माणसे: अरभाट आणि चिल्लर - ९

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ८  येथून पुढे. 

प्रिन्सिपॉलच्या खोलीत असलेल्या शिक्षकांपैकी एक रेगे होता. रेगे मास्तर म्हणजे कोणत्याही बातमीचा तोंडी छापखानाच होता. त्यांनी ती हकीकत सार्‍या शाळेत पसरवली. मी तर उड्या मारतच घरी परतलो. कारण ती  हकीकत मला घरी सांगायची होती.

तोपर्यंत करंदीकर आजोबा घरी येऊन बसले होते. ते अगदी आवळ अशी विजार घालून गुडघ्यापर्यंत पोहोचणारा कोट घालत, आणि वर किरमिजी रंगाची पगडी घालत. पण खुर्चीवर बसल्यानंतर मात्र पगडी बाजूच्या टेबलावर असे व ते करड्या केसांवर हात फिरवत दादांची वाट पाहत बसत.त्यांच्या झगझगीत पगडीचा रंग मला फार आवडे. पण ती डोक्यावर स्थिर कशी बसते, हे मात्र मला कधी समजले नाही. मी त्या घरात शिरताच ते म्हणाले, "लेको! वाटेत रेगे भेटला होता. तुझ्या त्या प्रिन्सिपॉलने म्हणे खादी गुरुजीला चांगलाच जामला! आता किट्टूकडून चहा उकळला पाहिजे बघ!" दातार मास्तरांचे नाव कृष्णराव होते. करंदीकर आजोबांना कृष्णरावाचे किट्टू हे लाडिक कानडी रूप वापरायला गंमत वाटे.

इतर तासांच्या वेळी मास्तर आम्हाला सहल घडवून आणल्याप्रमाणे हिंडवून आणत. आंबे-फणसांचा उल्लेख आला की हिरवे तळकोकण म्हणून दाखवत. मग त्याबरोबर "तुडुम तुडुम तरि झडे नगारा" ही आलीच. त्याबरोबर त्यांचा पवित्रा बदले. त्या मानाने त्यांना बालकवींविषयी फारशी ओढ वाटत नसे. फूल म्हटले की कसले फूल ? गोकर्ण, जाई की झेंडू? असे त्यांना नेमके नाव पाहिजे असे. "फुलराणी कोणत्या फुलाची कळी होती?" "बालविहग कोणता पक्षी होता?" "निरनिराळ्या निवळ रंगीत धुक्यात माझे मन रमत नाही." अशा त्यांच्या तक्रारी असत.

त्यांना हवा असलेला वजनदार रेखीवपणा "औदुंबर" या कवितेत आढळत असल्यामुळे ती त्यांची फार आवडती कविता होती. पण ती म्हणून दाखवल्यानंतर ते हटकून म्हणत, ही शेवटची ओळ निराळी होती की काय कुणास ठाऊक ! "पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर." असला, ऐसा औदुंबर म्हणजे कसला औदुंबर? या ओळीच्या आधीच्या ओळी काही औदुंबराच्या वर्णनाच्या नाहीत. मग असला का म्हणायचे? मला वाटते, "पाय टाकुनी जळात बसला येथे औदुंबर" ही ओळ जास्त बरी आहे. मूळ हस्तलिखितात कोणता शब्द आहे हे एकदा मला पाहिले पाहिजे. 'श्रावणमास' या कवितेत श्रावणमासी हर्ष मनासी की हर्ष मानसी? दोन्ही अर्थाने एकच, पण बालकवींचा शब्द कोणता? बरीच वर्षे मास्तरांनी तसे काही केले नाही. कारण मग ते गडकर्‍यांमध्ये कायम बुडून गेले.

त्यांच्या तासाला तातू सामंताला जर काही प्रश्न विचारायचे असले तर फारच रंगत येत असे. हा तातू सामंत म्हणजे एक पिशानवल्ली पोरगा होता. त्याच्या डोक्याला बरोबर बसणारी टोपी जगात अद्याप निर्माण न झाल्याप्रमाणे एक टीचभर टोपी तुळतुळीत डोक्यावर कुठेतरी ठेवून बेडूक डोळ्यांनी समोर पाहत तो वर्गात स्वस्थ बसलेला असे. तो पेन्सिल देखील ओठाजवळ एखाद्या चिलमीप्रमाणे धरी. त्याची ही सवय सुधारायच्या बाबतीत सार्‍याच मास्तरांनी हात टेकले होते व चिलम्या सामंत असे त्याचे नाव पडून गेले होते. त्या वेळी वर्गाला खेळ सक्तीचे असत. केवळ त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तो ग्राउंडवर दिसे. फुटबॉलच्या वेळी तर तो इतरांच्यापेक्षा जास्त वेगाने धावे. पण ते फुटबॉलला पाऊल मारण्यासाठी नव्हे, तर तो धावणारा फुटबॉल आपल्याला खाऊन टाकण्यासाठी आपल्या मागे लागला आहे, असे वाटून त्याच्यापासून सुटण्यासाठी. तेथून सुटून तो एकदा परत आला व धापा टाकत पेन्सिल तोंडाशी धरून बसला की घंटा होईपर्यंत जगाला हरवलाच.

कातडी फुग्याला लाथा मारणे किंवा फळकुटाने चेंडू बडवत राहणे हे अगदी खुळचटपणाचे काम आहे, असे तो स्पष्ट सांगत असे. त्यामुळे तो वर्गात फारसा लोकप्रिय नव्हता. त्याच्या घरी फक्त त्याची आईच होती. अगदी थेट सांगाड्याप्रमाणे दिसणारी तशी दुसरी बाई आम्ही कधीच पाहिली नाही. तातूला घरी जायला पाच मिनिटे जरी उशीर झाला की ती शाळेच्या कोपर्‍यावर येऊन थांबे, आणि तातू येताच त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागे. याबद्दल पोरे कधी तातूची चेष्टा करत, पण तो अगदी मख्खपणे चालत असे. त्याने कधी आईचा हात खांद्यावरून काढला नाही, की शाळेकडे येऊ नकोस असे तिला बजावले नाही. तातूबरोबर कुणी घरी गेले की त्याची आई बशीभर पोहे देत असे. खोबर्‍याचा स्पर्श देखील नसलेले ते पोहे हाडाच्या तुकड्यांप्रमाणे वाटत आणि ते खाताना आमचे त्राण संपे. त्यात भर म्हणजे ती बशीत थोडे देखील उरवू देत नसे. आमच्या पाठीवर हात ठेवून बशीतले सारे संपवण्याचा तिचा आग्रह बशी रिकामी होईपर्यंत चालूच असे. जर कधी कुणी दातदुखीची सबब सांगितली, तर ती लाहीपीठ देत असे. पण तो घट्ट काळसर गोळा पाहताच भूक लगेच मरत असे, व त्यापेक्षा पोहे परवडले असे वाटू लागे.