माणसे: अरभाट आणि चिल्लर - ३

माणसे: अरभाट आणि चिल्लर - २  येथून पुढे.



आता एक लेखक, कवी व नाटककार म्हणून दातार मास्तरांविषयी आम्हाला उदंड अभिमान होता, व पुस्तकावर असलेले त्यांचे छापील नाव पाहून आम्हाला फार हेवा सुद्धा वाटे.


पहिली तीन वर्षे कशी गेली कोणास ठाऊक! पण प्रत्येक वर्षी दोन-तीनदा तरी वर्गातून बाहेर जावे लागले, हे मात्र मला आठवते. सडेकर मास्तर मराठी घेत व निबंध लिहायला सांगत. त्यांचे विषय चांगलेच ऐसपैस असत. आणि त्यांचा संबंध सगळ्या जगाशी किंवा बाजार उतरला तरी निदान अखिल भारताशी असे. भारतातील बेकारी कशी नाहीशी होईल? युद्धे कशी थांबतील? देशभक्ती इत्यादी. त्यांचे सगळेच विषय आमच्या आवाक्याबाहेर असत व त्यांच्याविषयी आम्हाला काहीच आवड वाटत नसे. आज चाळीस-पन्नास वर्षांनंतर देखील जगातील युद्धे थांबवण्याचा मार्ग मला मिळालेला नाही. आमच्या शेजारच्या पांगळ्या मधुकरला त्याला कुठे खेळायला जाता येत नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी एक छोटा कुत्रा आणून दिला. तो एकदा उंबऱ्याबाहेर गेला. मधू पुढे सरकून त्याला आवरायच्या आत तो रस्त्यावर गेला व एका सारवटाखाली सापडून चिरडून गेला.


आमचा पोपट एकदा मांजराने मारला. याविषयी लिहायला मला आवडले असते. एकदा भीत भीत मी सडेकर मास्तरांना विचारले. तेव्हा ते खेकसून म्हणाले, "तुझ्या पोपटाची हकीकत ऐकायला सारं जग वात पाहत आहे असा कोण लागून गेला आहेस रे तू दीड बाजीराव?" ते ऐकून प्रभाकर, तातू सामंत, नानू बापट यांनी तोंडे घट्ट मिटून ठेवली. प्रभाकरला त्याच्या घराजवळ असलेल्या सात चिंचांच्या झाडांविषयी लिहायचे होते. मुद्दाम लावल्याप्रमाणे ती गोलाकार रेषेत वाढली होती. अनेकदा मी प्रभाकरबरोबर त्यांच्या त्या गर्द सावलीत जाऊन बसत असे. तेथील सावली देखील किंचित हिरवट दिसायची व तिला चिंचेच्या कोवळ्या पानांची, फुलांची चव आहे असे वाटून जीभ शिवशिवू लागे. तेथे गेल्यावर काही करावे, खेळावे, बोलावे असे वाटतच नसे. नुसते बसावे अगर आभाळभर चिंचपानी नकशी पाहत अंग पसरावे असे वाटे. प्रभाकरचे वडील हातभर उंच होते तेव्हा देखील ही झाडे अशीच खानदानी आणि पोक्त दिसायची असे ते सांगत. मग काय झाले कुणास ठाऊक? म्युनिसिपालिटीने ती झाडे तोडून त्या ठिकाणी दवाखाना बांधण्याचे ठरवले. मग प्रभाकरने आईकडून छोटे नैवेद्य करून घेतले व प्रत्येक झाडापुढे ठेवले. त्याचे आईवडील रात्री त्या ठिकाणी गेले व तेथे एक पणती लावून परतले. रात्रभर आईच्या डोळ्यांतले पाणी थांबले नाही. झाडावर पहिली कुऱ्हाड पडण्याच्या आधीच प्रभाकरच्या वडिलांनी ते घर सोडले व ते किल्ल्यात राहायला गेले. तातू सामंतला आपल्या थोरल्या भावाविषयी लिहायचे होते. त्याने त्या भावाला पाहिलेसुद्धा नव्हते, कारण त्याच्या जन्माआधीच तो वारला होता. पण त्याची आई त्याला त्याच्याविषयी सतत सांगत असे. तिने त्याचे जुने कपडे, त्याची पाटी, त्याचा भोवरा-सारे अगदी जपून ठेवले होते. नानू बापट देखील मधून मधून आमच्यात येऊन बसत असे. पण तो सतत कुठल्या तरी एका नदीविषयीच बोलत असे. त्यामुळे आम्हाला त्याचा फार कंटाळा येई. त्याच्या गावी एक नदी होती. तिच्याकडे पाहत काठावरच्या एका दगडावर बसले की तिच्या पाण्याबरोबर आपण सुद्धा वाहत जात आहो, नव्या प्रांतात, देशात चाललो आहो, असे त्याला वाटे. एकदा तर तो नदी बरोबर इंग्लंडला देखील गेला होता म्हणे. पण एकदा काही तरी विलक्षण घडले. नदीवर ऊन पडले की पाण्यात झगझगीत जरीतुकडे दिसत. एकदा ते सगळे एकदम डोळे झाले व नानूकडे रोखून पाहू लागले. तो घाबरून उठला तेव्हा कुणी तरी मोठ्याने हसले. हे सांगत असताना देखील नानू भेदरायचा. शेवटी हटकून त्याचा प्रश्न असे, "कोण हसले असेल त्या वेळी?"


एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; 'उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरी'... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर माहितीचा कागद असतो, त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही यापूर्वी दोनदा लिहिले देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : "प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे."


मास्तरांनी छद्मी आवाजात माझा निबंध वर्गात वाचून दाखवला. पोरे फिदीफिदी हसली. ते म्हणाले, "जादा शहाणपणा दाखवू नको. निबंध पुन्हा लिहून आण आणि आता येथून चालता हो." त्यांनी मला वर्गाबाहेर घालवले. निबंधाची वही घेण्याची तसदी देखील त्यांनी वाचविली, कारण मी वर्गाबाहेर पडल्यावर त्यांनी ती वही फर्रदिशी बाहेर फेकली. बऱ्याच उशीरापर्यंत जागून लिहिलेल्या त्या निबंधाबद्दल मी घरी मात्र काही बोललो नाही.



पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - ४