हिंदुस्तानी संगीत ० - प्रास्ताविक

रसिकहो,
माझ्या छोट्याशा प्रस्तावाला मिळालेल्या आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे ही लेखमाला सुरु करण्याचे धारिष्टय करीत आहे. याद्वारे उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अल्प परिचय करून देण्याचा उद्देश आहे. आपले अनुकूल प्रतिसाद मिळाल्यास पुढील लेख लिहिण्यास मनोधैर्य येईल व वाढेल.
हा पहिला- नव्हे शून्यावा - लेख आहे. 
लेखापूर्वी थोडी पार्श्वभूमी
 सांगणे आवश्यक वाटते.
संगीताच्या बाबतीत सुशिक्षित होण्याचे भाग्य मला लाभले नाही, असे असूनही चांगल्या मित्रांचा सहवास व चांगले गायन ऐकायला मिळाल्यामुळे मी स्वतःला सुसंस्कृत समजतो.
परंतु अशा व्यक्तीने संगीतासारख्या अथांग विषयावर लिहिले तर त्यात अनेक त्रुटी राहून जाण्याची व चुका होण्याची शक्यता आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजे.
म्हणून मी श्री. तात्या व इतर संगीततज्ज्ञ मनोगती यांच्याकडून या व पुढील लेखांत वेळोवेळी असे दोष दाखवून देण्याची व यथायोग्य सुधारणा करण्याची अपेक्षा ठेवतो आहे.
दुसरी एक गोष्ट म्हणजे लिहिताना बहुतांशी स्मरणाचा आधार आहे, कुठलेही संदर्भ पुस्तक किंवा पेटीसदृश वाद्य माझ्या हाताशी नाही (त्याशिवाय धकून जाईल असे या क्षणी तरी वाटते आहे, बघूया). काही गडबड झाल्यास आपण क्षमाशीलपणे काणाडोळा कराल ही आशा करतो. 

हे लेख कोणासाठी आहेत?
अशांसाठी की
ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण अजिबात समजत नाही;
ज्यांना स्वर, सप्तक, कोमल-तीव्र, थाट, राग, ताल, इ. हे काय असतात हे माहीत नाही व समजून घेण्याची इच्छा आहे;
ज्यांना दोन सूर ऐकले की ते एकच आहेत की वेगळे आहेत हे (साधारणपणे) कळते (*** टीप पहा).
सामुग्री कोणती हवी?
बहुतेकांकडे हार्मोनियम (जुन्या भाषेत बाजाची पेटी) किंवा कॅशिओ वा तत्सम कळपट्टीवाले वाद्य असते ते पुरेसे आहे, नसल्यास शक्यतो उसने घेऊन का होईना जवळ ठेवावे. नुसते वाचून फारसे कळायचे नाही, हॅन्डस-ऍन्ड-ईअर्स-ऑन चा फायदा अधिक. 
मुख्य म्हणजे प्रयोगशीलता व फुरसत हवी. वाचून सोडून दिल्यास (प्रशासकांचा) पैसा वसूल होणार नाही.
यातून काय मिळेल (व खरे म्हणजे काय मिळणार नाही)?
संगीताची समज वाढू शकेल. ऐकण्यातली मजा वाढू शकेल.
संगीताच्या भाषेचा परिचय होईल, पुढील ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्यापुरती कुवत येऊ शकेल.
पण या मुदलावर तुम्ही गाण्याचे कार्यक्रम करू शकणार नाही. (वसंतराव किंवा कुमार गंधर्व यांच्याप्रमाणे) स्वतः प्रतिभावंत असल्याशिवाय गुरूकडून शिकण्याला
पर्याय नसावा. आणि उच्च पातळीवरील ज्ञान देण्याची कुवत प्रस्तुत लेखकाकडे नाही.
कुठल्याही बिंदूवर दिलेली माहिती अतीच प्राथमिक आहे असे वाटल्यास खुशाल लेख बंद करून ठेवून द्यावा.
पण न पटल्यास वा न समजल्यास लेखकाला जरूर धारेवर धरल्यावाचून राहू नका ही शेवटची विनंती.


तर पुढील लेखापासून शुभारंभ करूया - 


   रे           नी      रे           नी     रे           नी     रे     
सा  रे  ग म  प  ध  नी सा  रे  ग म  प  ध  नी सा  रे  ग म  प  ध  नी सा  रे  ग


---------------------------------------------------------------- *** टीपः
दोन सूर ऐकले की ते एकच आहेत की वेगळे आहेत हे (साधारणपणे) कळणे -
ही अपेक्षा म्हटले तर माफक, पण खोलात गेले तर महाभयानक व महाकर्मकठीण आहे याचे मला पक्के भान आहे. कोणीही बऱ्यापैकी संगीत समजणारा असली अपेक्षा ऐकून बहुधा हात जोडेल व हार पत्करणे पसंत करेल हेही मान्य. जाणकारांनी मी वापरलेल्या "साधारणपणे" या शब्दाची दखल घ्यावी एवढीच विनंती, इतरांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
तरीसुद्धा ही गोष्ट माझ्या मते (युक्लिडच्या पाचव्या गृहीताप्रमाणे) महत्त्वाची किंवा क्रिटिकल आहे.
माझ्या समजुतीप्रमाणे या गोष्टीची समज बहुतेकांना असतेच, पण एखाद्याला हे दुदैवाने जमत नसेल तर या लेखांच्या उपयोगाला मर्यादा पडेल ही कटु नोंद नाइलाजाने करावी लागत आहे. नंतर अपेक्षाभंग होणे नको.