जानेवारी ११ २००६

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)

ह्यासोबत

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # १६.

हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवालें साधुसंगे ॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥
पाठभेदः हरिनाम=हरि बुद्धी, निवालें=निमालें, ज्ञानदेवीं=ज्ञानदेवा, रामकृष्ण=रामकृष्णी, येणें=तेणें

हरिप्राप्ती हे जर ध्येय असेल तर त्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. पातंजलींची योगसूत्रे, नारदाची भक्तीसूत्रे, व्यासांची ब्रह्मसूत्रे. काही आचरण्यास सोपी तर काही आचरण्यास अत्यंत कठीण. भगवंताच्या नामस्मरणाचे साधन सोपे आणि सुलभ आहे. नामाला लिंग,वर्ण,जात आणि धर्माची अट नाही. नामाला मोल द्यावे लागत नाही. काळ-वेळ, शुचि-अशुचिचा प्रश्न नामाच्या ठिकाणी उद्भवत नाही. नामाचा अभ्यास करण्यास कष्टही नाहीत. नामस्मरण हे सर्व बाजूंनी सुलभ असूनही नामाचा जप करणारी माणसे दुर्मिळ आहेत. स्वस्त आणि फुकट काही असले की त्याच्यावर विश्वास ठेवणे सामान्यजनांना कठीण जाते. नाम घेऊन काय होणार असा प्रश्न विचारण्यात आयुष्य घालवतील. याउलट संत तुकाराम महाराजांसारखे श्रेष्ठ नामधारक सांगतात,
" काय नोहे केले । एका चिंतितां विठ्ठले ॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥

नामस्मरण साधनेत जीवनाची संपूर्ण स्वीकृती अपेक्षित असते. आपल्या कर्तेपणाचा अहंकार घालवून देवच कर्ता आहे हा भाव धरून जीवनांत जे घडते ते प्रसन्न मनाने स्वीकारणे आणि देवाचे स्मरण करत जीवन जगणे हे नामस्मरणात अपेक्षित आहे. पण हे स्वीकारणे सोपे नाही. त्यात आता माणसाच्या सुखाच्या कल्पनाही बदलत चालल्या आहेत. विषयांवर आधारित सुखाची लालसा असेल तर त्या विषयांची साधने गोळा करणे हेच मानवी जीवनाचे ध्येय होणे स्वाभाविक आहे. पण विषयातून सुख भोगताना नेमके कशामुळे सुख मिळते ह्याबद्दल सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. परमार्थ किंवा अध्यात्मात संतांच्या वचनावर विश्वास ठेवून जे कोणी नामाचा अभ्यास करतात, अखंड नामस्मरण करतात, ते नाम घेता घेता नामात रंगून जातात आणि त्यांच्या मनाचे उन्मन होते.

रामकृष्ण नामी उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥

उत्+मन=उन्मन. उत् प्रत्येयाचा अर्थ ऊर्ध्वगति, पूर्णता, श्रेष्ठत्व असा आहे. मन हे जाणीवेचेच व्यक्त अथवा दृश्य रूप आहे. सर्वसामान्य माणसाला जागृती,स्वप्न आणि सुषुप्तीचा अनुभव असतो. काही साधक तुरीय अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. पण उन्मनी ही जाणीवेची सर्वोत्तम अवस्था आहे. देवाच्या ओढीने जेव्हा साधक नामस्मरण करू लागतो तेंव्हा त्याच्याही नकळत वासना क्षीण होवून मनाची विषयाकडील धाव कमी होत ते सूक्ष्मात रमू लागते आणि अखेर भगवत्स्वरूप होवून राहते. ह्या दिव्य अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. ती साधल्यावर साधक कृतकृत्य होतो. उन्मनीत स्थिर झालेल्या साधकापुढे,
"निळा म्हणे सर्वही सिद्धी । रुळती पदी हरिनामी ॥
नामी तिष्ठती ऋद्धीसिद्धी । तुटती उपाधी हरिनामे ॥
नामामृताने आणि देवाच्या अखंड प्रेमसुखाने तृप्त झालेला नामधारक त्या सिध्दींकडे ढुंकूनही पाहत नाही, मग त्यांचा प्रत्यक्ष उपभोग घेण्याचे तर दूरच राहिले!
सर्व सुखे नामे येती लोटांगणी । कोण त्यासी आणि दृष्टीपुढे
असे तुकाराम महाराज सांगतात, तर
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेणें राजहंसे पाणी काय॥
हरी नामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥
असा अनुभव एकनाथ महाराज व्यक्त करतात.

सिध्दी बुद्धी धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवालें साधुसंगे ॥

परमेश्वर हा आनंदस्वरूप असून जाणीव हे त्याचे रूप आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे. तो आपल्या हृदयात आहे. किंबहुना तोच देहाच्या मार्फत प्रगट झाला आहे. पण विषयसुखाच्या अपेक्षेने ह्या शक्तीचा ऱ्हास होत गेला. अखंड नामस्मरणाने सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी प्राप्त होते. म्हणजेच अतींद्रिय सामर्थ्य प्रगट होते. योगामध्ये वृत्तींचा निरोध करून जो शक्तिसंचय होतो तो नामस्मरणाने सहज व नकळत होतो. नामात रंगून गेल्यामुळे नामधारकाला त्याची जाणीवही नसते. त्यामुळे त्याची बाधा होत नाही.
त्याचप्रमाणे नामधारकाच्या बुद्धीचा परमात्म्याशी योग घडून समबुद्धी प्राप्त होते; जी प्राप्त झाली असतां साधकाला हरी सर्वत्र समत्वाने भरून राहिलेला आहे ह्याची प्रचिती येते. प्रत्येक माणसाच्या अंतरी ज्ञान असतेच. अभ्यासाने त्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करायचे असते. अभ्यासाचे / साधनांचे महत्त्व ह्याच साठी आहे. नामासारख्या साधनाचा आलंब घेऊन नामस्मरणाचा अभ्यास केला तर अशी समबुद्धी प्राप्त होतेच होते.
माणसाला जीवन जगत असता त्याचा निसर्ग, समाज आणि कुटुंबातील घटक ह्या सर्वांशी संबंध येत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सुखी व्हावे ही मनीषा प्रत्येकाच्या ठायी आहेच. ह्या सर्वांत राहून आपण सुखी होण्यासाठी ह्या सर्वांशी जुळवून घेता आले पाहिजे. म्हणूनच माणसाच्या जीवनात 'धर्म' आला. समाजात / कुटुंबात राहून नीतीचे आचरण करावे, आपले कर्तव्य पालन करावे हे ओघाने आलेच. 'धर्मामाजी श्रेष्ठ स्वधर्म' असे रामदासस्वामींनी सांगितले आहेच. सद्गुरू श्री.वामनराव पै लिहितात,ज्या भगवंताने आपल्याला जन्मास घातले. सुंदर असा मानवदेह दिला, अमोल अशी ज्ञानेंद्रियें / कर्मेंद्रियें दिली, अद्भुत अशी बुद्धी व स्मरण शक्ती दिली आणि आपल्याला विश्वाच्या मंडपात रंगपंचमीचा उत्सव नित्य साजरा करण्यासाठी पंचमहाभुतांच्या पाच रंगांनी भरलेली देहाची पिचकारी दिली त्या भगवंताचे नित्य स्मरण करणे, त्याच्या नामाचे आवडीने संकीर्तन करणे हाच खरा धर्म-स्वधर्म आहे. सिद्धी-बुद्धी-धर्म या तिन्ही गोष्टी नाम घेणाऱ्याच्या दैनंदिन जीवनांत सहज साकार होतात. अशा रितीने नामांत राहणाऱ्याची संगत ज्या संसारी माणसांना लाभते त्यांच्या मनाला खरी शांती मिळते. कारण संतांच्या संगतीतच नामाचे वर्म समजते, नामाची गोडी लागते आणि लागलेली नामाची गोडी संतसंगतीतच टिकते व वाढतही राहते. प्रपंचात तापलेला जीव अशा रितीने नामामृताने निवतो, शांत होतो आणि त्याचे तोंडून सहज उद्गार निघतात,
"दिवाळी दसरा तोचि आम्हां सण । सखे संतजन भेटतील ॥
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आता ॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥
तुका म्हणे कैसे होऊ उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ॥"

ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥

माणसाच्या ठिकाणी उठणाऱ्या वृत्तीचे प्रगट रूप म्हणजे मन. जसे संस्कार होतील हे मन तसे रूप धारण करते आणि तसेच जग प्रचितीला येते. लहानपणी एखाद्या मुलावर संस्कार झाले की 'तू डॉक्टर व्हायचेस'. तर ते मूल तसेच चिंतन करू लागते, अभ्यास करू लागते. एकदा का विद्यापीठाने त्याला डॉक्टर पदवी दिली की त्याच्या मनात 'डॉक्टर' हा  ठसा बसला की तो जाईल तिकडे त्याची ओळख डॉक्टर म्हणूनच होते. तसेच दिव्य नामाने साधकाच्या चित्तावर भगवत् प्रेमाचे ठसे उमटले की मन हळूहळू अंतर्मुख होते. भगवंताच्या चरणाचा स्पर्श होवून चित्ताचे चैतन्यात रूपांतर होते. चित्ताचे चैतन्य झालेल्या साधकाला सर्वत्र हरीच भरून राहिलेला असा अनुभव प्राप्त होतो. आपले कर्तेपण संपून जिकडेतिकडे भगवंताची सत्ता दिसू लागते. असाच ज्ञानदेवांचाही अनुभव आहे. म्हणूनच ते सांगतात,

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

Post to Feedब्रह्मसूत्रे!
अभ्यास!

Typing help hide