ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
ओशोंच्या समाधीवर एक वाक्य आहेः 'ओशो, नेव्हर बॉर्न अँड नेव्हर डाईड, ही ओन्ली व्हिजीटेड दी प्लॅनेट अर्थ बीटवीन.. ' : आणि त्यांचा कालावधी दिला आहे. मी तुम्हाला सांगतो आपली सर्वांची हीच कहाणी आहे, आपण इथे सहलीला आलो आहोत. तुम्ही इथे काय केलं हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही किती रमलात हे महत्त्वाचं आहे.
इथल्या सर्वांशी आपले नाते संबंध केवळ मान्यतेचे आहेत, आपण सगळे फक्त सहप्रवासी आहोत. जीवनाची सहल करायची म्हणजे वेगळं काही करायचं नाही तर जिथे असाल तिथे आणि त्या परिस्थितीत फक्त मनोदशा बदलायची आहे. आपण सहलीला जातो तेव्हा जागेचा बदल जरी महत्त्वाचा असला तरी मूळ बदल चित्तदशेत झालेला असतो, तुमचा मूड लाईट झालेला असतो. हा लाईट मूड जर तुम्ही रोजच्या जीवनात आणलात तर हे जीवनच सहल होते.
हा लाईट मूड किंवा ही तरल चित्तदशा, निराकार तना-मनातून आरपार गेल्यामुळे येते. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पाठ टेकून शांतपणे कुठेही बसा आणि अशी कल्पना करा की सभोवतालची जागा तुमच्या शरीरातून आरपार जाते आहे. तुमची जाणीव सध्या शरीराच्या ज्या भागात असेल तिथून सुरुवात करा. जाणीव प्रथम जिथे शरीरात लवचीकता कमी असते तिथे जाण्याचा प्रयत्न करते (पाय किंवा पाठ), तुम्ही तिथून निराकार आरपार गेल्याची कल्पना करा, तो भाग तुम्हाला हलका झाल्याचं जाणवायला लागेल. तुमचे पाय, पाठ आणि हात जर तुम्हाला हलके झाले असं वाटायला लागलं तर तुमची जाणीव चेहऱ्यापर्यंत येईल.
या ध्यान प्रक्रियेचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, आपण जे मुळात आहे त्याचीच कल्पना करतोय त्यामुळे या ध्यान प्रक्रियेत कोणताही अडथळा येत नाही किंवा काही प्रयास जाणवत नाही. खरंतर आपण जे आहे त्याची कल्पना करतोय असं म्हणण्यापेक्षा जे आहे त्याच्याशी समन्वय साधतोय म्हणणं योग्य होईल.
तुमची जाणीव जर चेहऱ्यापर्यंत आली तर डोळ्याचे स्नायू शिथिल होतायत आणि निराकार डोळ्यातून आरपार होतोय अशी कल्पना करा, तुमच्या पापण्या हलकेच वर उचलल्या जातील आणि दोन्ही पापण्यांपाशी तुम्हाला सुखद गारवा जाणवू लागेल. तुम्ही इथं पर्यंत आलात तर पुढे एकच गोष्ट आहे, चेहऱ्याच्या अगदी मध्यभागी नाकाच्या बरोबर सरळ मागे एक उभी रेष आहे तिथे मनाचा उगम आहे, म्हणजे शब्द आणि चित्र तिथे सुरू होतात. तुम्ही निराकार शरीरात पूर्णपणे भिनवलात आणि अचानक तुम्हाला कसली तरी जाणीव झाली (बहुदा एखादा आवाज) तर त्या पाठोपाठ जिथे शब्द आणि चित्र उमटून त्या आवाजाचा अर्थ लावतात तो बिंदू म्हणजे मनाचा उगम. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे विश्व संपूर्ण शांततेनं व्यापलेलं आहे, ही वैश्विक शांतता मनाच्या बिंदूवर प्रस्थापित करा, तुम्हाला शरीर आणि मन एकदम शांत आणि हलकं झाल्याचं जाणवेल, आपण जवळजवळ नाहीच असं वाटायला लागेल, हा सहलीचा मूड आहे, या मूडमध्ये बुडून जा!
सहल ही काही कल्पना नाही तोच खरा जगण्याचा मूड आहे. तुम्हाला एकदा हा मूड कळला की तुम्हाला प्रत्येक प्रसंगात हलकं वाटायला लागेल, आजूबाजूचे लोक जरी गोष्टी सीरियसली घेत असले तरी तुम्ही गंभीर होणार नाही. तुमची विनोद बुद्धी जागृत व्हायला लागेल कारण गांभीर्याचं कारणच आपण प्रत्येक गोष्ट आपल्या अस्तित्वाला धक्का लावेल अशा विचारानं जगत असतो हे आहे, ती विचाराची पद्धत विनासायास बदलून जाईल. भीती हळूहळू वाटेनाशी होईल. आहे त्यात कसा मार्ग काढायचा आणि कशी धमाल आणायची हे तुम्हाला उलगडायला लागेल.
माझा एक मित्र मला म्हणाला की तुझं हे निराकार प्रकरण फार आंतरिक आहे, एखाद्याला निराकार गवसला की नाही हे बाहेरून कसं कळू शकेल? मी म्हणालो 'निराकार गवसलेल्याचा मूड बघ, तो नेहमी लाईट मूड मध्ये असतो, उत्साही असतो आणि त्याच्या अवतीभवतीच वातावरण बघ तो आहे त्या परिस्थितीत आणि जमेल तशी धमाल आणायचा प्रयत्न करतो, त्याच्या सहवासात तुम्हाला आपण इथे सहलीला आलोत असं वाटायला लागतं!
संजय