माणसे: अरभाट आणि चिल्लर - ११

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १०  पासून पुढे.

खुद्द दातार मास्तरांशी देखील त्याचा एक समरप्रसंग घडला होता, पण त्यावेळी त्याला वर्गाबाहेर जाण्याची पाळी आली नाही. त्याने दातार मास्तरांना म्हटले, “सर, विठोबा भेटायला आला, त्या वेळी पुंडलिक काय करत होता?”

त्याच्या या प्रश्नाने दातार मास्तर क्षणभर बावरलेच, कारण त्या वेळी ते वाक्याचे पृथक्करण सांगत होते. “हा प्रश्न महत्वाचा आहे,” तातूचे अजून संपले नव्हते, “आपण काम करत असलो की कुणाला तरी बसण्यासाठी आपण एखादी वीट फेकतो. आपण उकिडवे बसलो असता टेकायला वीट फार उपयोगी पडतेच, पण ही साधी गोष्ट ध्यानात न घेता विठोबा उभाच का राहिला? मी तसे उभे राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकदा मी घसरून पडलो, तर एकदा पावलांना रग लागली.”

“तातू, आता हा विषय संपेपर्यंत तू तोंड शिवून गप्प बसला नाहीस तर बघ भोपळ्या, पायाखालची वीट डोक्यात येईल!” मास्तर म्हणाले आणि प्रसंग सावरला गेला.

पण मराठी हा विषय असेल तर मात्र त्याच्यापुढे बोलण्याचे कुणाला धैर्य होत नसे. आम्ही कधी नावे देखील न ऐकलेल्या पुस्तकांतील गोष्टी तो आम्हाला सांगत असे, कविता म्हणून दाखवत असे. हे सगळे तो केव्हा करत असे देव जाणे. त्यानेच मला 'सावळ्या तांडेल' ही कादंबरी वाचायला दिली होती. पण हळूच सांगितले होते, “शिवाजीच्या काळात दुर्बीण नव्हती.” नंतर खूपच वर्षांनी मी कॅप्टन मॅरियटची 'पुअर जॅक' ही कादंबरी वाचली, तेव्हा सावळ्या तांडेलची पुन्हा आठवण झाली. 'शशांक' देखील मला त्याच्याकडूनच मिळाली होती. एक दिवस तो स्वत:शीच गुणगुणत होता:

“स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे प्रेम इमानी

लावण्य नसे जेथ जणू चीज किराणी

तेथे चल राणी.

आत्मप्रगतीच्या त्या गूढ कथा ज्या न कुराणी, न पुराणी

तेथे चल राणी,

तेथे चल राणी.”

“सुधारकात अग्रणी कमाल तूच मोहरा!”

मी त्याबद्दल त्याला विचारले, तर त्या माधव जूलियनच्या कविता आहेत असे त्याने मला सांगितले. मी म्हटले, “असले कधी कवीचे नाव असते काय? कुणाचा तरी थोरला भाऊ, धाकटा भाऊ, मुलगा असे नाव घेऊन माजघरातून हळूच बाहेर यायचे असते. आणि जूलियन म्हणजे तरी काय?”

आमच्या वेळी आमचा काव्याशी परिचय म्हणजे बहुधा मेळ्यातील पदांप्रमाणे वाटणार्‍या आवेशपूर्ण कवितांशी. येथे झाडणी मारून कोळिष्टके झाडा, कसले तरी वाद्य हाणा, ठोका, फुंका असल्या म्युनिसिपालटी, मिलिटरी किंवा बॅंडवादनाच्या पद्याशी. एक मिनिटाची सूचना मिळताच टेबलावर मुठी आपटून आवेशाने म्हणता येणार नाही ती कविताच नव्हे असा आमचा आग्रह. आणि हा कोण जूलियन राणीला दूर कुठे तरी चलण्याची विनंती करतो आहे? सुधारक कोण याची नावं त्या वेळी पक्की ठरलेली असत, आणि याची एक कविता कुणाला उद्देशून, तर सुधारकाग्रणी मोहरा कमाल याला ! जूलियन हे नाव देखील परके, नाजूक म्हणूनच आकर्षक. अगदी वयस्क सुधारकांना देखील महादेव हे नाव बदलून माधव होण्याचा ध्यास.

नंतर एक दिवस तातू संध्याकाळी घरी आला व मला ओढतच चालू लागला. तो म्हणाला, “माधव जूलियनचे भाषण आहे, चल लवकर.” आम्हाला हॉलमध्ये बर्‍याच मागे बसायला जागा मिळाली. जूलियन काय बोलले हे आज आठवत नाही. पण त्यांनी आपली एक कविता “अर्थीही कन्या परकीय एव, बाळ जा तप्ताश्रू.” ही म्हणून दाखवली, ती मात्र आज आठवते, भावते. त्याच वेळी मी ठरवले की कधी काळी कॉलेजमध्ये गेलोच तर या कवीच्या सगळ्या कवितांचा अभ्यास करायचा. पण ते मात्र घडलेच नाही. मी मराठी विषय तात्पुरता घेतलाही. पण पहिल्याच तासाला यशवंतांनी एका कवितेत किती वेळा यतिभंग केला आहे, यावरच एक प्राध्यापक रेफ्रिजरेटर चेहर्‍याने बोलत राहिले, मग मी इंग्रजीकडे वळलो व मग ते सारे राहूनच गेले. कारण सवत किंवा पोटभाडेकरू चालत नाही, किंवा तिला भंगलेल्या निष्ठेची पत्रास नाही; पण कोंबड्यांच्या कळपात एक रंगीत पीस टाकून हा विलायती कवी डोळ्यांसमोरून निघून गेला हे मात्र खरे.

त्या वर्षी आम्हाला गडकरी यांची “चिमुकलीच कविता” ही कविता होती. आणि गडकरी म्हटले की मास्तरांचा हुरूप अनावर होत असे. आम्हाला तर वाटे, की मास्तर गडकर्‍यांची बाजू घेऊन कुणाशी तरी किंवा स्वत:शीच सतत भांडत आहेत. एखादी कविता हे केवळ निमित्त.

एकदा त्यांनी आम्हाला भाषांतराला एक उतारा दिला. आम्ही त्यात गुंतलो तर ते खुर्चीत जाऊन बसले व एक फाइल उघडून ते लिहू लागले. पण त्यांचे लिहिणे पाच-दहा मिनिटेच टिकले. त्यांनी फाईल बंद केली, तपकिरीची चिमूट भरली, आणि ते आमच्यासमोर येऊन उभे राहिले. राग आवरण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, “म्हणे बंड गार्डनवर कशाला गेला होता? तेथे काय एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज होते की काय?“

आम्ही थोडे दचकलोच. तसे कुणी म्हटले हे तर आम्हाला माहीत नव्हतेच, पण बंड गार्डन म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते. पण मास्तरांना त्याचे काहीच नव्हते, कारण एका दृष्टीने ते आमच्याशी बोलतच नव्हते. “त्या वेळी बंड गार्डनवरच काय, कुठेच एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज नव्हते. तेव्हा सुधाकर कुठेही गेला असता तरी हाच प्रश्न विचारता आला असता. काही तरी बोलून नाक खाजवायचे, दात विचकायचे, झाले. बस्स, दुसरे काही नाही. अरे भोपळ्यांनो, एक पोस्टकार्ड घ्यायला पोस्टात गेलो असता एखादा म्हातारा हळूच आपल्या नातीची पत्रिका हातात देतो, किंवा अपल्या पांडोबाला कुठे तरी रेव्हेन्यूमध्ये द्या चिकटवून म्हणून सांगतो म्हणजे पोस्ट ऑफिस काय वधू-वर मंडळ होते, की कारकून भरती करण्याचे ठिकाण होते? सुधाकर विमनस्कपणे भटकत बंड गार्डनकडे गेला होता, तेथे त्याच्या ओळखीचे लोक भेटले इतकेच, होय की नाही?”