अशी वाट चोखंदळावी स्वतःचीअशी वाट चोखंदळावी स्वतःची
जिथे पावले गात जावी स्वतःची
पुन्हा आत पाहून गर्दी परतलो
अशाने कशी भेट व्हावी स्वतःची?
तुझे ओठ माझे, तुझे शब्द माझे
कशी कौतुके मी करावी स्वतःची?
फुलावा तुझ्या अंगणातील चाफा,
तशी गंधवार्ता मिळावी स्वतःची
अशी ओळ वेचून घ्यावीस ओठी,
खुशाली मलाही कळावी स्वतःची
कुणा मोगरा मी, कुणा सोनचाफा
कशी जात मी ओळखावी स्वतःची?
असे हे कसे भान विसरून जाणे?
स्मरावे कुणा, याद यावी स्वतःची!