ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
अस्तित्वाशी संवाद साधणं ही आनंदाची परिसीमा आहे, तो सुखात जगण्याचा एकमेव मार्ग आहे. मानवी अस्वास्थ्याचं, जगण्यात मजा न येण्याचं खरं कारण अस्तित्वाशी संवाद तुटलाय हे आहे. माणूस सोडता सगळी सजीव/निर्जीव सृष्टी मजेत आहे, झाडं बहरतायत, पक्षी विहार करतायत, दऱ्या-डोंगर शांत आहेत, समुद्र त्याच्या कक्षेत उन्मत्त आहे, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतेय, सूर्य सदैव प्रकाशमान आहे, ताऱ्यांनी निशःब्दपणे नभमंडल व्यापलंय, साधी मांजरं आणि कुत्री देखील निश्चिंत आहेत, फक्त माणूस अस्वस्थ आहे!
तुम्ही कधी विचार केलाय की सूर्य पृथ्वी पासून सुमारे पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे, म्हणजे पंधरा कोटी किलोमीटर त्रिज्या असलेलं एक वर्तुळ आहे जे पृथ्वी वर्षभरात संपूर्ण फिरतेय, अनंतकाला पासून, जरा कुठे चूक झाली तर ती एकतर सूर्याकडे ओढली जाईल किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणातून सुटली तर आसमंतात कुठेही भरकटत जाईल. एवढ्या मोठ्या वर्तुळात जरा जरी वेळेची चूक झाली तर इतर कुठल्याही ग्रहाशी समोरासमोर धडक होऊ शकते आणि सगळा खेळ क्षणार्धात संपू शकतो, पण सगळं अगदी निवांत चालू आहे. कुठलाही नकाशा नाही, कुणीही पायलट नाही, कशाचा भरोसा नाही आणि पंधरा कोटी किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचा प्रवास! किती निर्धोक चाललंय सगळं. आपण असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही पण आपण किती हैराण आहोत, आणि सगळ्यांची एकच काळजी, 'माझं कसं होणार? '
अस्तित्वाची भाषा मौन आहे आणि आपण आपल्या अंर्तगत संवादात मग्न आहोत हे अस्तित्वाशी संवाद तुटण्याचं कारण आहे. प्रत्येकाची आपापली दर्द भरी कहाणी आहे. कुणाकुणाचं फार भारी चाललंय असं वाटतं पण तो केवळ पत्ते लागून आलेला डाव आहे, केंव्हा परिस्थिती बदलेल काही सांगता येत नाही.
अस्तित्व आपल्याशी संवेदनेनी संवाद साधण्याचा प्रयत्न करतंय. संवेदना हा सगळ्या अस्तित्वाचा सजीव आणि निर्जीव सृष्टीशी संवादाचा दुवा आहे. तुम्ही कधी विचार केलाय, जमिनी खाली संपूर्ण अंधार आहे तरी झाडांची मुळं पाणी शोधतात, प्राण्यांना घर नाही की त्यांनी पुढची कसलीही सोय केलेली नाही पण भूक लागली की त्यांना भोजन कुठे मिळेल ती दिशा कळते, कुणी उपाशी मरत नाही, भुकेची संवेदनाच त्यांना काय खावं, किती खावं, कुठे मिळेल हे सांगते आणि त्यात कधीही चूक होत नाही.
आपल्याकडे संवेदना आहेच कुठे? फक्त झोप आणि उत्सर्ग या दोनच संवेदना उत्कट राहिल्या आहेत. भूक लागल्या सारखी वाटली तर आपण भुकेच्या संवेदनेकडे न बघता काय बघतो तर घड्याळ! मग विचारचक्र सुरू, जेवायची वेळ झाली का? पथ्य काय? प्रोटीन्स की फॅट्स? जेवताना सुद्धा विचार की जेवण झाल्यावर काय करायचं? अमक्या मालिकेतल्या तमक्याचं काय होणार? क्रिकेट असेल तर मग बाकी सगळं सोडून किती विकेट्स गेल्या, एवढे रन्स होतील का, अमका सेंच्युरी मारणार का? ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही असे एक ना अनेक प्रश्न घासाघासा बरोबर घेत जेवण म्हणजे 'झालं की नाही झालं? ' एवढ्या एका वाक्याशी संबंधीत ठेवलंय. म्हणजे फक्त आयटम टीक करायचा!
तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक माणूस एकच अभिलाषा घेऊन जगतोय की सगळं आपोआप व्हावं! तुम्ही बघा पैसा ही निव्वळ कल्पना आहे पण माणसाला पैशाची एवढी ओढ का आहे? त्याची अशी कल्पना आहे की इतके पैसे जमा झाले की बास मग नुसत्या व्याजावर काहीही न करता मजेत जगायचं! माझ्या स्वतःकडे फायनान्स मधलं भारतातलं सर्वोच्च क्वालिफिकेशन आहे आणि मी अत्यंत श्रीमंत लोकांबरोबर वावरतो म्हणून मी अतिशय खात्रीनं सांगू शकतो की सगळ्यांची एकच कथा आहे. काहींची मजल कोट्यावधीची आहे, कुणाची लाखांची आहे तर कुणाची काही हजारांची आहे एवढाच फरक आहे.
आता तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सगळं आपोआप चालावं ही माणसाची आंतरिक इच्छा का आहे? तर सगळं मुळातच आपोआप चाललंय! तुम्हाला वाटतं सगळं पैशावर अवलंबून आहे पण मजा अशी की सगळं श्वासावर अवलंबून आहे आणि तो आपोआप चालू आहे, कधी बंद पडेल काही सांगता येत नाही आणि एकदा बंद पडल्यावर कुणाला विचारायला जाणार! माणसानं बुद्धिमत्तेची इतकी परिसीमा केली आहे की विचारता सोय नाही, त्याला असं सांगितलं गेलंय आणि त्याला ते मनोमन पटलंही आहे की पैसा आहे म्हणून खायला आहे आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे. खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, श्वास चालू आहे म्हणून सगळं काही आहे!
हे सारं अस्तित्व आपोआप चालू आहे, ते चालवणारा कोणी नाही. अत्यंत प्रगल्भ निर्वैयक्तिक बुद्धिमत्ता जी आपल्या सगळ्यांना या क्षणी उपलब्ध आहे आणि मौनात संवेदनेनी आपण जिच्याशी लयबद्ध होऊ शकतो ती हे सर्व अस्तित्व निशःब्दपणे चालवते आहे. माणूस सोडून कुणालाही हे समजण्याची क्षमता नाही पण माणूस सोडून अवघे प्रकट जग नकळतपणे त्या बुद्धिमत्तेशी संलग्न आहे. पृथ्वी बिनदिक्कत फिरतेय, झाडं आनंदात डोलतायत, प्राणी निश्चिंत आहेत. फरक फक्त एकच आहे माणूस सोडून कुणालाही त्या वैश्विक बुद्धिमत्तेच्या विरुद्ध जाण्याचं स्वातंत्र्य नाहीये. माणसाला ते स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच माणसाला अस्तित्वाशी लयबद्ध होण्याची अपरिमित मजा ही कळण्याचा पर्याय खुला आहे.
निवड तुम्ही करायची आहे, ते तुमचं स्वातंत्र्य आहे. सगळं आपोआप चालू आहे हे मनोमन समजून घेऊन संवेदनेच्या अनुरोधानं अस्तित्वाशी मौनातला संवाद साधायचा आहे नाही तर 'छे असं कुठे असतं का' म्हणत स्वतःच आयुष्य सध्या चालू आहे तसं अनेक प्रश्न आणि ओझी घेऊन जगत राहायचं आहे.
संजय