माणसे: अरभाट आणि चिल्लर - ४

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ३  येथून पुढे.


पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र त्यांना नेहमी दहापैकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागाने त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर म्हणाला, "तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्यानबाची मेख अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात. भारतातील बेकारी, युद्धे कशी थांबतील, दारुबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेड्यातील जीवन. दर खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरुन काढतो. मास्तर कधी तरी दोनचार वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हणून आम्ही आमच्या निबंधावर दहापैकी आठ किंवा नऊ असे मार्क सुद्धा लिहून ठेवतो. मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत. तर बायकोला वाटते मास्तरांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !"


पण दिवेकराचा अंदाज चुकला. मास्तरांनी या खेपेला 'खेड्यातील जीवन' हा विषय दिला आणि या खेपेला दिवेकर-जाधव यांच्या जोडीला माझी देखील तिसरी मोट कुरकुर आवाज करत चालू लागली, व आमच्या सगळ्यांच्या गोठ्यांतून गाई-वासरे हंबरु लागली.


भूगोलाला कुलकर्णी मास्तर होते. त्यांनी देखील एकदा मला वर्गातून हाकलले. ते अतिशय नाकातून बोलत. आमचा एक महिना तोंड गच्च दाबून धरून त्यांच्या बोलण्याची सवय करून घेण्यातच गेला. पण ते काय सांगतात हे ऐकण्याऐवजी ते कसे सांगतात हे पाहण्याची वृत्ती मात्र गेली नाही. आमच्या वर्गाला अगदी दरवाज्यापासून दुसऱ्या भिंतीपर्यंत मोठा सिमेंट बोर्ड होता. एकदा ते दरवाज्याजवळ उभे राहिले व हात जोडून त्यांनी बोर्डाच्या वरच्या कोपऱ्यापर्यंत नेले मग त्यांचा गुंजारव सुरू झाला.


"गंगा येथे उगम पावते, मग ती अशी हिमालयातून खाली येते." त्यांनी जोडलेले हात खाली आणून ओंजळ समोर धरली व गंगेचा प्रवास दाखवत ते पुढे निघाले. वाटेत ते खुर्ची सरकवून प्लॅट्फॉर्मवर चढले व तो ओलांडून पलीकडे उतरले व सरकत सरकत शेवटी बोर्डच संपला, तेथपर्यंत आले व त्या ठिकाणी तळवे उघडून "या ठिकाअणी गंगा समुद्राला मिळते," असे त्यांनी सांगितले. आता बोर्डच संपला म्हणून गंगा नदी त्यांचा आवाजातून निसटून धावत समुद्रात गेली. त्यांच्या इतक्या आवाजाच्या सवयीनंतरही मला हसू आवरले नाही. तेव्हा गंगेला सासरी पोचवल्यावर टेबलावर छड्या हाणत त्यांनी मला वर्गाबाहेर हाकलले.


खरे म्हणजे संस्कृतचे दामले मास्तर सावरी कापसाची आठवण व्हावी असे गुबबुबीत व सौम्य दिसत. ते जुनेच नव्हेत, तर प्राचीन होते. त्यांना वाढवून दिलेली दोन वर्षांची मुदत देखील आता संपत आली होती.


ते फार सौम्यपणे बोलत व रुईची केळ फुटल्याप्रमाणे त्यांच्याकडून शब्द येत. साऱ्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला कठोर शब्द वापरला नसेल, पण त्यांचाकडून देखील मी एकदा हाकलला गेलो. खरे म्हणजे ते एक रेकॉर्डच होते.


मास्तर स्वतः थोडे सद्गगदित होऊन धर्मराजाविषयी बोलत होते. पांडवंमध्ये धर्मराजाविषयी मला कधी फारसे आकर्षण वाटले नाही व त्याच्याविषयी जास्त माहिती करून घेण्याची कधी इच्छा झाली नाही. 'नरो वा कुंजरो वा' हा एकच क्षण त्याच्या आयुष्यात नाट्यमय ठरला. पण त्या क्षणातील क्रौर्य, कारुण्य ही त्याला कधी जाणवली होती की काय कुणास ठाऊक! धर्मराज म्हणताच त्यावेळी माझ्यापुढे एकच चित्र येत असे. संत चित्रपटांतील संत ज्याप्रमाणे हनुवटी वर करून डोळे ओलसर करून घोगऱ्या आवाजात बोलणारा, भक्ती, सत्य, सन्मार्ग, कर्तव्य असल्या शब्दांखेरीज एक वक्य न बोलणारा, उपदेशाची एकही संधी न सोडणारा, नातीचे नाक पुसताना देखील उपनिषदांतील एक अवतरण दिल्याखेरीज न राहणाऱ्या आचार्यांची जी एक पैदास नंतर दिसू लागली होती त्यांतील एक असल्याप्रमाणे वागणारा - थोडक्यात म्हणजे सगळ्याच do gooders प्रमाणे a bit of bore. पण मास्तर म्हणत होते, "अरे, तो इतक्या स्वच्छ मनाचा होता की तो दुर्योधनाला देखील सुयोधन म्हणत असे." त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले व म्हटले, "तुला काय वाटतं?"


त्यांनी तो प्रश्न मलाच का केला हे एक कोडेच होते. मी काही समोरच्या बाकावर नव्हतो. मी चौथ्या रांगेत अत्यंत निरुपद्रवीपणाने 'कालिकामूर्ती' वाचत होतो. त्यामुळे तो प्रश्न माझ्यावर येताच माझी धांदल उडाली. मी म्हटले, "सर, कोणते आईबाप 'वाईट' अशा अर्थाने सुरू होणारी नावे आपल्या मुलांना देतील? मुलीचे नाव दु:शीला ठेवतील? भुते-पिशाच्चे यांपासून संरक्षण व्हावे, व मुले दीर्घायुषी व्हावीत या हेतून दगडू, धोंडू, मसणू, उकीरडा अशी नावे काही वेळा दिसतात; पण या सगळ्याच शंभर एक मुलांची नावे तशी असतील का? तेव्हा 'दुर्' या अक्षरांना 'वाईट' असा अर्थ नंतर केव्हा तरी आला असला पाहिजे. शिवाय ही अक्षरे म्हणजे काही नंतर लावलेला एखादा उपसर्ग नव्हे. ती अक्षरे काढल्यानंतर उरलेल्या शब्दांना नेहमीच अर्थ उरतो असे नाही. तेव्हा कुठल्यातरी कीर्तनकाराने सूपभर तांदळांसाठी ही वावडी उडवलेली असावी. तरी बरे, धर्मराज आज हयात नाही. नाही तर त्याने 'बॅडमिंटन' ला 'गुडमिंटन' म्हटले असते."


 


पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - ५