नोव्हेंबर २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#६)

ह्यासोबत

                             ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ६.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ती झाली जैसी ॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ॥
पाठभेदः अनुभवे=अनुभव ; दिसे जनी= दिसे जनीं वनीं

              हा अभंग म्हणजे ज्ञानदेवांनी एकाच अभंगातून व्यक्त केलेले पारमार्थिक वाटचालीचे मार्गदर्शनच! खरे सद्गुरू भेटले की त्यांच्याकडून साधकाने नेमकी कशाची अपेक्षा ठेवावी आणि त्याची अंतिम फलश्रुती काय असावी ह्याचे नेमके मार्गदर्शन ह्या अभंगातून ज्ञानदेवांनी केले आहे.
               ह्या अभंगातील "साधु" हा शब्द "सद्गुरू"च्या अपेक्षेतच असावा. साधू,संत किंवा सद्गुरू उपदेश सर्वांनाच करतात. बऱ्याच वेळा प्रवचन, कीर्तनातूनही आपल्याला अध्यात्मशास्त्रातील सिद्धान्तांवर निरूपण ऐकायला मिळते. ज्यांचे भाषाप्रभुत्व आणि वाक्प्राविण्य विलक्षण असते ते श्रोत्यांना काही काळ खिळवून ठेवतात. पण शेवटी ते "बोलाची कढी, बोलाचा भात" असेच होते. दासगणूमहाराज रचीत "गजानन विजय" ह्या पोथीत श्री.गजानन महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आठव्या अध्यायात लिहिला आहे.ब्रह्मगिरी गोसाव्याचे श्रीमदभगवतगीतेतील "नैनं छिन्दन्ति शस्त्राणी । नैनं दहति पावक।" ह्या श्लोकावर निरूपण चालू होते. श्री.गजानन महाराज समोरच सागाच्या पलंगावर बसले होते. त्यांनी आपल्या शिष्याकडे चिलीम भरून मागितली. चिलीम ओढताना एक ठिणगी पडते आणि ज्या  पलंगावर महाराज बसलेले असतात त्यालाच आग लागते. महाराज शांत असतात. ते आपल्या शिष्यांना त्या ब्रह्मगिरीला बोलावण्यास सांगतात आणि त्याला शेजारी बसण्याचा आग्रह करतात. भीतीने तो ते नाकारतो. तेंव्हा महाराज त्याला म्हणतात "नैनं छिन्दन्ति"श्लोकावर।व्याख्यान केले एक प्रहर। आता का मानिता दर। या पलंगी बसण्याचा?॥१७॥आणि मग मध्यरात्रीच्या समयाला।ब्रह्मगिरीस बोध केला।आजपासून चेष्टेला। तू या सोडून देई रे॥४६॥ ज्यांनी राख लावावी।त्यांनी उपाधी दूर ठेवावी।अनुभवावीण न सांगावी। गोष्ट कोणा न निरर्थक॥४७॥नु
सते शब्दपांडित्य।माजले जगी अतोनात।तेणेंच आहे झाला घात। आपुल्या या संस्कृतीचा॥४८॥
           काही वेदांती प्रवचनकार तर घट आणि पटात इतके गुरफटलेले असतात की त्यांना ह्यातून बाहेर कोण काढणार हा श्रोत्यांनाच प्रश्न पडतो.
           बोध हा दोन प्रकारचा असतो. एक तर्काच्या अधिष्ठानावर झालेला समजुतीचा बोध व दुसरा अनुभवाच्या अधिष्ठानावर झालेला प्रत्यक्ष बोध. जो साधक नामात रमलेला असतो, सद्गुरूचरणी लीन झालेला असतो त्यालाच
 सद्गुरू पारमार्थिक गुह्य "हे हृदयीचे ते हृदयी" देऊ शकतात. तेंव्हाच साधकाला आत्मानुभव सहज प्राप्त होतो. ही सद्गुरूंची आंतरिक साद असते.तिला साधकाने बाह्य बंधने झुगारून ओ दिली की मगच सद्गुरू आपला बोध देतात.साधकाला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होतो. ह्या बोधाने साधक जीवभावाने मरतो आणि आत्मरुपाने उरतो. मी देहच आहे ही देहबुद्धी संपून मी आत्माच आहे ही आत्मस्मृती उदय पावते. परंतु मी देह आहे हे जसे एक प्रकारचे "मी"पण आहे तसे मी आत्मा आहे हेही दुसऱ्या प्रकारचे "मी"पणच आहे.त्याला भले "सोहंभाव" म्हणोत. साधक जसजसा ह्या भावात स्थिरावतो तसतसा त्याचा हा भावही परमात्मस्वरूपात विलीन होऊन जातो. मग अनुभव घेणारा मीच न राहिल्याने आत्मतत्त्वी हरीच दिसू लागतो.

कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥

ज्याप्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की तो अग्नीरूप होतो आणि शेवटी अग्नीसुद्धा नाहीसा होऊन केवळ आकाश शिल्लक राहते.त्याप्रमाणे जीवाला आत्मानुभवाचा स्पर्श झाला की त्याच्या अहंभावाचे सोहंभावात रुपांतर होते. त्याच्या जीवभावाचा लोप होऊन त्याच्या ठिकाणी आत्मभाव उदयाला येतो. आत्मानुभव झालेल्या साधकाच्या ठिकाणी काही काळ "मी आत्मा आहे" हा भाव स्फुरत राहतो. शेवटी हा भावसुद्धा स्वरूपात मुरतो आणि केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. असा साधकच

"मोक्षरेखे आला भाग्ये विनटला। साधुचा अंकिला हरिभक्त॥"

           
हरिभक्त म्हणजे भगवंताच्या नामस्मरणात रमलेला साधक. असा साधक साधूच्या कृपेला पात्र ठरतो. नाम मुखात येणे हे माणसाचे भाग्य. नामात मन रमणे हे साधकाचे सौभाग्य आणि केवळ नामच स्फुरणे हे परमभाग्यच! एकदा का साधक सद्गुरुकृपेला पात्र ठरला आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव होऊ लागला की त्याच्या ठायी भगवंताचे अनुसंधान अखंड राखले जाते. अखेर सायुज्यता मुक्तीपाशी येऊन त्यावर सद्गुरुकृपेचा वर्षाव होऊन तो आत्मस्वरूपात कायमचा विलीन होतो.

"ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ॥"

सज्जनांच्या म्हणजेच संत, सद्गुरूंच्या सहवासात एकदा का नामाची गोडी लागली की त्या नामातूनच "अद्वैतानुभव" साधकाला लाभतो. साधकाला प्रथम आपल्या हृदयामध्ये वास करणाऱ्या आत्मतत्त्वातच हरिरुप दिसते. "पिंडी ते ब्रह्मांडी" ह्या न्यायाने तेच आत्मतत्त्व सर्व दृष्यामध्ये पसरलेले दिसते. ज्याला ह्या आत्मानुभवाची गोडी संतसंगतीत राहून नामस्मरणाने चाखायला मिळते तो साधक भाग्यवानच.

हा अनुभव सत्शिष्याला जरूर येतो. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात,

"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

 

Post to Feedसुंदर!

Typing help hide