लमी सातवीत असताना शर्वरी कॉलनी सोडून गेली. तिच्या वडीलांची भोपाळ की इंदुरला बदली झाली होती. पण त्यांनी कॉलनीतला फ्लॅट विकला नव्हता. त्यांनी फ्लॅट विकला नाही याचा मला का आनंद व्हावा हे त्यावेळी कळले नाही. सातवी-आठवी पासून कॉलनीतील माणसं (एकेक रत्न) यांची ओळख मनात पक्की होत गेली. आणि जाणवलं, वरवर विचित्र आणि विक्षिप्त वाटणाऱ्या कॉलनीत एकी होती. आणि वैविध्याने नटलेल्या आमच्या या कॉलनीचे अंतरंग रंगीबेरंगी होते.
कॉलनीच्या सार्वजनिक आयुष्यात माझा प्रवेश गणेशोत्सवातून झाला. तेंव्हा मी नुकताच एस्.एस्.स्सी. होऊन, कॉलेजच्या पायरीवर डोकं टेकवलं होतं. नवस्वातंत्र्याचं वारं कानात भरलं होतं. व्यायामाची छाती आणि पिळदार बाहू फुरफुरत होते. कॉलनीच्या नाक्यावर जागतिक राजकारण, साहित्य, कला, क्रिकेट आणि तारुण्यसुलभ गोष्टी (त्याच जास्त) यावर चर्चा रंगायच्या. विचारांचे आदान प्रदान व्हायचे.
प्रौढांचे वर्चस्व असलेल्या गणपती उत्सवावर यंदा आपण वर्णी लावावी आणि मंडळ, तसेच एकूण कार्यक्रम हाती घ्यावा असा ठराव आमच्या नाक्यावर पास झाला आणि आम्ही त्या दृष्टीने कार्यास लागलो. कार्यक्रमात नाविन्य कसं आणावं? कुठून आणि किती बॅनर्स गोळा करावेत? यांचे हिशेब सुरू झाले.
प्रमुख पाहुणा म्हणून अमिताभला आणावं असं दिलीप म्हणाला.
'छे.. छे, तो कोटीच्या खाली येणार नाही' इति शरद.
'मग आपले किती जमताहेत?' पुन्हा दिलीपचा भाबडा प्रश्न.
'कांही हजार जमतील' अविनाश.
हॅ...मग काऽऽय?' एवढ्या लहानसहान गोष्टीसाठी मला त्रास देऊ नका बाबा. असा दिलीपचा आव.
'मुक्रिला बोलवूया' ग्रुप मधे सहसा तोंड न उघडणाऱ्या प्रदीपला बजेटमधील तफावत मनाला फारच लागलेली दिसली.
शरद म्हणाला,' कोणाला बोलवायचे ते नंतर ठरवता येईल. आधी बॅनर्स आणि वर्गणी गोळा केली पाहीजे.'
ज्येष्ठांना बरेच मनवून शेवटी मंडळात आमची वर्णी तर लागली. सुरुवातीला स्वयंसेवकगीरी, मुर्ती आणायला जाणे, स्टेज उभारणीत मदत अशी दुष्काळी कामं आमच्या वाट्याला आली. पण शरदने, ज्येष्ठांनी बाजूला होऊन तरूण रक्ताला वाव द्यावा असा विचार मांडला. एकदम रक्त वगैरे भाषा आल्यावर, नेने, लिमये, देशपांडे वगैरे ज्येष्ठांनी 'काय लागेल ते करा' असे म्हणून काढता पाय घेतला. वर्गणी आणि बॅनर्स गोळा करणे वाटले तितके सोपे गेले नाही. एका राजकिय पक्षाच्या शाखाप्रमुखाने आधीच दुकानदारांना दम मारून बॅनर्स वगैरे त्यांच्या गणपतीसाठी पळविले होते. कॉलनीत ज्याची भरपूर गिऱ्हाईके होती त्या, प्रेमजीभाईंनी फक्त ५००० रुपये दिले. ते पण एक दिवस शेठ-शेठाणीला, 'ते पुजेला बसाचा मान चोक्कस मिलाला पाहीजे' हे कबुल करवूनच. एकूण ५५ हजार रुपये गोळा झाले. मांडव, भटजी, मुर्ती, पुजेचे सामान, तिर्थ-प्रसाद, स्थानिक कलाकारांचे नाटक वगैरे खर्च वजा जाता प्रमुख पाहूणी म्हणून निरमा गर्ल सोनाली बेंद्रेची - लुक-अलाईक - सोनी निर्मा हिला बोलवावे अशी टूम कोणी तरी काढली. त्याला ज्येष्ठांनी आक्षेप घेवून अशोक सराफचे नांव पुढे केले. पण तोही आकडेमोडीत मोडीत निघाला आणि शेवटी एका रिमिक्स चॅनलचा DJ महेन्द्र धानी याला बोलवायचे ठरले. तो ओळखित फुकटात येवू शकणाऱ्यातला होता. (त्याला कोणी बोलवायचे नाही, पण त्याला 'सामाजिक कळकळ आहे' असे कोणीतरी म्हणाले.)
आम्ही तरूणांनी (आणि तरूणीनी) मांडवातली व्यवस्था उत्तम ठेवली होती. श्रीच्या आगमनापासून, पुजा, गुरूजींची व्यवस्था, आरत्या वगैरे जोरदार झाले. पहिल्याच दिवशी DJ महेन्द्र येणार म्हणून पन्नाशीच्या पुढील बायकाही आपापले वजन आणि आकारमान विसरून मेक-अप् आणि चमचमणारे वस्त्रप्रावर्ण लेऊन विशोभित होऊन बसल्या होत्या. याच बायका सकाळच्या आरतीला घरच्या स्वयपाकाचे कारण सांगून, प्रसादासाठी नवऱ्यांना पाठवून, स्वतः फेशियल आणि पायाची नखे रंगवण्या पासून, डोळ्याखालील काळी वर्तुळे लपविण्याच्या मागे लागल्या होत्या. नवरे बिचारे 'हुकमाचे ताबेदार' असा चेहरा करून (पण, अचानक मिळालेल्या स्वातंत्र्याने, मनाने 'हरखल्या' अवस्थेत ) मांडवात आले होते.
संध्याकाळी DJ महेन्द्र धानी त्याच्या होंडा ऍकॉर्डमधून आला. त्याला घ्यायला आमचे कार्यकारी अध्यक्ष विनायकराव काळे तुरुतुरू पुढे गेले. पण गाडीतून DJ म्हणून जो प्राणी खाली उतरला त्याला पाहून, टीव्हीवर फक्त बातम्या आणि आसाराम बापूंची प्रवर्चनं पाहणाऱ्या विनायकरावांना हृदयविकाराचा सौम्य झटकाच येऊन गेला असणार. असंख्य साखळ्या असलेली, काळी, रेग्झीनची पँट, त्यावर बिनबाह्यांचे, दिल्ली दरवाजावर हत्तीने धडका देऊ नये म्हणून जसे खिळे असतात तसे स्टेनलेस स्टीलचे खिळे असलेले रेग्झीनचे जाकिट, डाव्या मनगटावर, आपल्या घरी गजराचे असते त्यापेक्षा थोडेसेच लहान धड्याळ, उजव्या मनगटात, राजस्थानी बायका पायात घालतात तसे जाऽऽड कडे, डोक्यावर मध्यभागी रोमन सैनिकासारखा दोन इंच जाडीचा पट्टा सोडून बाकी डोके भादरलेले आणि डाव्या कानात माधवराव पेशव्यांसारखा डुल आणि त्यावर कानाच्या कडेकडेने कडेकडेने तीन-चार बारक्या रिंगा. असा DJ महेन्द्र धानी गाडीतून उतरल्या पासून कानाला लावलेल्या CD वॉकमन मधून बाहेरच्यांनाही कर्कश्य वाटावे एवढ्या जोरात संगीत (?) ऐकत आणि लोकांशी नुसती मुक्या-बहिऱ्याची भाषा बोलत (?), हातवारे करीत, कोणाला नुसताच OK? असा अंगठा दाखवत कार्यकर्त्यांच्या घोळक्यातून व्यासपीठाकडे चालू लागला. त्याला हार घालायला गेलेले विनायकराव तरूण तरूणींच्या धक्काबुक्कीत केंव्हा मागे पडले, त्यांच्या हातातून कोणी हार काढून घेऊन, त्या DJ च्या रूंद गर्दन मध्ये अडकवला हे त्यांना कळलेही नाही. महेन्द्र धानीने तो हार दुसऱ्या सेकंदाला गळ्यातून काढून त्याच्या महिला चाहत्यांच्या दिशेने भिरकावला. खुद्द पांडुरंगाच्या गळ्यातील हार प्रसाद म्हणून मिळाल्यावर वारकऱ्यांना जो आनंद होईल तसा आनंदकल्लोळ बायकांमध्ये उसळला आणि शार्क माशांना टाकलेल्या मासांचे जसे, त्यांच्यात हिसकाहिसकी होऊन, क्षणार्धात तुकडे तुकडे व्हावेत तशी अभूतपूर्व हिसकाहिसकी, त्या महिला चाहत्यांमध्ये झाली. १२५ रूपये किमतीच्या हाराच्या अवशेषांसाठी होणारी खेचाखेच अध्यक्ष विनायकराव काळे असहाय्य नजरेने बघत राहीले.
