माणसे: अरभाट आणि चिल्लर - १

माणसे: अरभाट आणि चिल्लर - प्रस्तावना येथून पुढे.


आता यापुढे इंग्रजी शाळेत जायचे म्हणताच मी अगदी हादरून गेलो होतो. पण तरी त्याबद्दल उतावीळ देखील झालो होतो. आधीची म्युनिसिपालिटीची शाळा अगदी अंगवळणी पडून गेली होती, आणि शाळा म्हटले की परुळेकर मास्तरांखेरीज कुणीच डोळ्यांसमोर येत नसे. ऊनपाऊस असो अगर नसो, परुळेकर मास्तर नेहमी छत्री वापरत व वर्गात आल्यावर ती ते फळ्याजवळच्या कोपऱ्यात ठेवत. ती मनाप्रमाणे व्यवस्थित ठेवण्यास त्यांना बक्कळ पाच मिनिटे लागत. अगदी लहान पोरांखेरीज सारेच जण ज्याला लक्कड म्हणत तो लखू तोपर्यंत फळा पुसून ठेवत असे, व खडूची पूड भरलेले फडके त्याचा विशेष राग असलेल्या पोरांच्या तोंडासमोर फडफडवत असे. मग तीन-चार उदाहरणे होत. त्यानंतर कविता सगळ्यांनी मिळून म्हणायच्या असत. त्या वेळी काही पोरे तोंड उघडे ठेवून शुंभासारखी उभी राहत, किंवा उगाच तोंड हालवत. नंतर मास्तर महादेव कणेरीला बोलावत. साऱ्या वर्गाला शुद्धलेखन घालायला सांगत. ते स्वतः बाहेर जात, आणि चहा घेऊन परत आल्यावर खुर्चीत बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागत.


आमच्या वर्गात आठदहा पोरांचा एक फर्मास घोळका होता. ते सगळे जण जमिनीवर रेघोट्या मांडून चिंचोक्याचा खेळ खेळत. आंब्याच्या दिवसांत कैऱ्या-मीठ खायची हीच वेळ असे. पुष्कळदा समोरील बिगर इयत्तेतील छोट्या पोरांना खिडकीतून खडे मारायची गंमत करण्याची हीच वेळ होती. वर्गात अगदी दाराशीच नामदेव खटावकर बसे. त्याच्याजवळ एक मोठी छडी होती. हेडमास्तर जिना चढून वर येणार असे दिसले की, तो छडी जोराने कपाटावर हाणू लागे. परुळेकर जागे होत व लगबगीने फळ्याजवळ जाऊन उभे राहत आणि काही तरी नाटकी लिहू लागत. सगळे चिंचोके, बसण्यासाठी फळ्या घातलेल्या असत, त्याखाली जात. हेडमास्तर येऊन गेले की मग आमचे सारे लक्ष घंटेकडे असे. हेडमास्तर आपले घड्याळ घरी तरी विसरत, किंवा ते बंद तरी पडलेले असे. म्हणून ते निंगू पाटलाला कोपऱ्यावरच्या शेटजींच्या दुकानात वेळ पाहून यायला सांगत. परत आल्यावर निंगू हटकून दहाबारा मिनिटे जास्तच सांगे. पण मास्तरांना घरी जायची घाई असली तर ते त्याच्यावर खेकसत. "जा पुन्हा बघून ये पोस्टात जाऊन. शेटजीचे घड्याळ मालकाप्रमाणेच नुसते बूड ओढणारे आहे." निंगू मग धावत जाऊन पाहून येई, आणखी पाच-सात मिनिटे वाढवून सांगे आणि मग पितळी तबकडीवर लाकडी हातोडा दणादणा बडवू लागे. यापेक्षा शाळा काही निराळी असते याची आम्हाला कल्पनाच नव्हती.


इंग्रजी शाळेविषयी आम्हाला पहिली जबरदस्त माहिती मिळाली, ती म्हणजे वर्गाला सर्वच विषयांना एकच मास्तर नसतात. दर तासाला नवे मास्तर. भूगोलाचे निराळे, मराठीचे निराळे. त्याशिवाय बसायला पुढे डेस्क असलेली बाके अगर लांब जोडलेल्या खुर्च्या असतात. मी फर्स्ट 'बी' मध्ये गेलो. त्या वेळी बरीच पोरे आधीच वर्गात येऊन बसली होती. मी आणि परशुराम खुर्च्यांवर बसलो, पण त्यांच्या अगदी अरुंद फळ्यांवर आम्हाला बसता येईना. आम्ही तसाच तोल सावरत कळ काढली. पुढल्या तासाला देशपांडे मास्तर आले. आम्हाला पाहताच ते समोर येऊन उभे राहिले व कमरेवर हात ठेवून आम्ही बेडूक असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहू लागले. ते म्हणाले, "अहो, सिंहासनवाले, खुर्चीवर सरळ बसता येत नाही की काय तुम्हा विक्रम राजांना?" त्यावर सगळी पोरे फिसकल्याप्रमाणे हसू लागली. मग एकाने सांगितले, "अरे, खुर्चीची फळी खाली टाक नि मग बस." आमच्या खुर्च्या घडीच्या होत्या. आम्ही अगदी ओशाळून गेलो.


मला वाटले होते, मी इंग्रजी शाळेत गेल्यावर आमच्या वर्गाला दातार मास्तर येतील. ते आमच्या घरापासून आठदहा घरेच सोडून राहत. आमच्या घरी त्यांची चांगली ओळख होती. पुष्कळदा आजोबा करंदीकर आणि अप्पा काळे आले की आमच्या घरी त्यांच्या तास न् तास गप्पा चालत, व दादा त्यांना अर्ध्या अर्ध्या तासाने चहा विचारत. पण मी आतून चहा आणून त्यांच्यासमोर ठेवला की, तेथून माझी हकालपट्टी होत असे. पण मास्तर सकाळी शाळेत जायला सायकलीवरून निघाले की आम्ही पाच-सात पोरे त्यांच्या मागोमाग जात असू. मास्तर कधी सरळ सीटवर बसत नसत. रस्ता थोडा चढ असल्यामुळे पिनवर पाय ठेवून ते उड्या मारत मारत जात व मग मध्येच उंच होऊन एखादी शिकार पकडावी त्याप्रमाणे सीट पकडत, आणि त्या वेळी चावट पोरे टाळ्या वाजवत. मास्तर निदान अर्धी गल्ली तरी अशा उड्या मारतच पार करत. दादा तर म्हणायचे, "हा किट्टू अशाच उड्या मारत आणखी थोडा पुढे गेला की शाळेतच जाऊन पोहोचेल. मग सीटवर बसण्याची गरजच राहणार नाही."


दातार मास्तरांमुळे तर दादांनी ही शाळा माझासाठी निवडली होती. पण पहिल्या तीन-चार वर्षांत मास्तर आमच्या वर्गाला आलेच नाहीत. कधी तरी भूगोल अथवा शास्त्र असल्या विषयाच्या बदली तासाला येत. पण मग ते आम्हाला काही तरी लिहायला सांगत इतकेच.


पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - २