वाचताना आपल्या लक्षात येते की ज्ञानदेव हे खरेच 'ज्ञानियांचा राजा' होते. ज्ञानेश्वरीतील सहावा अध्याय वाचताना त्यांना 'योगिराज' म्हणणे योग्यच आहे हे प्रकर्षाने जाणवते.    

         त्यांची नामनिष्ठा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली कणव ह्यामुळेच त्यांनी हरिपाठ लिहिला असावा. ह्या अभंगातूनही नाममार्ग आणि इतर मार्ग यांची तुलना करून नाम हाच श्रेष्ठ मार्ग आहे असा स्पष्ट अभिप्राय ज्ञानदेवांनी दिला आहे.

शास्त्रग्रंथांचे वाचन / श्रवण करताना आपल्याला कळते की आपल्या दिव्यस्वरूपाचा विसर पडण्याचे कारण आहे माया. माया दोन प्रकारे कार्य करते. एक म्हणजे आवरण; ज्यामुळे आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाचा विसर पडला आणि दुसरे म्हणजे विक्षेप; जेणे करून जे नाही तेच आपल्याला सत्य भासू लागणे आणि वृत्तीतादात्म्यामुळे आपल्याला त्यातून सुख-दुःखाची अनुभूती येणे. आपण चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जातो. चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी बाह्यजगताशी आपला संबंध तुटणे आवश्यक असते. आत काळोख करून अगदी आपल्या शेजारी असलेल्याशीही आपला संबंध दुरावतो. नंतर पडद्यावर चित्रफीत दाखवली जाते. आपण त्याच्याशी इतके एकरूप होतो की नकळत आपण त्यातील पात्रांच्या सुखदुःखाने आनंदी अथवा दुःखी होतो. अगदी तसाच अनुभव आपल्याला झोपेत येतो. झोपल्यामुळे आपला जगाशी संबंध तुटतो (आवरण!) आणि विक्षेपामुळे स्वप्नात स्वप्नमय जगाचा अनुभव आपण घेतो. स्वप्नातील प्रसंगाशी आपण इतके एकरूप होतो की त्यातील घटनांप्रमाणे आपण सुखदुःखांचे अनुभव घेतो. ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ते आवरण दूर करून 'जागे होणे'. परमार्थातही मायेचे आवरण दूर करून आपल्याला आपल्या स्वरूपी जागे करणे (देवाची प्राप्ती करून देणे) हाच सगळ्या साधनांचा हेतू आहे.

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥

त्यासाठी योगमार्ग, तपोमार्ग, ज्ञानमार्ग, इंद्रियदमन यासारखे मार्ग शास्त्रकारांनी सांगितले आहेत. यामुळे मायेचे आवरण दूर सारून आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाची अनुभूती घेता येईल. भक्तीच्या भाषेत सांगायचे तर साधकाला देवाची प्राप्ती सहज होईल.

अष्टांगयोगातील सात पायऱ्या ( यम, नियम,आसन, प्राणायाम. प्रत्याहार,धारणा आणि ध्यान ) ओलांडल्या की समाधीतून देवाची प्राप्ती होते. पाच म्हणजे पंचाग्निसाधकाचा (पंचाग्निविषयी) किंवा त्यासारखा तपाचा मार्ग. तीन म्हणजे तीन देहांचा ( स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ) निरास करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग. दहा इंद्रियांच्या दमनाचा मार्गही वाटतो इतका सोपा नाही.ह्या मार्गाने जाऊन विषयासक्त असलेल्या इंद्रियांचे बळेच दमन करण्यात काय मरणप्राय दुःख आहे याची कल्पनाही सर्वसाधारण मनुष्याला येणे कठीण आहे.

दुसरे म्हणजे वरील मार्ग साधकाच्या दृष्टीने अतिशय खडतर आहेत. योग्याला आपल्या शरीराला वेठीस धरावे लागते आणि बऱ्याचशा भौतिकसुखांपासून त्याला वंचित राहवे लागते. तपाचा मार्गही असाच कठीण आहे. ज्ञानमार्गाने जायचे तर तसा स्वानुभवी आत्मज्ञानी मिळायला हवा ज्याच्या मुखातून असे श्रवण कानी पडेल. साधकाने 'मी देह नसून त्यांचा साक्षी केवळ आत्मा आहे-ब्रह्म आहे-असा दृढ निश्चय करणे' असा कितीही विचार केला तरी प्रत्यक्ष आचाराचा प्रश्न येतो तेंव्हा विचार विचाराच्याच ठिकाणी राहतो व मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्या साधकाच्या पदरात ब्रह्मघोटाळा मात्र पडतो. 

