'बंटी और बबली' मधल्या बंटीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, "ये वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमें दो तरह के लोग होते हैं। एक जिन्हें बिल्लीयां बहोत पसंद है और एक वो जो बिल्लीयोंको सिर्फ नफ़रतकी नजरसे देखते हैं।" खरंय. नुसतं 'मांजर' म्हटलं तरी चेहर्यावर हास्य खुलणारे किंवा त्याउलट कपाळावर आठी उमटणारे चेहरे इतक्याच दोन प्रकृती सर्वसाधारणपणे आढळतात. अर्थात त्यापैकी दुसरी प्रकृती उगाचच निर्माण झाली आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण मांजर का वाईट हे पटवताना बहुतेक वेळा त्याची कुत्र्याशी तुलना करुन मग कुत्रा कसा जास्त बुद्धिमान असतो किंवा स्वामीभक्त असतो वगैरेच्या कथा ऐकवल्या जातात. होय मान्य आहे, नाही कोण म्हणतंय! पण मुळात मांजर आणि कुत्रा यांची तुलना करण्यातच काय अर्थ आहे, कारण दोन्ही पूर्णपणे भिन्न प्राणी आहेत. मांजर भले त्याच्या मालकाशी एकनिष्ठ नसेल किंवा मतलब साधून झाल्यावर ओळख दाखवणारही कदाचित पण शेवटी प्रत्येकात काहीतरी कमी असतंच की. फक्त कोणाला ते जास्त महत्त्वाचं वाटतं कोणाला कमी इतकंच. (आता मला कुत्रे येणार्याजाणार्यावर विनाकारण भुंकत राहतात, धावून जातात ते भारी त्रासदायक वाटतं. बरं त्याचा स्पेशल खुराक सांभाळा, फिरायला न्या, आंघोळ घाला, वगैरे लफडी वाढतात ते वेगळंच :))) त्यामुळे मी आहेच मुळी पहिल्या प्रकारात मोडणारी. होय, त्यांच्या सर्व गुणदोषांसकट मांजरं मला प्रिय आहेत.
तसा लहानपणी मी आपण होऊन 'कुत्रा पाळूया किंवा निदान मांजर तरी आणूया' असा आ
ईकडे धोशा लावलेला आठवत नाही. किंवा मांजर पाळण्याआधीही घरात 'एखादं माऊ पाळूया ना' किंवा 'काय मज्जा येते मांजराशी खेळायला' असले संवाद घडून मग त्यावर 'मांजर पाळायचं की नाही' अश्या प्रकारची चर्चा झाल्याचं आठवत नाही. तसाही घरी कोणालाच मांजरांचा तिटकारा वगैरे नव्हता. तरीही बाबांपेक्षा आईकडे मांजरांप्रती जास्त सॉफ्ट कॉर्नर आहे हे जाणवलं होतं. (अर्थात पुढे मार्जारआगमन झाल्यानंतर सगळ्यांची तीच परिस्थिती झाली ही गोष्ट वेगळी. मग काय आमच्या घरातल्या सर्व सॉफ्टकॉर्नर्सचा उशीप्रमाणे यथेच्छ उपयोग आमच्या मांजरांनी करुन घेतला)

एक दिवस अचानक एका मांजरीच्या छोट्या पिल्लाचं घरी आगमन झालं. मी तेव्हा तिसरी-चौथीत असेन. ते कसं घरी आलं किंवा कुठुन आणलं (बहुतेक बिल्डींगच्या जवळच आढळलं होतं) हे तपशील थोडे विसरायला झालेत तरी ते मांजर मात्र कायमचं स्मरणात राहिलंय. मला आठवतंय त्यानुसार पहिल्यांदा मी त्या पिल्लाच्या जवळही जायला तयार नव्हते. ते पिल्लू मात्र घर अगदी सरावाचं असल्यागत भीडभाड