माणसे: अरभाट आणि चिल्लर - २

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १  येथून पुढे.


मास्तरांच्या स्वतःच्या शिक्षणाची झालेली परवड आम्हा सगळ्यांना माहीत होती. शाळेत वार्षिक परीक्षा आली की, आई किंवा वडील हटकून आजारी पडत व औषधपाण्यातच त्यांचे वर्ष फुकट जात असे. आपल्या हयातीतच मास्तरांनी बी. ए. व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती, पण ते मात्र घडले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदी विषय घेऊन बनारसला जाऊन मास्तर बी. ए. झाले व मोठ्या कष्टाने मिळवून टिकवून धरलेली त्यांची नोकरी सुसूत्र झाली. "तुमचे पेपर कसे गेले?" असे अनेकदा मास्तर विद्यार्थ्यांना विचारतात, पण खुद्द मास्तरांनाच तसे विचारण्याची संधी आम्हाला मिळाली. आम्ही तसे विचारले तर दातार मास्तर हसून म्हणत, "कसे गेले म्हणजे काय? गेले एका लहान पेटाऱ्यातून !" ते पास झाले हे समजताच आम्ही गोंगाट करून त्यांच्याकडे पेढे मागू लागलो. एरव्ही मास्तरांनी म्हटले असते, "आता जर आवाज कराल तर भोपळ्यांनो, तुम्हाला सगळ्यांनाच पाठवीन प्रिन्सिपलकडे. तेथे मग मिळतील वाट्टेल तेवढे पेढे !"


पण त्या दिवशी मास्तरांचे मन ठीक दिसत नव्हते. त्यांनी खिशातून हातरुमाल काढला, पण तो तपकीर पुसण्यासाठी नव्हे. तपकिरीचा हातरुमाल वेगळा होता. हा छोटा व स्वच्छ होता. ते खिडकीपाशी गेले व आमच्याकडे पाठ करून डोळे टिपून परतले. तरी सुद्धा त्यांचे डोळे अद्याप नानू बापटाप्रमाणे ओले होते. मग मात्र आम्ही खाडकन गप्प झालो व काही तरी वाचण्याचे ढोंग करू लागलो.


आमच्यापैकी काही जणांना मास्तरांचा एक विशेष जबरदस्त वाटे. दुसऱ्या शाळेतील आमचे दोस्त भेटले की आम्ही ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या नजरेस आणत होतो. पुस्तकावर किंवा पुस्तकात कुठे तरी ज्याचे नाव छापलेले आहे, तो लेखक मेलेलाच असतो, अशी समजूत करून घेण्याचे ते वय. पण मास्तरांमुळे बोलणारा चालणारा असा एक लेखक प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव आम्हाला मिळाला होता. दातार मास्तर म्हणजे न दुखवता हळूच कान पिरगाळणारे, किंवा "अरे भोपळ्या !" म्हणत बिनशिंगाचा राग दाखवणारे नुसते मास्तर नव्हते. मास्तर लेखक व कवी होते. त्यांचे चार-सहा लेख आणि बऱ्याच कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. ते लेख किंवा त्या कविता मला कधी पाहायला मिळाल्या नाहीत, पण आपल्या एका छोट्या नाटकाची प्रत मात्र त्यांनी मला दिली होती. देह-घर नावाच्या घरात अनेक आगंतुक माणसे घुसून राहिली होती. एकाचे नाव होते खादाड. तो सदोदित काही खात असे. दुसरा एक जण होता त्याचे नाव होते आळशी व तो नेहमी जांभया देत असे. आणखी एक जण झोपाळू नावाचा होता तो नेहमी झोपून आडवा पडलेला असे, त्यामुळे त्याला नाटकात फारशी भाषणे नव्हतीच. अशीच आणखी थोडी माणसे त्या घरात राहत होती. एक दिवस त्या घराचा मालक उद्योगराव येतो व छडीने बडवत सगळ्यांना हाकलून घालतो, आणि मग घर सुखाने शोभू लागते. या नाटकाच्या जोडीला मास्तरांनी सुबोध रामायण देखील लिहिले होते व त्यात त्यांची स्वतःची पाच चित्रे छापली होती. त्यांनी लिहिलेल्या दोन गाण्यांची तबकडीसुद्धा निघाली होती. ती गाणी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या मालती जांभेकरने म्हटली होती. त्या काळी रेकॉर्ड निघणे किंवा रेडिओवर कार्यक्रम मिळणे ही गोष्ट फार दुर्मिळ व डोळे दिपवणारी होती. आज रेडिओ आर्टिस्ट पैशाला मण भेटतात.


मालती जांभेकरचा एक कार्यक्रम रेडिओवर झाला म्हणून सुनंदा कामत तर आपल्या खोलीत बसून तेथेच चहा-जेवण मागवू लागली, आणि महिनाभर आपल्या जुन्या मैत्रिणींशी बोलली नाही. जांभेकरांना सगळ्या मुलीच होत्या व गल्लीत सारे जण त्यांना "हाच मुलींचा बाप" म्हणत. मालती ही त्यांची सर्वात थोरली मुलगी. ती स्वभावाने मुळातच थोडी जादा होती. आपणाला इतरांपेक्षा निराळी हवा श्वासोच्छ्वासासाठी लागते हे दाखवण्यासाठी ती नेहमी नाक वर करून चाले. आकाशाला नाक लावण्याची जर एखादी स्पर्धा असती तर मालतीला कायम बक्षीस मिळत गेले असते! पण या साऱ्याबद्दल आमचा तिच्यावर काहीच राग नव्हता. एक तर ती आमच्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी होती, आणि तिला तो तोरा थोडा शोभूनच दिसे. तिचा आवाज साखरपाकाच्या तारेसारखा होता आणि ती समोरून गेली की एखादा छबिना गेल्याप्रमाणे वाटे. शिवाय ती खरोखरच बुद्धिमान होती. नंतरच्या आयुष्यात तिने सगळ्या परीक्षांत फटाफट फर्स्टक्लास मिळविले, आणि ती पुण्याच्या एका कॉलेजात प्रोफेसर झाली. बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजे असताना त्यातील एखाद्या खानदानी कॉलेजात प्राध्यापक होणे हे छाती दडपून टाकण्याइतकेच यश होते. त्या वेळी आनंदाने व्याकूळ झालेल्या जांभेकरांचा चेहरा मला आज देखील आठवतो. स्वतः मॅट्रिकपलीकडे जाऊ न शकलेल्या या माणसाचे पाय जमिनीवर ठरेनात. या वेळी त्याने घरी जाऊन काय वाटले असेल - पेढे? छ्ट, त्यांनी गल्लीतील प्रत्येक घरात वाळ्याची एकेक लहान जुडी नेऊन दिली. यापेक्षा मूठभर दूर्वा देणे कमी खर्चाचे झाले असते अशी काही जणांनी त्यांची थट्टा केली. एकाने तर नारळाची शेंडी घरोघरी वाटणे हाच उत्तम मार्ग ठरला असता, असे सुद्धा सांगितले. कळवळलेल्या चेहऱ्याने जांभेकर आमच्या घरी आले व थोडा वेळ दादांबरोबर बोलत थांबले. ते फार खजील झाले होते. तरी ते शांतपणे म्हणाले, "भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा, आणि देऊन देऊन प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे." मालतीने नंतर तीन-चार पुस्तके देखील लिहिली, पण ती नंतरची गोष्ट आहे.


पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - ३