डिसेंबर २१ २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१३)

ह्यासोबत

अभंग १३ .

समाधी हरीची समसुखेविण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशिराजे सकळसिद्धी ॥
ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥

पाठभेदः केशिराजे=केशवराजें, ज्ञानदेवी= ज्ञानदेवा 

सर्वसामान्यता  आध्यात्मिक / पारमार्थिक साधक मोक्ष, मुक्ती अशी भाषा करतात. तर योगी 'ताटस्थ्य समाधी'च्या मागे असतात. पण इथे ज्ञानदेव 'हरीची समाधी' सांगताहेत. संतांना ताटस्थ्य समाधीची गोडी कधीच नव्हती. एकनाथ महाराज तर स्पष्ट लिहितात,
"ताटस्थ्य नाव समाधि । म्हणे त्याची ठकली बुद्धि"
अखंड नामस्मरण  ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी भक्ती आहे. द्वैतबुद्धीत मी आणि देव असे दोन भाव आपल्या ठायी नांदतात. मी उपाधीसहित आहे. तर देव उपाधिरहित आहे. 'मी' हा देहाला सन्मुख आहे आणि त्याच्या ठायी विषयांची आसक्ती आहे. हे सगळे घडते ते द्वैतबुद्धीतून. द्वैतबुद्धी देहाला सन्मुख होऊन नेहमी विषयांत सुख पाहते. त्यामुळे समसुखाला वंचित होते. अखंड नामस्मरणाच्या साधनेने साधक देवाच्या कृपेला पात्र ठरतो आणि द्वैतबुद्धिचा नाश होऊन 'मी'ची गाठ सुटते आणि विषयांची आसक्ती पूर्णपणे नष्ट होऊन भगवत् चरणी प्रीती जडते. हे प्रेमसुखच त्याला हरीची समाधि प्राप्त करून देते. काही वर्षांपूर्वी 'संभोगातून समाधी' ह्या विचारांचे पेव फुटले होते. ज्ञानदेव इथे 'समसुखा'तून हरीची समाधी मिळते हे सांगताहेत. भोग हा इंद्रियाच्या माध्यमातून विषयांचा घ्यायचा असतो. समसुख हे प्रेमातून/भक्तीतूनच मिळू शकते. प्रेमाच्या अधिष्ठानातून मिळालेला भोग आणि भोगातून केलेली प्रेमाची अपेक्षा ह्यांची सांगड घालणे कठीण वाटते. भगवंत इंद्रियातीत आहे. तो भोगातून कसा मिळेल? आणि मग हरीची समाधी तरी कशी प्राप्त होईल? प्रेमात / भक्तीत 'मी' किंवा 'सर्वस्व' अर्पण करणे अपेक्षित असते. सर्वस्व अर्पण करणे म्हणजे "सर्व ज्यामध्ये आहे तो 'स्व' देवाला(भगवंताला) अर्पण करणे". मग निळोबांचा अनुभव शब्दबद्ध होतो तो असा,
देवा ऐसे देवचि होती । जे या भजती विठ्ठला ॥
निळा म्हणे लटिके नव्हे । पहा स्वानुभवे आपुलिया ॥
                           किंवा
देव पाहावया गेलो । तेथे देवचि होवून ठेलो ॥
हा तुकाराम महाराजांचा अनुभव हा 'समाधि हरीची' हून वेगळा नाही.

नामस्मरणातून नामधारक देवाच्या प्रेमसुखाचा प्रसाद मिळवून 'हरीची समाधि' साध्य करून घेतो. साधकाचा 'मी' स्वरूपात विरून जात नाही तर उलट जीवाचे अव्यक्त आनंदस्वरूप त्याच्या ज्ञानरूपात व्यक्त होते. हरीची समाधी प्राप्त झाली असतां नामधारकाचे जगाशी संबंध तुटत नाहीत तर उलट प्रेमाच्या दोरीने जोडले जातात. साधक द्वंद्वाच्या जाळ्यात सापडण्याऐवजी द्वंद्वातीत होतो.

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशिराजे सकळसिद्धी ॥

माणूस हा बुद्धिप्रधान आणि विचारशील प्राणी आहे असे समजले जाते. मानवी प्रगतीकडे जर नजर टाकली तर आपल्या हे चटकन लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रगतीतून विश्वाची रहस्य उलगडू लागली. पण ह्या प्रयत्नांत आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्गाशी जुळवून घेऊन दैनंदिन आहार-विहार करून सुखी होण्याऐवजी मानव निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू लागला. आता तर चंगळवाद(भोगवाद) इतका बोकाळला आहे की Basic Science,Technology & making money अशा विचारांकडे समाजातील विज्ञानी विचारवंतांचा वैचारिक कल दिसू लागला आहे. तर आध्यात्मिकतेच्या/तत्त्वज्ञानाच्या नावाखाली 'संभोगातून समाधी' चे समर्थन केले गेले आहे. अर्थात हे फार काळ टिकणारे नाही. निसर्ग / देव आपले महत्त्व आणि महती टिकवून आहेच. ज्ञानदेवांसारख्या संतांच्या मते 'बुद्धीचे वैभव' हेच आहे की एका केशिराजाच्या पायाजवळच सर्व सुख आहे असा निश्चय करून त्याच्या ठायी स्थिर होण्यासाठी नामस्मरणाची कास धरून 'हरीची समाधी' प्राप्त करून घेणे. ह्यामुळे चित्त शुद्ध होऊन त्याचे रुपांतर चैतन्यात होते व दृष्टी चैतन्यरूप होऊन जग म्हणजे प्रभूचा चिद्विलास असे प्रत्यक्ष दिसू लागते. भगवंताची प्राप्ती करून देण्यातच बुद्धीची कमाल आहे. भगवंताची प्राप्ती झाली की त्यानंतर आणखी काही मिळवायचे उरत नाही.

ऋद्धिसिद्धिनिधि अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ॥

ह्या ओवीतून ज्ञानदेव साधकाला त्याच्या नामस्मरण साधनेतील अडचणी समजावून देत आहेत. सुरुवातीच्या काळात साधनेत प्रगती झाली की ऋद्धि-सिद्धि साधकाला मोहवतात. साधनेतील हेच अनुभव म्हणजे अंतिम साध्य समजून साधक इथेच अडकून पडतात. नेमकी इथेच सद्गुरूंची महती लक्षात येते.'देव' अजून खूप दूर आहे ह्याची जाणीव साधकाला  सद्गुरूच करून देऊ शकतात. चांगदेवांचे उदाहरण ह्या अपेक्षेत लक्षात घेण्यासारखे आहे. चिमुरड्या मुक्ताईने त्यांना आत्मबोध केला आणि मग त्यांना त्यांच्याजवळील ऋद्धिसिद्धिंचा फोलपणा कळला. ह्या गोष्टी माणसाच्या अंतरंगाशी संबंधित आहेत. कदाचित ह्या गोष्टींवर आपला विश्वास बसणार नाही. रोज आपण पाहत आहोत ती वैज्ञानिक प्रगती घ्या ना. त्यातून माणूस अधिकाधिक भोगवादी बनत गेला. बौद्धिक अहंकारातून तो निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू लागला. मौज  अशी की विज्ञानाने माणसाला समृद्धी आणि सिद्धि या दोन्हीही दिल्या. माणसाचे भांडार भरून टाकले. पण माणूस आनंदी झाला का? सुखी झाला का?.... नाईलाजास्तव का होईना ह्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. उलट त्याचे जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचे बनले आहे. अधिकाधिक परावलंबी बनले आहे. डॉक्टर होऊन रोग्यांची सेवा करण्याऐवजी किंवा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सांगण्याऐवजी डॉक्टरमंडळी दवाखाने,रुग्णालये, गाडी, बंगला ह्यांच्यामागे लागली. किंबहुना हेच त्यांच्या यशाचे मोजमापन ठरू लागले. ह्या उपाधीतून मग आरोग्याचे विचार हरवू लागले. डॉ. मांडकेंसारखा एक हृदयरोगतज्ञ हृदयरोगानेच जीव गमावून बसतो. हे ऐकले तेंव्हा मानवी बुद्धीची / प्रगतीची हतबलता दिसून आली. ज्ञानाची कास धरून योग्य आहार-विहार न करता असे उपाधीत अडकले तर शेवट काय होणार? म्हणून 'परमानंदी मन' लावणे हिताचे आहे. त्यातूनच ज्ञानदेवांना लाभले...

ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥

एका हरीचे चिंतन सर्वकाळ करीत राहिल्याने ज्ञानदेवांना रम्य समाधान लाभले. लौकिक अर्थाने सुख देणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्या भावंडांजवळ नव्हत्या. तरीही ते म्हणतात,'ज्ञानदेवी रम्य रमले समाधान'!

सर्वसाधारणपणे आपणा सामान्य माणसांची धडपड  जीवन समाधानात घालवणे हीच असते. पण तुकाराम महाराज जसे म्हणतात,
"याचसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दीस गोड व्हावा ॥"
तसे आपण म्हणू शकतो का? उलट म्हातारपणी "याचसाठी केली  होती का धडपड?" असे सामान्यजन खेदाने म्हणताना दिसतात.

पण नामधारकाला हे समाधान प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करावी लागत नाही. तर ते समाधान आपण होऊन वस्तीला येऊन राहते.
सर्वकाळ नामचिंतन मानसी । समाधान मनासी समाधि हे ॥
ज्ञानदेवांना भक्तिसुखात हरीची समाधी लाभली.देवाच्या दर्शनाने आणि स्मरणाने विश्वातील सौंदर्याचाही साक्षात्कार झाला. म्हणूनच ज्ञानदेव जिव्हाळ्याने सांगतात... 

"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

 

 

Post to Feedबुद्धीचे वैभव
मंगल

Typing help hide