न बाळगता, बिनधास्त इकडेतिकडे फिरलं, थोडंफार म्याव म्याव करुन आम्हाला त्याचा आवाज ऐकवला, दिलेलं दूध चटचट प्यायलंही. (या उलट आमच्याकडे दुसरं जे मांजर आणलं होतं त्याची पहिल्या दिवशी नवीन घर पाहून उडालेली घाबरगुंडी अजून आठवते!) मला दिवसभर आज काहीतरी वेगळं घडलंय हे जाणवत राहिलं. दुसर्या दिवशी मात्र न घाबरता त्याला हात लावला. तो मऊ स्पर्श खूप
आवडला. मग काहीही कारण नसताना त्याचं 'टमकू' असं एक निरर्थक नाव ठेवलं गेलं पण त्याला त्या नावाने आम्ही कधीच हाक मारली नाही. 'स्वार्थी', 'आपमतलबी', ’लुच्ची’ वगैरे मांजरांना हमखास चिकटणारी विशेषणं या मांजरापासून फटकून दूर होती की काय कोणास ठाऊक पण हे मांजर खरोखर अतिशय शहाणं होतं. घरच्या दूधभाताची सवय लागल्यामुळे म्हणा पण 'बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत' ही शिकवण आमच्यापेक्षा त्यानेच जास्त अंगी बाणवली होती बहुतेक कारण बाहेरुन चिमण्या, उंदीर किंवा तत्सम खाद्यविशेष त्याने कधीही तोंडात पकडून घरात आणल्याचं आठवत नाही. कधीही मातीतून लोळून आलंय, चिखल तुडवत आलंय असं न दिसल्याने कायम बेटं आंघोळ केल्यासारखं स्वच्छ दिसायचं. सकाळच्या कोवळ्या उन्हात गॅलरीत ते पहुडलेलं असे. त्याच्या मऊ केसांना बिलगून असलेली सूर्याच्या कोवळ्या किरणांची प्रभा पाहणं मोठं आनंददायी असे. अशा वेळेस उन्हामुळे त्याच्या पातळ कानांच्या शिराही स्पष्ट उठून दिसून कान लालसर दिसायचे.

खूपसं पांढरं आणि उगाच आपले नावाला काही काळे ठिपके असं रंगरुप असणार्या त्या पिल्लाने खूप लळा लावला. (तेव्हा मला सोनेरी-पिवळ्या रंगांची मांजरं जास्त आवडायची. पण तो योग कधीच आला नाही. नंतर पाळलेली तिन्ही मांजरंसुद्धा काळीपांढरीच होती.) ते पिल्लू हळूहळू मोठं होऊ लागलं. त्याच्यासाठी घरातल्या एका कोपर्यात आईच्या जुन्या सुती साडीचा मऊ बिछाना तयार केला गेला. तो त्याला भारी आवडायचा. मुळातच शांत स्वभावाचं आणि नाजूक म्याव करणारं ते मांजर श
हाण्यासारखं दिलेल्या वेळेलाच दिलं तेव्हढंच दूध किंवा खाणं खायचं. मांजरांमध्ये जात्याच असणारा आगाऊपणा, अधाशीपणा कधीच आढळला नाही त्याच्यात. घरी लबाडपणे वागून पदरात जास्त मोठं घबाड पाडून घेणे किंवा घराबाहेरच्या स्वजातीय बंधूंशी भांडणे करुन त्याची निशाणं अंगावर वागवत, बोंबलत घरात प्रवेश करणे इत्यादी घटना त्या काळात कधी घडल्याचं स्मरणात नाही. किंवा त्याच्या इतर लीलांमुळे शेजार्यांच्या तक्रारीही कधी घरी आल्या नाहीत. उलट काहीजण त्याला खेळायला म्हणून त्यांच्या घरी जरावेळ घेऊनही जायचे. तेव्ह्या त्यांच्या घरातून हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू यायचे. आमच्या घरी आम्ही बहिणी खूप खेळलोय त्याच्याशी. वीतभर दोरीपासून, पिंगपॉंगचा बॉल किंवा काही नाही तर अगदी रुमालाचा बेडूक असली कसलीही आयुधं घेऊन त्याच्याबरोबर आम्ही खेळत असू. त्याच्या मोहक हालचालींनी खूप आनंद दिला. खेळून कितीही दमणूक झाली तरी स्वारी झोपायला त्याच्या बिछान्यावरच जाणार. नाहीतर कुठेही ताणून द्यायची मांजरांची सवयच असते. (खासकरुन कोच अडवून ठेवणे असले उद्योग कधी त्याने केले नाहीत. नंतर पाळलेल्या तिन्ही मांजरांना कोचावरच ताणून द्यायची सवय लागली होती. त्यामुळे पाहुणे येण्याआधी करायच्या पसारा आवरण्यासारख्या तयारीत कोचावरच्या झोपलेल्या मांजराचं मुटकुळं तसंच्या तसं उचलून दुसरीकडे ठेवणे हेसुद्धा एक काम असायचं) त्याची ही वैशिष्ट्ये तेव्हा खास लक्षात आली नाहीत पण पुढे पाळलेल्या तीन मांजराचे स्वभावनमुने बघण्यात आले तेव्हा वारंवार या शहाण्या पिल्लाची आठवण येऊन खूप वाईट वाटे.

वाईट अशासाठी वाटायचं कारण दुर्दैवाने या मांजराचा मृत्यू आमच्याच घरात आमच्या डोळ्यासमोर झाला. त्या छोट्या पिल्लाचं पूर्ण वाढलेल्या मांजरात रुपांतर होण्याआधीच एक दिवस अचानक ते आम्हाला सोडून गेलं. आपल्या लाडक्या गोष्टीचा अंत डोळ्यासमोर होण्यासारखे दुसरे दु:ख नाही. त्या लहान वयात तो दिवस खूप परिणाम करुन गेला. त्याला कसलासा आजार झाला होता बहुतेक असं आता वाटतं कारण ते न हिंडता फिरता त्याच्यासाठी ठेवलेल्या मऊ गादीवर स्वस्थ पडून रहात असे. आम्हाला वाटायचं दमलं असेल. तशीही मांजरांना झोप प्रिय असतेच. पण प्रत्यक्षात अशक्तपणामुळे ते हिंडतफिरत नसणार. ते मांजर इतकं शहाणं होतं की त्या आजारी अवस्थेतही ते टॉयलेटसाठी बाथरुम मध्ये जात असे. आम्ही त्याला टॉयलेट ट्रेनिंग वगैरे काहीही दिलं नव्हतं. (तसं काही स्पेशल असतं प्राण्यांसाठी हेही ज्ञान नव्हतं तेव्हा) पण प्रथमपासून त्याला आपण होऊनच बाथरुममध्ये जाण्याची सवयच लागली होती आणि ती शेवटपर्यंत राहिली होती. ते बघून डोळे जाम भरुन यायचे. शेवटी त्याला खाणंही पचेनासं झालं. त्याच्या वाडग्यातलं तसंच्या तसं राहिलेलं दूध पाहून शंकेची पाल मनात चुकचुकली आणि अशातच एका दुपारी त्याचा श्वास थांबला. मृत्यू झाल्यानंतर शरीर एकदम ताठ झालं होतं....
नंतर त्याचा आवडता बिछाना असलेला तो रिकामा कोपरा पाहणे म्हणजे एक शिक्षाच होती. त्याच्या जाण्याने जी एक पोकळी झाली ती कशानेच भरुन निघाली नाही...नंतर पाळलेल्या मांजरांनीही नाही.... कॅमेर्यात कधीही बंदिस्त न करु न शकलेल्या या छोट्या दोस्ताला माझ्या मनातल्या एका कोपर्यात एक चिरंतन स्थान आहे. त्याच्याविषयी आता अधिक काहीच लिहू शकणार नाही.