संगीत आणि भाषा

भाषा आणि माणूस एकमेकांपासून वेगळे करता येतील? कुणी म्हणेल हा काय प्रश्न झाला. बरोबर आहे! भाषा आणि माणूस वेगळा करताच येणार नाही. इतकी घट्ट ती (म्हणजे भाषा) प्रत्येकाला चिकटलेली आहे. प्रत्येक जण आपल्या प्रदेशानुसार भाषेचा आविष्कार घेऊन पुढे येत असतो. म्हणजे असं... माणूस नगरी असेल, तर तो "काय करतोस' असं पुणेरी बोलणार नाही. "काय करून राह्यला रे' असंच वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडेल. मैलागणिक भाषा बदलते, असं म्हणतात ते काही खोटं नाही. खेड्यात गेलं तर तिथे पुणेरी (कथित शुद्ध) बोली रुचणार नाही. त्या गावची "गावंढळ' भाषाच तिथे आपली वाटेल. तिथे होणारी निर्मिती मग ती कविता असेल, नाटक असेल किंवा आणखी काही... त्या भाषेचा बाज त्या कलाकृतीमध्ये असेल. यावर "पुल'नी फार चांगली टिपणी केली आहे... वाचा...
संगीत आणि भाषा : पु. ल. देशपांडे
सुधीर फडके यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्वरतीर्थ ग्रंथात पु. ल. देशपांडे यांनी बाबूजींचा गौरव करताना संगीत आणि भाषा यावर टिपणी केली आहे. प्रत्येक भाषा आपल्या संगीताचा आविष्कार घेऊन येत असते. प्रत्येक भाषेचे आपले म्हणून काही स्वभाव असतात. गीतातील भाव प्रकट करण्याचीही त्या भाषेची स्वतंत्र चाल असते. मराठी अभंगाला पंजाबी ढंगाची चाल मानवणारी नाही. अनेक वर्षांचे स्वर संस्कार चालत आलेले असतात. त्या परंपरेशी असलेले नाते साफ तोडून चालत नाही. जाझच्या ठेक्यात अभंग बसविणे अशक्य नाही; पण तो भक्तिभावना व्यक्त करणारा अभंग राहणार नाही. त्याचे नाते थेट परदेशी नाइट क्‍लबशी जुळेल. प्रार्थनेचे सूर मंदिरातले आहे, चर्च मधले आहेत की, मशिदीतून येणाऱ्या बांगेचे आहेत, हे परंपरेने आलेल्या स्वररचनेवरून सिद्ध होते. सतत कानावर पडणाऱ्या स्वररचनांशी काही घटनांचे किंवा प्रसंगांचे वर्षानुवर्षे साहचर्य असते. आपल्याला शार्दूलविक्रीडितातील विशिष्ट चाल ऐकण्याची सवय आहे. त्या चालीचे मराठी लग्न समारंभाशी साहचर्य आहे. त्यामुळे मंगलाष्टके बदलून म्हटले तर आपल्याला रुचणार नाहीत. [float=font:vijay;place:top;color:3E9628;background:FFFFF0;]सकाळ, दुपारचे, संध्याकाळ, रात्रीचे राग हे वर्षानुवर्षाच्या साहचर्यामुळे आपल्याला त्या त्या वेळी अधिक गोड वाटतात. म्हणूनच नव्या चाली करताना स्वरांच्या साहचर्याचे भान ठेवणे महत्त्वाचे असते.[/float]