दुसरे धोके म्हणजे साधकाला जर ह्या मार्गाने जाऊन काही सिद्धी प्राप्त झाल्या तर तो त्यामध्येच अडकण्याचा धोका असतो. गर्व, द्वेष इ. मुळे साधनाभ्रष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते.परंतु

तैसे नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ । तेथें काही कष्ट न लागती ॥

नामस्मरण साधनेत असे धोके नाहीतच. भक्ती म्हणजे देवाप्रती प्रीती! नामस्मरणाने भक्ती प्रगट करणे यासारखे दुसरे सुलभ साधन नाही. पण आपला स्वभाव असा आहे की सोपे साधन आम्हाला पटत नाही. संतांनीही हेच सांगितले,
'सोपे वर्म आम्हां सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेऊनि नाचा ॥' 
गजाननमहाराजांनी शिष्यांना उपदेश केला आहे.
या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ध्यान साचे ।
परी ते ज्ञान प्रेमाचेविण असता कामा नये ।
जे जे कृत्य प्रेमाविण ते ते अवघे शीण ।
म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गांत ।
ज्ञानदेवांनीही आधीच्या अभंगातून हेच सांगितले आहे.
'उगा राहि निवांत । शिणसी वाया ॥'
नामस्मरणासारखे सुलभ साधन हाती असता कष्टप्रद मार्गाने जाण्याची खरंच गरज आहे का ?

अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारू असें ॥

माणसाच्या ठायी मन आणि प्राण दोन्ही आहेत. ह्या दोहोंपैकी एकास स्वाधीन केले की दुसरे ताब्यात येते. ह्या दोहोंच्या एकत्वातच हरीचे सुख प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. नरसी मेहता यांचे भजन मार्गदर्शनीय आहे.
'मन अने प्राणनो साध्यो सुमेळ में । गगनमा घंटडी वागी रे ।'
अजपाजपाचा माणसाच्या श्वासोच्छ्वासी निकट संबंध आहे. ही क्रिया जन्मापासून मरेपर्यंत अखंडपणे चालते. नाकाने श्वास आत घेणे व तो बाहेर सोडणे या दोन्ही क्रिया मिळून एक सहज जपक्रिया होते. हा जप करावा लागत नाही. तो आपोआप होतो. श्वास आत घेताना सो आणि श्वास बाहेर सोडताना हं असा सोहं मंत्राचा जप जन्मभर चालतो. अजपाजपाला माळ नको,संख्या मोजणे नको. श्वासावर सारखे अनुसंधान मात्र हवे. अनुसंधान टिकू लागले की श्वासांची गती हळूहळू मंदावते. एका मर्यादेपर्यंत ते सहन होते. पण नंतर श्वास निरोध होऊ लागतो. ते रोखणे सहन करणे अत्यंत कठीण असते. ह्यासाठी मजबूत मनच हवे. जीव गुदमरतो, कासावीस होतो. त्यातून सहीसलामत पार पडण्यासाठी प्राणाला उलटवता आले पाहिजे.उलट फिरलेला प्राण कुंडलिनी जागी करतो.ती शक्ती जागी झाली की प्रथम केवलकुंभक साधतो. केवलकुंभकाने प्राण एकत्र गोळा झाला की हृदयांतील अनाहत चक्र जागे होते.कुंडलिनी तेथपर्यंत पोचली की २४ तास सोहंचा झंकार ऐकू येतो. हाच नादब्रह्माचा साक्षात्कार होय. ह्याचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात आहे. पण तेथून पुढे शब्दब्रह्मापर्यंत जायचे असते. त्यासाठी गुरूकृपाच लागते. ह्या खडतर मार्गापेक्षा नामस्मरणाच्या मार्गाने जावे.

ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥

या ओवीत ज्ञानदेवांनी नामाविषयीचा आपला जिव्हाळा व्यक्त केला आहे. शरीराला गौणपणा देऊन मनाला साधनांत संपूर्णपणे गुंतवणारा मार्ग केंव्हाही बरा यात शंका नाही. मन हेही शक्तिरूपच आहे. या शक्तीला बळजबरीने वळवण्यापेक्षा युक्तीने भगवंताकडे वळवणे अंतिम सुखाचे आहे. ज्ञानदेव स्वतः ह्या मार्गाने गेले. भगवन्नामाचे सर्वांगीण महत्त्व आणि माहात्म्य ओळखल्यानंतर नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे असा त्यांचा निश्चय झाला. म्हणूनच भगवन्नामाचा पंथराज किंवा राजमार्ग त्यांनी स्वीकारला. नामाशिवाय जगण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटू लागले. यातच त्यांची नामावरील निष्ठा आणि श्रद्धा दिसून येते. म्हणूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

 

ह्या आधीचे अभंग

 

Post to Feed
Typing help hide