माणसे: अरभाट आणि चिल्लर - ६

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ५  येथून पुढे.



सायमन मास्तरांचा तास संपला की शाळेतील दिवसाची सुगंधी घडी जात असे. त्यानंतर काचा मारलेले व बटाट्यांच्या सालीच्या रंगाच्या धोतरातले दातार मास्तर येत. मग आम्हाला एकदम उबदार, घरगुती व काही वेळा तर वाह्यात वाटू लागे. शाळेत एकदा पुस्तके टाकली की संध्याकाळपर्यंत तिकडे ढुंकून न पाहणारा थाडे देखील त्या तासाला हजर राहत असे. तो काही अभ्यासासाठी येत नसे. पण त्या वेळी वर्गात जी गंमत चाले ती त्याला आवडे.


दातार मास्तरांनी अगदी मॅट्रिकपर्यंत आम्हाला हा ना तो विषय शिकवला. पण शिकवणे म्हणजे कोंदट, कंटाळवाणे वातावरण मात्र कधी नसे. कुठल्या तरी मोठ्या माणसाचे श्राद्ध चालले आहे असा भास नसे.


विषय कुठलाही असो, प्रथम ते खडूच्या तुकड्यांनी भरलेली जुनी कापूरपेटी काढत. मग फू फू करून टेबल त्यातल्या त्यात स्वच्छ करून घेत, व तपकिरीची डबी काढून चिमुटभर तपकीर नाकपुड्यांत भरत. सायमन मास्तर जवळून गेले की सेंटची बाटली उघडल्याप्रमाणे वाटे, तर दातार मास्तर येऊ लागले की जवळपास कुठे तरी तपकिरीचे दुकान असावे असे वाटू लागे. सेंटमुळे एकदम चपापल्याप्रमाणे वाटे, तर तपकिरीच्या वासाने अवघडलेले मन सैलावत असे.


त्याचीच खूण आजपर्यंत टिकली आहे. काही पूर्वग्रह जबरदस्त असतात व जळूप्रमाणे ते आयुष्यात कायम चिकटून राहतात. आपली नात घरातील पुस्तके कशी टराटरा फाडून बाहेर फेकते, किंवा आरसे-कपबशा फोडून खिडकीतून बाहेर फेकते, हे कौतुकाने व बऱ्याच विस्ताराने सांगत बसणाऱ्या एखाद्या आजोबाला क्षमा करणे काही वेळा मला कठीण वाटत नाही. पण तंबाखू चघळत ओठांची कुंची करून बडबडणाऱ्या माणसाची मात्र ताबडतोब रवानगी होईल. आपल्या गेल्या ऑपरेशनविषयी स्टूल रिपोर्टपासून सारे काही सांगणारी बाई, कडा कातरल्याप्रमाणे काढून चपातीचा मधलाच भाग खाणारी माणसे, येताना इतर दोन-तीन जणांना आगंतुकपणे बरोबर आणणारे पाहुणे, जीन्स घालणाऱ्या मध्यमवयीन स्त्रिया, यांना माझ्याकडे औपचारीक देखील स्वागत नाही. पण कुणी तपकीर ओढत आसेल तर त्याच्याशी अर्धा तास मनमोकळ्या गप्पा मारणे मला बरे वाटते. मला स्वतःला तपकीर आवडत नाही, पण तपकीर ओढणारे दातार मास्तर आवडत, व त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गातील लोकांविषयी मला जवळीक वाटते.


दातार मास्तरांच्या तासांपैकी एक तास सातवा असे. त्या वेळी पोरे कंटाळून गेलेली असत, व मास्तर देखील चुरगाळलेले दिसत. अशा वेळी क्रिकेट आणि गडकरी ही मास्तरांची दैवते आमच्या मदतीला येत. पण त्यासाठी गनिमी कावा लढवावा लागे, व त्याची योजना सकाळपासूनच ठरवावी लागे. खरे म्हणजे मास्तर स्वतः काचा मारलेल्या धोतरात, उघड्या पावलांनी जिमखान्याच्या कोर्टवर टेनिस खेळत आणि बऱ्यापैकी खेळत. हातभर उंच असलेल्या नाइक मास्तरांनी एकदा सर्व्हिससाठी चेंडू वर उडवला, पण तो रॅकेट चुकवून त्यांच्या नाकावर पडला व त्यांचा चष्मा मोडला. तेव्हापासून मास्तर माणसे टेनिस खेळत आहेत हे समजताच आम्ही आमचा खेळ तसाच टाकून कोर्टाच्या कडेला जाऊन बसत असू. आम्हाला टेनिसमधले फारसे कळत नव्हते, पण नाईक मास्तरांच्या सारखी गंमत पुन्हा घडली तर त्यावेळी आम्हाला गैरहजर राहायचे नव्हते.


कधी कधी तर दातार मास्तर क्रिकेट देखील खेळत. त्या सगळ्यांची कसली तरी संडे टीम देखील होती. मोठ्यांत जॅगरी किंग आणि पोरांत गुळाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले पाटील हे मूळचे गुळाचे व्यापारी. हॉटेलवाले रेगे त्या टीममध्ये होते. शिवाय डाव्या हाताने बोलिंग करणारे थत्ते वकील, आणि अडीअडचणीला कोणत्याही विषयावर धार्मिक अथवा राष्ट्रीय कीर्तन करणारे ग्रामोपाध्ये हे देखील होते. असली टीम जगात कधी झाली असेल की नाही कुणास ठाऊक. एकीकडे जर एखादा गडी कमी पडला तर दुसऱ्या बाजूचा एक जण इकडे येत असे, किंवा इकडचा एक खेळाडू दोनदा खेळत असे. दातार मास्तर जरी अधूनमधून क्रिकेट खेळत असले तरी देवण्णावर मास्तरांप्रमाणे त्यांना क्रिकेट इतिहास काही घडवता आला नाही.


देवण्णावर मास्तर चालताना डोलत असत व त्या वेळी वारा भरलेले धोतर जहाजाच्या शिडाप्रमाणे वाटे. खेळताना पायाला एकच पॅड पुरे होत असे. एक तर साऱ्या टीममध्येच एकंदरीने दोन पॅड होते व त्यातील एक दुसरा खेळाडू वापरत असे. शिवाय खाली वाकून पट्टे बांधणे हे त्यांना एका पॅडच्या बाबतीत देखील जिकिरीचे वाटे. एका रविवारी त्यांनी दातओठ खात एक चेंडू हाणला, आणि धाव घेण्यासाठी दौड सुरू केली. विकेटकीपर खानोलकर मागे वळून चेंडू शोधू लागला. केवळ सवय म्हणूनच जोशी बाउंडरीकडे धावू लागला. पण चेंडू कुठेच दिसेना. देवण्णावर मास्तर तर सारखे धावत होते. तीन-चार-पाच धावा झाल्या तरी ते थांबेनात, व चेंडू देखील सापडेना, मग थत्ते वकिलांच्या ध्यानात सारा प्रकार आला. त्यांनी देवण्णावरना पकडले, तेव्हा टीममध्ये असलेला काबाडे नुकतीच पेटवलेली सिगारेट बाजूला टाकून त्यांच्या मदतीला आला, व क्रिकेट पिचचा आखाडा झाला. थत्ते वकिलांनी देवण्णावर मास्तरांच्या सोग्यात अडकलेला चेंडू काढला, व तो स्टंपांवर हाणून "औट" म्हणून गर्जना केली.


"पण बॅट्समनला अशी टांग मारून औट करता येतं का?" बॅट उगारत देवण्णावर थत्तेंकडे धावत आवेशाने म्हणाले.


"मग सोग्यात चेंडू घेऊन धावा काढत बसायच्या की काय त्याने कलियुग संपेपर्यंत?"


"मग त्याबद्दल एम्. सी. सी. चे नियम दाखवा." कायदेशीर मोर्चा बांधत देवण्णावर म्हणाले.


"तरी बरे, ऑस्ट्रेलियातून ब्रॅडमनला घेऊन या म्हणाला नाहीत !" थत्ते कुत्सितपणे म्हणाले.


"लोक हो, धोतराचा सोगा म्हणजे काय हे देखील साहेबाला माहीत असणार नाही. मग सोग्यात चेंडू अडकला म्हणजे काय करायचे, याचे नियम काय करणार तो आमचं टाळकं !" समझोता घडवण्यासाठी दातार मास्तर म्हणाले व आम्ही पोरांनी टाळ्या वाजवल्या.


 


पुढे वाचा  माणसे: अरभाट आणि चिल्लर - ७