व्यासपीठावर DJ महेन्द्र धानीच्या आजूबाजूला अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि ३ नंबर बिल्डींग मधल्या शकुंतला बाई बसल्या होत्या. सौ. शकुंतलाबाई धामणकर कमिटीवर नव्हत्या. त्यामुळे, 'ही धामण, स्टेजवर कशी?' असा एक जळका प्रश्न DJच्या महिला चाहत्यांमध्ये चर्चेस आला तेंव्हा धामणीच्या मुलाच्या ओळखीत महेन्द्र धानी कॉलनीत आला आहे अशी अमुल्य माहीती कोणीतरी पुरवली.
'तरीच मेली इकडेतिकडे सळसळतेय.' मागून आवाज आला.
'मुलगा कुठाय पण?' कोणीतरी विचारलं.
'तो असेल कुठेतरी अंधारात सिगारेटी फुंकत नाहीतर टाटा ट्रकच्या (सौ. काळे) पोटी जन्मलेल्या काँटेसाच्या (काळ्यांची मुलगी, जयू) मागे.' बऱ्याचशा बायका फिसफिसल्या.
'काय माहित, मुलाची ओळख आहे की हिचीच मेलीची 'ओळख' आहे ते.' कोणीतरी मोठ्याने कुजबुजली.
'एऽऽ च्चल्लऽ. चहाटळ कुठली मेली.' आता बायका मनमोकळ्या फिदफिदल्या.
तिथे व्यासपीठावर काळे हातातल्या कागदावर पाहून पाहुण्यांची ओळख करून देत होते. (त्याच बरोबर त्यांनाही पाहूण्यांची ओळख होत होती.)
'आज मोठ्या नशीबाने आपल्याला लाभलेले आजचे पाहूणे हे दूरदर्शनचे ('रिमिक्स चॅनलचे' प्रक्षकांतून ७-८ तरूण-तरूणींनी माहिती पुरवली) होय होय मला माहीत आहे. दूरदर्शन म्हणजे टी.व्ही. असे मला म्हणायचे आहे. ते एक महान पी. जे. आहेत. ('डी.जे.' 'डी.जे.' इती घोळका) (हातातल्या कागदावर पाहात) इथे पी.जे. लिहीले आहे. ('डी.जे.' 'डी.जे.' पुन्हा, घोळका, काळ्यांनी आपल्या गोऱ्या कपाळावरील घाम पुसला) बरं, डी.जे...... त्यांचा संगीताचा व्यासंग थोर आहे. (डी.जे. महेन्द्रचे तिकडे लक्ष नव्हते.) अनेक जून्या गाण्यांना नवीन चाली लावून त्यांनी ('वाट लावली आहे' कोणीतरी ओरडले, काळ्यांनी त्या दिशेने फक्त चष्म्याच्या वरून पाहीले) ती गाणी तरूण वर्गापर्यंत पोहोचवली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अपूर्व आहे. ('योगदान' हा काळ्यांचा आवडता शब्द आहे) मी त्यांना दोन शब्द बोलण्याची आणि आपल्या कॉलनीतल्या तरूणांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.'
डी.जे. महेन्द्र आपल्या कानात वाजणाऱ्या कर्कश्य संगीतावर हातवारे करीत होते. त्यांना कोपराने ढोसून उपाध्यक्षांनी बोलण्याची विनंती केली.
महेन्द्र धानी पंजाबी असल्यामुळे हिन्दीतूनच बोलले.
'हे...गंपतीबाऽऽपा.... नमस्खार.' सर्व कॉलनी भर टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या झाल्या. 'आपने मुझे यहाँ भुलाया हय ('त्यांना 'बुलाया' म्हणायचे असावे' इती तात्या, शेजारच्याच्या कानात.) आज हमाऽऽर्री भारथिय संस्खृती पिछे हट रही हय l इसके लिए टीव्ही ही जिम्मेदार हय l ( याला म्हणतात 'भूतके मुंहसे रामनाम') असेच कांही कांही अगम्य भाषेत तो बोलत राहीला आणि शेवटी 'पुराने शायरोंने अच्छे अच्छे गाने लिखे ना होते तो रिमिक्स कंहासे आता?' असा श्रोत्यांपुढे सोज्वळ प्रश्न टाकून खाली बसला. पुन्हा एकदा टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या टाळ्या कॉलनीभर वाजल्या. नंतर DJ, शकुंतलाबाई धामणकर, त्यांचे यजमान आणि मुला समवेत त्यांच्या घरी, ३ नं बिल्डींग मध्ये गेला. झालं. आख्खी कॉलनी ३ नं. बिल्डींग मधे गोळा झाली. गणपती बिचारा एकटा पडला.
या गणपती उत्सवा नंतर कॉलनीत बरीच भांडणं झाली. हिशोबावरून, DJला आणण्यावरून आणि शकुंतला बाईंवरून. प्रौढांनी हिच संधी साधून मंडळ पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि तरूणांनी, 'पुढच्या वर्षी गणेशोत्सव होतोच कसा, तेच पाहातो' असे म्हणून बंडाचे शींग फुंकले.
त्यातल्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे शर्वरी परत आली होती.
क्रमशः