माणसे: अरभाट आणि चिल्लर - १०

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ९ पासून पुढे.

तातू तिसरीत आमच्या वर्गात आला, आणि मॅट्रिक होईपर्यंत पाच वर्षे आम्ही शेजारी शेजारी बसलो. त्याच्या शेजारी बसण्याचे मला आणखी एक कारण होते. माझ्या खालोखाल त्याची सर्वात जास्त वर्गातून हकालपट्टी झाली होती. हा, दामले मास्तरांकडून त्याची कधी हकालपट्टी झाली नव्हती आणि आता ते शक्य नव्हते. कारण आता ते निवृत्त होऊन नागपूरला गेले होते. उलट आपटे मास्तरांनी मला कधी बाहेर घातले नव्हते ते तातूने दोनदा साधले होते. त्यांच्याकडून मी कधी हाकलला जाणे शक्य नव्हते, कारण मी बहुधा त्यांच्या तासाला बसतच नसे. आपटे मास्तरांच्या नावावर शास्त्र व भूगोल हे विषय होते, पण स्वत:च्या विषयांखेरीज इतर उचापतींतच त्यांना जास्त रस असे. प्रदर्शने भरवणे, सहली काढणे, नाचगाणी बसवणे हे त्यांचे खरे धंदे. त्यांच्या भावाचे पुस्तके-वह्यांचे दुकान होते. त्या दुकानातून पेपर, वह्या घेण्याविषयी ते सगळ्यांना दटावणी करत. त्यांची बायको एक भजनी मंडळ चालवत असे, तर तिची धाकटी बहीण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेल घालत गावात भटकत असे.

एकदा आपटे मास्तरांनी कोणताही एक प्राणी अगर पक्षी याविषयी त्याचे खाणे, त्याची राहण्याची पद्धत ही माहिती गोळा करून एक निबंध तयार करण्यास सांगितले होते. त्यात तातूचा निबंध सर्वात प्रसिद्ध ठरला. त्याला त्याबद्दल वर्गाबाहेर जावे लागले, आणि प्रिन्सिपॉलकडून आठ आणे दंड झाला. तो कधी प्रत्यक्ष द्यावा लागला नाही ही गोष्ट निराळी. त्याने एका चतकोर कागदावर लिहिले होते, "पेंग्विन पक्षी आमच्या गल्लीत कुणाकडेच नाही. त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याविषयीच्या सवयींविषयी माहिती मिळत नाही. पण तो दिसायला असा असतो. " असे लिहून त्याखाली त्याने कुठून तरी मिळवलेले पेंग्विनचे एक लहान चित्र चिकटवले होते. एकदा पृथ्वीचा गोल काढून आणा, असा अभ्यास असता त्याने एक गोल काढला. त्यावर पर्वताचे शिखर दाखवले व लिहिले: "शंकर - पार्वतीचे निवासस्थान - गौरीशंकर" आणि खाली नागाचा फणा काढून त्याने लिहिले, "पृथ्वी डोक्यावर धरणारा शेष." तत्काळ झालेला परिणाम म्हणजे वर्गातून हकालपट्टी! पण त्याची ग्रहणाची आकृती पाहिल्यावर मात्र आपटेंनी त्याचा पाठलाग बंद केला. त्याने एका कागदावर काळ्या कागदाचे एक वर्तुळ तेवढे चिकटवलेले होते. पृथ्वी कोठे आहे, असे विचारताच आपण पृथ्वीवरूनच ग्रहण पाहत आहो, असे त्याचे उत्तर होते. मग सूर्य तरी कोठे आहे, तर तो चंद्राप्रमाणे आहे; कारण खग्रास सूर्यग्रहण आहे, असा त्याचा जबाब हजर ! वास्तविक ड्रॉइंगचे एकत्र असलेले दोन तास म्हणजे आरामाची वेळ. दड्डीकर मास्तर काही तरी डिझाइन काढा, असे सांगत व आपल्या लहान खोलीत जाऊन माळ ओढत कसला तरी जप करत बसत. एकदा मुद्दाम तिकडे जाऊन "डिफिकल्टी आहे" असे सांगून तातूने त्यांना वर्गात बोलावून आणले आणि विचारले, "सर, मी एका निग्रो मुलीचे चित्र काढले आहे. ती लाजली आहे, असे दाखवायला तिच्या गालावर कसला रंग वापरू?" तेव्हापासून तातूला ड्रॉइंग हॉल बंद झाला.

एकदा शाळेत समाजकार्य करणार्‍या बाईचे अगदी चोख मोजून घ्यावे असे ऐसपैस नऊवारी भाषण झाले. अगदी वैतागाने रेगे मास्तर आम्हाला म्हणाले, "या बायकांचे समाजकार्य तत्काळ थांबविण्यास आता एकच मार्ग उरला आहे. सारा समाजच नष्ट केला पाहिजे." पण आपटे मास्तरांचा उत्साह अनावर होता. त्यांनी ताबडतोब एक परिसंवाद ठेवला व काही पोरांनी समाजसेवा करणार्‍या स्त्रियांविषयी माहिती द्यावी अशी योजना केली. त्यात तातूने भाग घ्यायचे ठरवले. वास्तविक आपटे मास्तरांनी निदान तातूबद्दल तरी धोका पत्करायचा नव्हता. तातू प्लॅटफॉर्मवर उभा राहिला, पण त्याचे भाषण एका मिनिटातच संपवून त्याला प्रिन्सिपॉलकडे पाठवण्यात आले. त्याने अशी सुरुवात केली होती, "सामाजिक कार्य करणार्‍या स्त्रियांमध्ये दोन प्रकार असतात. एक कुरूप आणि दुसरा म्हणजे अती कुरूप..."

पण एका प्रसंगानंतर मात्र आम्ही सगळ्यांनी त्याची पाठ थोपटली. केवळ शाकाहाराचा आग्रह धरणारे एक गृहस्थ शाळेत आले. त्यांनी त्या विषयावर आवेशपूर्ण भाषण केले व शेवटी सांगितले, "गव्हाचा एक दाणा चैतन्यपूर्ण आहे. तो जमिनीत टाका, त्यातून हिरवेगार रोप वर येते. मटण-मांस जमिनीवर टाका तर काय येईल? माती?"

व्याख्यानानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सांगितले. त्या विषयात तरी कुणालाच आतडे नव्हते.. तातूने तर कधी कोंबडीचे अंडे देखील हातात धरले नसेल. पण प्रश्न विचारायला उभा राहिला तो तातू !  त्याने विचारले त्याने विचारले, "तुम्ही गहू कच्चे खाता की चपाती-ब्रेडच्या रूपात?"

"मी चपाती-पोळ्या खातो. कच्चा गहू खायला मी घोडा नाही." व्याख्याते म्हणाले व काही पोरे भस्सदिशी हसली. "मग त्या चपात्या जमिनीत टाकल्या तर काय येईल, माती?" तातूने तसे विचारताच पाहुण्यांच्या चेहरा लालसर झाला, व प्रिन्सिपॉलनी घाई-घाईने सभा संपवली. पण आम्ही पाठीवर मारलेल्या थापांमुळे तातू अगदी जेरीला आला.