माणसे: अरभाट आणि चिल्लर - प्रस्तावना

जीएंचे 'माणसे: अरभाट आणि चिल्लर' येथे उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे.


अप्पा परचुरे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेपासून सुरुवात करत आहे.


-छू


 


प्रिय आदरणीय जी. ए.


आपल्या पश्चात आपण निर्माण केलेली एक अनोखी साहित्यकृती आपल्या भक्तांच्या हातात देत आहे. आपल्या साहित्याचे चाहते केवळ वाचक नसतात, आपल्या साहित्याचे ते भक्त बनतात. त्यांचा एक पंथ बनतो. आपल्या विलक्षण साहित्यकृतींनी निर्माण केलेला 'जी. ए. पंथ.'


या पंथाला किंवा वर्गाला अस्सलाच्या खालचे काही चालत नाही. त्याला हे माहीत असते की हे अस्सल प्रसवणारा कलावंत हा अवतारावा लागतो. "मायाविश्वातील खऱ्या मारीचाला शोधण्याच्या प्रयत्नात बहुतेककरून भाबड्या कांचनमृगाचेच कळप समोरून जाताना दिसतात." त्यामुळे अस्सलाला ते चिकटून राहतात, त्याचे भक्त बनतात. अशा भक्तांना "माणसे: अरभाट आणि चिल्लर" ची ही एका वर्षाच्या आत निघालेली दुसरी आवृत्ती देताना मला केवळ आनंद होत नाही, तर त्या "अरभाट-चिल्लरांचा" अभिमान वाटतो. आपल्या खास पठडीतील ही माणसे आम्हाला सोडवत नाहीत, मनात घर करून राहतात.


आपल्या लेखणीतील विनोद येथे असा काही बहरला आहे की, आपला एक वेगळाच पैलू वाचकांसमोर येतो. विनोदाचा एक वेगळा बाज पाहायला मिळतो.


आपल्या मागे ठेवलेले अप्रकाशित साहित्य आपणास अभिप्रेत असलेल्या निर्मितिमूल्यांचे काटेकोर पालन करून प्रकाशित करण्याची माझी धडपड चालूच आहे. पहिल्या आवृत्तीतील छपाईच्या मुद्रितांवरून आपण इस्पितळात असताना एकदा नजर टाकणार होतात, आपल्या हिशेबी मूळ हस्तलिखितातही काही त्रुटी राहून गेल्या होत्या. पण सर्वच जिथल्या तिथे राहिले. आपले एक जुने चाहते पुरुषोत्तम धाक्रस यांनी 'माणसे:अरभाट आणि चिल्लर' च्या पहिल्या आवृत्तीत राहिलेल्या चुका वा त्रुटी दूर करण्याचे मोलाचे काम केले आहे.


आपण गेलात, मुक्त झालात. त्यामुळे मराठी साहित्याची केवढी हानी झाली असेल याची आपणाला कल्पनाही नसेल. ती चौकट तशीच रिती आहे. आपण अकस्मात निघून गेल्यामुळे मागे उरलेला रितेपणा तिच्यात भरून राहिला आहे. माझ्यासारख्या चिल्लर क्षुद्रांच्या जीवनात आता तोच प्रकाश बनला आहे. आपण आमच्यात नाही हे अजूनही खरे वाटत नाही. 'काली' या आपल्या कथेतील ते शब्द मनातून जात नाहीतः


"देवी, आता मी पूर्णपणे मुक्त आहे. आता आसक्तीचे सारे धागे विरून तरी गेले आहेत किंवा मी ते तोडून तरी टाकले आहेत. पालथे घालून निथळलेल्या भांड्याप्रमाणे मी आता पूर्णपणे रिता, पण कोरडा होऊन आलो आहे. आता मात्र मला कोणत्याही मोहापुढे टाकून नकोस. कारण मोहात अपयश आल्याने होणारी यातना ज्याप्रमाणे आता मला नको आहे. त्याचप्रमाणे यशस्वी झाल्यास क्षणिक तृप्ती देऊन नंतर अनंत असमाधान करणारे सुख देखील मला नको आहे. माते, मृत्यू कोणालाही टळला नाही, हीच तर मानवी जीवनाची अत्यंत आशेची निशाणी आहे. शेवटी शेवटी तर साऱ्या चलत् चित्रात तोच एक अटळ, निश्चल विश्वास माणसापुढे राहतो. ती आपत्ती नसून विश्रांती आहे. पण एखाद्या कपटी मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यावर प्रहार करावा ही घटना मात्र मला अत्यंत कमीपणाची वाटते. मी पळत असता मृत्यू माग काढीत माझ्या मागे धावत येत आहे असे होऊ देऊ नको. तर मीच मृत्यूपुढे येऊन त्याला सन्मुख झालो एवढेच एक मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे......"


तुमच्या शब्दकळेमागील भावना आणि वेदना समजून घेण्यासाठी सतत धडपडणारा


तुमचा
अप्पा