माणसे: अरभाट आणि चिल्लर - ८

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ७  येथून पुढे. 

मग गोपाळ चोपडे उभा राहून साळसूदपणे म्हणे, "सर, हा प्रभाकर म्हणतो, नायडूने एका मॅचमध्ये सोळा सिक्सर्स मारले हे सारे झूट आहे. त्याचा त्यावर विश्वास बसत नाही. ब्रह्मदेवाला देखील इतके सिक्सर्स कधी मारता येणार नाहीत."

मग जरी त्यांनी नुकतीच तपकीर भरलेली असली तरी मास्तर पुन्हा डबी काढत व रागाने पुन्हा एक चिमूट नाकात भरत. अशा वेळी हात थरथरून बरीच तपकीर सदर्‍यावर पडे. मग ते कोटाची बटणे काढत, प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत व थेट प्रभाकरसमोरच जाऊन उभे राहत. सीतेच्या चारित्र्याविषयी संशय घेणारा परीटच समोर बसला असल्याप्रमाणे ते त्याच्याकडे शंभर वॅट डोळ्यांनी पाहत. त्या अवस्थेत ते मिनिटभर थांबत, व मग स्फोट होई. "म्हणे विश्वास बसत नाही!" ते उसळून म्हणत, "तुझा विश्वास बसणे न बसणेही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे काय रे भोपळ्या?"

मास्तरांचा सर्वात कडक शब्द म्हणजे "भोपळ्या!" आणि ते तो शब्द डबल भोपळा निर्मळकरापासून शून्य भोपळा नानू बापटापर्यंत सर्रास वापरत. "अरे, तुला क्रिकेट म्हणजे काय हे तरी माहीत आहे? म्हणे विश्वास बसत नाही! आणि नायडूंची सिक्सर म्हणजे काही बाउंडरीपलीकडे फेकलेला कचर्‍याचा गोळा नव्हता. आम्हाला वाटायचेकी बॉल खाली सरकला उतरला की त्याचा स्फोट होणार, आणि मुंबईचा समुद्र हातभर तरी मागे सरकणार! टाक जा तुझा तो विश्वास भिकार्‍याच्या झोळीत! तुला अमरसिंगाचे नाव तरी माहीत आहे का? अमरसिंग माणूस नव्हता. ती एक महाकाली तोफ होती तोफ, माहीत आहे? क्रिकेटच्या दुष्काळात जन्मलेली पाप्याची पितरे तुम्ही, एकेक काडी गोळा करून रवंथ करणारे प्राणी तुम्ही- तुमचा काय विश्वास बसणार!"

तोपर्यंत दातार मास्तरांची वर्गात एक फेरी पूर्ण झालेली असे, व ते पुन्हा प्रभाकरासमोर येऊन उभे राहिलेले असत. मग प्रभाकर नरमल्याप्रमाणे दाखवत विचारी, "सर, तुम्ही नायडूंचा खेळ पाहिला होता का?"

त्यावर मास्तर शांत होऊन हसत व म्हणत, "पाहिला होता म्हणजे काय? मी मुंबईला जाऊन मुद्दाम खेळ बघून आलो की ! एका खेपेला परत यायला पैसे नव्हते, तर हातातली अंगठी विकली मी, आणि मग तेवढे पैसे वाचवण्यासाठी तीन महिने संध्याकाळचे जेवण सोडले मी!"

मग नायडूंच्या आठवणी निघत. काही वेळा नायडूंनी एका मॅचमध्ये मारलेल्या सिक्सरचा आकडा थोडा जास्त वाढे, आणि मग घंटा झाली की आम्ही वर्गातून बाहेर पडताना मास्तर सर्वात पुढे असत!

पण क्रिकेटमध्ये मास्तरांना नायडूखेरीज इतर दैवते नव्हती. त्यांचा खरा पिंड टेनिसचा आणि आम्हाला टेनिसविषयी काही माहिती नव्हतीच. काही वेळा मास्तर डोनाल्ड बजचा उल्लेख करत; पण हा डोनाल्ड बज कोण होता हेच मुळात आम्हाला माहित नसल्यामुळे त्याच्याविषयी फायदेशीर अविश्वास वाटत नसे, व कंटाळवाण्या शेवटच्या तासासाठी तो अगदी निरुपयोगी होता. त्यामुळे मास्तरांचा उत्साह कमी होत असे, व ते एक निश्वास सोडून म्हणत, "डोनाल्ड ब्रॅडमन आणि डोनाल्ड बज या दोन डोनाल्डपैकी कुणाचाच खेळ मला पाहायला मिळाला नाही. भोपळ्यांनो, ते देखील लिहून यावे लागते येथे!" आणि कपाळावर बोट आडवे फिरवत. मात्र हे कसे व्हायचे ते शेवटी असलेल्या त्या तासातच. मास्तरांचे इतर तास कसे जातात हेच समजत नसे. दातार मास्तर हे एकच शिक्षक असे होते की त्यांच्या तासानंतर मन चुरगळून जाण्याऐवजी टवटवीत होत असे.

पण शेवटच्या तासाचा हा ताजेपणा अगदी काही लपून राहिला नव्हता. आता हळूहळू आमच्या शाळेत सुद्धा मास्तर जाऊन गुरुजी मंडळींचे आगमन सुरु झाले होते. याच सुमारास पिशवीत कापूस व टकळी ठेवणारे एक गुरुजी बदली म्हणून तीन महिन्यांकरिता आले होते. शिकवणे, कविता वाचणे, शुद्धलेखन असल्या चिल्लर गोष्टींकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांचे लक्ष होते ते उद्याचे पुढारी आजच्या आज घाऊकपणे निर्माण करणे या गोष्टीकडे! शाळेचा प्रिन्सिपॉल प्रथमच देशी होता. त्याच्याकडे जाऊन गुरुजींनी साजुकपणे नाक मुरडत, आवाजात आर्तता आणत दातार मास्तरांविषयी तक्रार केली. प्रिन्सिपॉलच्या खोलीत तेव्हा आणखी दोन शिक्षक होते. प्रिन्सिपॉलने त्यांच्याकडे पाहिले व शांतपणे गुरुजींना म्हटले, "हे पाहा, मी स्वत: काही वर्षे त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांना आपल्या मार्गाने जाऊ द्या. ते एका आठवड्यात जेवढे शिकवतील तेवढे तुम्हाला मला एका महिन्यात साधणार नाही. त्यांच्यासारखे चार पाच शिक्षक अजून शाळेत आहेत म्हणून शाळेला खानदान आहे. मी गावात ताठ मानेने हिंडू शकतो. तेव्हा त्यांच्या कामात नाक खुपसू नका!"