माणसे: अरभाट आणि चिल्लर - ७

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ६  येथून पुढे.

अखेर तडजोड झाली. देवण्णावर औट झाले. पण नऊ धावा दिल्याखेरीज हा निर्णय स्वीकारण्याचे त्यांनी साफ नाकारले. आम्हाला नाइक मास्तरांच्या नाकावर पडलेला चेंडू पाहायला मिळाला नाही हे खरे; पण एका बॉलमध्ये नऊ धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला ? आज हेल्मेट, पॅड, रिस्टबँड असा शृंगार करून क्रिकेट खेळतात. शेळी लेंड्या टाकत राहते, त्याप्रमाणे व त्याच गतीने चार-पाच हजार धावा देखील काढतात. पण एका बॉलमध्ये नऊ धावा घेणारा देवण्णावर मास्तरांसारखा खेळाडू मात्र आता भूतली होणे नाही. There were giants in those days! आणि धावांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. मॅच संपल्यावर सगळेजण संध्याकाळी भीमाक्काच्या खानावळीत पालापाचोळा जेवण करत, व मार खाल्लेल्या टीमने तो खर्च करायचा असे. वास्तविक भीमाक्का मरून बरीच वर्षे झाली होती, पण जे मेल्यानंतर त्यांचा उल्लेख 'ते टिळकांचे कट्टर अभिमानी होते' असा झाला असता, असे जुनी लोक हट्टाने भीमाक्काची खानावळ असेच नाव वापरत. भीमाक्कानंतर तिचा मुलगा व त्याची बायको यांनी खानावळ चालवली ती 'क्षुधाशांति भवन' या जबरदस्त नावाने. नंतर आपला व्यवसाय कोणताही असला तरी नावात 'भारती' हा शब्द वापरण्याची लाट आली, आणि रिकामटेकडे लोक खानावळीला भूक-भारती म्हणू लागले. पण मुलगा व सून एव्हाना अंगाने अतिप्रशस्त वाढून बसली होती, आणि खानावळीचे नाव आपोआपच बदलले, आणि होऊन बसले- लठ्ठं भारती !

क्रिकेट खेळताना दातार मास्तर ग्राउंडवर जाऊन स्टंपांना नमस्कार सांगून येत इतकेच. त्यांनी तेथून कधी भोपळा जरी आणला नाही, तरी वखार फुटल्याप्रमाणे धावा गोळा करत, सत्तर-ऐंशीचे बोजे देखील कधी आणले नाहीत. माणसाला किती जागेची गरज आहे या प्रश्नाप्रमाणेच माणसाला किती धावांची गरज आहे या प्रश्नाला त्यांचे उत्तर निश्चित असावे. नंतर नंतर तर दातार खेळायला आले की खेळ जवळ जवळ संपलाच, असे समजून वडाखाली हातरुमाल अंथरून थंड वारे घेत बसलेली पोरे उठू लागत, व आपला घसा ओला करणासाठी शाळेच्या विहिरीकडे चालू लागत. आमचा घसा तापण्याचे कारण कडक ऊन हे नव्हते. कारण ग्राउंडच्या कडेने पुष्कळ झाडे होती, व त्यांतील एका कोपऱ्यात असलेल्या अतिशय प्रशस्त अशा वडाखालीच आमचा मुक्काम असे. आमची कोणत्या एका टीमशी अशी निष्ठा नव्हती. पण कुणीही खेळाडू औट झाला तरी 'पार्शिआलिटी अंपायर' म्हणून आमचे ओरडणे चालू असे, व त्यामुळे घसा कोरडा होत असे. तीनही दांड्या जरी तीन निरनिराळ्या दिशांना उडाल्या तरी 'पार्शिआलिटी अंपायर' हे आमचे मत मात्र कधीही बदलत नसे. इतकेच नव्हे तर ग्राउंडवर कुणी तरी अंपायर असतो म्हणूनच खेळाडू औट होत असतात, हे देखील आम्ही मान्य केले असते.

त्यानंतर मास्तरांची दृष्टी बिघडली, व चेंडू कोठून येतो हे देखील त्यांना दिसेना. अनेकदा तर बोलरच्या हातून चेंडू निसटण्याच्या आधीच त्यांची बॅट फिरवून झालेल्ली असे, व ते मोठ्या आशेने बाउंडरी धुंडाळत असत. मग त्यांनी क्रिकेट सोडूनच दिले, पण ते मुळमुळत नव्हे, तर अगदी ठणकावून. Not with a whimper, in a burst of glory! एकदा ते बॅट फिरवत असता, कसा कुणास ठाऊक, चेंडू कडमडत तिच्या वाटेत आला व उंच उडाला. चर्चकडील बाउंडरी वीस-पंचवीस फूट तरी कमी होती. चेंडू वर उडाला व सरळ बाउंडरीपलीकडे जाऊन पडला. मास्तरांचा त्यावर विश्वासच बसेना. त्यांनी बॅट काखेत मारली व ते बसायला टाकलेल्या बाकाकडे चालू लागले. "पार्शिआलिटी अंपायर" असे आम्ही ओरडलो नाही, असा तो एकच प्रसंग. सगळ्यांनी मास्तरांभोवती गर्दी केली व थोड्या थट्टेनेच त्यांचे अभिनंदन केले. मास्तर म्हणाले, "आजपासून क्रिकेट बंद. आयुष्यात मी ही एकच सिक्सर मारली. रिटायर व्हायला यापेक्षा चांगला दिवस कधी येईल का?" त्या दिवसापासून खरोखरच त्यांनी हातात बॅट धरली नाही. ते ग्राउंडवर येत. ते काही वेळा अंपायर होत, व आमची कुचंबणा करत. कधी ते स्कोअरर होत. ते रविवारी हटकून ग्राउंडवर दिसत, पण त्यांचा क्रिकेट रोमान्स संपला होता.

शेवटच्या तासाला जर आमच्या गनिमी काव्यात मास्तर सापडले, तर आम्ही बेहद्द खूष होत असू. पण आज मात्र वाटते, मास्तर आम्हालाच बनवत असावेत. ते काही इतके भोळे नव्हते. त्यांना देखील कंटाळा आलेला असे, व ते आपखुषीने आमच्या नाटकात सामील होत. आमच्यापैकी कुणी काय विचारायचे, म्हणायचे हे आम्ही आधीच ठरवलेले असे. पण ऐन वेळी जर आपला बेत साधला नाही, तर आणखी काही तरी पदरी असावे म्हणून एक उपकथानक आम्ही तयार ठेवत असू. साधारणप्णे नानू बापट मागच्या रांगेत कोपऱ्यात बसत असे. या शेवटच्या तासाला त्याला डिवचून खेचून पुढील रांगेत मध्यभागी अगदी टेबलाजवळ बसवत असू. त्याने जर फारच चिकाटी दाखवली तर निर्मळकर त्याला सरळ उचलून त्या जागेवर बसवत असे. अभ्यासाविषयी निर्मळकराइतके शुद्ध वैराग्य असलेला मुलगा सार्‍या शाळेत मिळाला नसता. दर शनिवारी गुरांच्या बाजाराजवळ जे लहान मैदान भरे, तेथे तो हटकून एखादी कुस्ती जिंकून रंगवलेल्या मखमलीचा तुकडा, किंवा तीन नारळ असे बक्षीस मिळवत असे. अलजेब्रा, जॉमेट्री, अक्षांश-रेखांश, भावे प्रयोग हे शब्द देखील त्याचे नाव ऐकताच पटापट निपचित पडत असावेत!

नानू बापट मेणबत्तीतील वातीप्रमाणे असून त्याचे डोळे नेहमी ओलसर असत. मास्तरांनी तपकीर सांडलेला सदरा झटकला की रिंगण सुरू होई. दोनचार पोरे खोकल्याने बेजार होत व खिडकीपाशी जाऊन उभी राहत. बापट मात्र काही केल्या रणछोड होत नसे, पण त्याचप्रमाणे त्याला शिंका-खोकला दाबून ठेवता येत नसे. त्या प्रयत्नात त्याच्याकडून जे निरनिराळे बारीक आवाज बाहेर पडत ते ऐकून शेजारच्यांच्या अंगावर कोसळल्याखेरीज आम्हाला हसू आवरत नसे. स्कॉटिश बँडमध्ये पिशवी दाबत बॅगपाईप आवाज निघतात, त्याप्रमाणे नानू बापट हा कशाने तरी दाबला जात आहे असे आम्हाला वाटे. पण काही झाले तरी हा उपाय किरकोळ होता. तो फार तर दहापंधरा मिनिटे टिकत असे. नंतर तर हा मार्ग देखील बंद झाला. नानूला स्वत:चे इतके डोके असेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. मास्तरांचा शेवटचा तास असला की तो आधीचा तास चुकवून त्या तासाला दोनचार मिनिटे उशीरा येऊ लागला. त्याने "May I come in, Sir?" असे विचारले की मास्तर त्याच्याकडे पाहत व म्हणत, "या या, नाना फडणीस. बापट, आज आपला चंद्रोदय उशीरा झालेला दिसतो. या आणि या कोपर्‍यातील बाकावर आसनस्थ व्हा." पोरे हसत. वर्गात कोपर्‍यात एक जादा बाक होते. तेथे नानू खाली मान घालून बसे, व डोळे पुसत मधून मधून आमच्याकडे पाहत आवाज करत असे. मग आधी ठरल्याप्रमाणे तिसर्‍या रांगेत कुणी तरी कुणाला तरी ढकलत मोठ्याने ओरडू लागे. त्यावर दातार मास्तर करड्या आवाजात विचारत, "काय रे भोपळ्यांनो, काय गडबड आहे?"

पुढे वाचा माणसे: अरभाट आणि चिल्लर - ८