माणसे: अरभाट आणि चिल्लर - ५

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ४  येथून पुढे.



पण या धर्मराजामुळे मी गोत्यात आलो. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर तर घातलेच, शिवाय प्रगतिपुस्तकावर 'उद्धट' असा शेरा लिहिला. त्यामुळे मला घरी देखील सक्तमजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या काही गोष्टी घडल्या. नाही असे नाही. उत्तम मराठी हस्ताक्षरासाठी मला दोनदा बक्षिसे मिळाली. आमच्या शाळेचे अद्याप देशीकरण झाले नव्हते. आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. एकदा डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल होते. निळा सूट घालून ते सावकाश शाळेभोवती फिरू लागले की 'ऐरावत' सरकत असल्याप्रमाणे दिसत. अशा फेऱ्या घालत असता त्यांच्या कोटाच्या बाहीत वेताची छडी असे. ती काही केवळ शोभेसाठी नसून तिची सणसणीत ओळख अनेकांना झाली होती. त्या दिवसांत प्रत्येक वर्गात मोठी चित्रे लावली जात. एकदा हिल आमच्या वर्गात आले व त्यांनी विचारले, "हे प्राचीन ऍम्फिथिएटर कुठे आहे?" खरे म्हणजे त्या चित्रावरच' रोम' असे लिहिले होते. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी विचारले, "रोम कुठे आहे?"


त्यावर मी भीत भीतच, उत्तर दिले, "इटलीत" भीतभीतच कारण त्यावेळी इटली व इजिप्त यांबाबत माझ्या मनात बराच गोंधळ होता. "You are right" म्हणत त्यांनी माझे नाव लिहून घेतले. थोड्या वेळाने शिवाप्पा एक नोटिस घेऊन आला. साहेबाने मला ताबडतोब बोलावले होते. ते ऐकूनच माझे अवसान संपले. कारण साहेबाकडे गेलेला कोणताच मुलगा सरळ चेहऱ्याने परत येत नसे. ड्रिलमास्तर नातू यांनी तर कुत्सितपणे सांगितले, "हाताला खोबरेल नाही तर साबण लावून जा. म्हणजे छड्या मऊ वाटतात."


पण तसे काही घडले नाही. मी ऑफिसमध्ये जाऊन उभा राहिल्यावर साहेबाने एक टाक काढला, व तो म्हणाला, this is for you." मी 'थँक्यू' म्हणून बाहेर पडलो, तो वर्गाबाहेर येऊन थांबलो. टाक म्हणजे काचेच्या नळीत पोपटाच्या कोवळ्या पिसांच्या रंगाचे पाणी होते व त्यात मोहरीएवढा लहान मासा होता. टाक वर-खाली केला की हा काचेचा मासा जिवंत असल्याप्रमाणे वर-खाली होत असे. खरे म्हणजे टाक म्हणून त्याचा काहीच उपयोग नव्हता. शाईत बुडवून त्याने लिहायला बसले की शाई ओघळून मनगटावर येत असे. पण हिरव्या पाण्याचा रंग मात्र अतिशय आकर्षक वाटे. रोम इटलीमध्ये आहे, ही काही ज्ञानाची परमावधी नव्हे. पण तो टाक मी आज देखील जपून ठेवला आहे.


तेव्हा पासून मात्र सारे स्वच्छ मोकळे वाटू लागले. दातार मास्तर प्रथमच आमच्या वर्गावर आले, आणि आम्ही  अगदी मॅट्रिक होऊन बाहेर पडेपर्यंत आम्हाला टिकले. त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवले, गणित शिकवले व विशेष म्हणजे ते मराठीचे तास घेत. दुसरे अविस्मरणीय शिक्षक म्हणजे सायमन. साधारणपणे कोट, ऐसपैसपणे उडत असलेले धोतर, किंवा स्वच्छ आभाळापेक्षा भूमातेलाच जास्त जवळ असणारे काचा मारलेले धोतर व आखूड कोट एवढे कपडे पुरेसे मानणाऱ्या त्या शाळेत सायमन मात्र अत्यंत नीटनिटकेपणाने सुटात येत. त्यांचे अनेक रंगांचे टाय होते. टायवर झगझगीत पिन असे. कोटाच्या वरच्या खिशात हातरुमालाची टोकदार त्रिकोणी घडी असे. ते जवळून गेले की सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस जवळून गेल्याप्रमाणे वाटे. पण माणूस मात्र कुर्रेबाज. त्याला कुठल्या अलबत्या-गलबत्याची सलगी खपायची नाही, की काही वावगे खपायचे नाही. मागच्या बाकांवर बसणारी निबर नापाशी पोरे तर त्यांच्या दृष्टीने रजिस्टरमधील नुसती नावेच होती. कुणी इंग्रजी निबंध पेन्सिलीने अगर लाल शाईने लिहिला तर वही गेलीच खिडकीबाहेर. वसू केळकरने निबंधाच्या एका वहीत वर श्री काढून त्याखाली कुठल्या तरी मोठ्या पोटाच्या स्वामीचे चित्र लावले, तर खिडकीतून बाहेर फेकलेली वही शोधायला त्याला पाच मिनिटे लागली.


 त्यावेळी आम्हाला रॅपिड रीडिंग नावाचा एक खुळचट विषय होता. त्यात आम्हाला दोनशे ओळी इंग्रजी कविता वाचाव्या लागत. रॅपिड म्हणजे काय याचा अर्थ मला अजूनही ठाऊक झालेला नाही. सायमन मास्तरांनी ग्रेची 'एलिजी' शिकवायला वीस तास घेतले. त्यावेळी अनुभवलेला थरार अजूनही कधी तरी जागा होऊन आठवण उजळून जातो.


त्यानंतर टेनिसनची Tears, Idle Tears व अर्नोल्डची Forsaken Merman या कविता घेतल्या. ठरल्या ओळी होऊन गेल्या तरी सायमन मास्तरांचे रॅपिड चालूच राहिले. अ तुकडीच्या राव मास्तरांनी सगळाच मामला सात तासात खलास केला. नंतर ते डिक्टेशन घालून खुर्चीत स्वस्थ बसत. काही माणसांना कधी काव्याचा स्पर्श होत नाही, तर काहींची गाण्याची धुंदी उतरत नाही, हेच खरे. नंतर सायमन इंदूरला गेले. तेथे त्यांची बायको डॉक्टर होती, आणि सायमनना तेथील मिशनमध्ये काम करावे लागणार होते. जाताना त्यांनी काही वस्तू आमच्यापैकी काही जणांना वाटल्या. प्रभाकरला एक नक्षीदार दौत मिळाली. मला त्यांनी एक ऍटलास, चार जुनी व अत्यंत सुंदर ख्रिसमस कार्डे आणि दोनच थेंब अत्तर उरलेली बाटली दिली. अत्तर संपून गेले. कार्डे देखील कुठे नाहीशी झाली. पण त्यांनी शिकवलेल्या कविता मात्र देव्हाऱ्यातील चांदीच्या टाकाप्रमाणे मनात अगदी स्वच्छ आहेत. नंतर अनेक वर्षांनी स्वतः कविता शिकवण्याचे दिवस आले तेव्हा सतत वाटायचे, सायमन मास्तरांच्या शिकवण्यातील एक दशांश तरी माझ्यात यावा. पण तसे कधी घडल्याचे समाधान मिळाल्याचे मला आठवत नाही.


 


पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - ६