माझे काही हीरोज(२)!

         साधारण चौघीजणींना भेटायच्या आधी मला अजून एक हिरो सापडला. झालं असं, की आमच्या शाळेत एक नवीन बाई शिकवायला यायला लागल्या. त्यांच्या आणि आमच्या वयात फार फार तर ८-१० वर्षांचं अंतर असेल. त्यामुळे त्यांची आणि आमची  वेव्हलेंथ मस्त जमायची. त्यांचं स्वतःचं वाचन अक्षरशः अफाट आहे. त्यामुळे त्यांचा तास ही माझ्यासारख्या वाचनवेड्या मुलींसाठी पर्वणीच असायची. या बाईंनी अनेक नवनवीन पुस्तकांशी, लेखकांशी आमची ओळख करून दिली.  अनेक उत्तम पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या मालकीचं मृत्युंजय हे पुस्तक मला द्याल का असं मी त्यांना जरा भीतभीतच विचारलं.  त्यांनीही लगेच दुसऱ्या दिवशी ते मला आणून दिलं. वर म्हणाल्या, " माझ्या वहिनीला हवं होतं पण मी तिला सांगितलं, आधी लेकीला देते ."त्यांनी मला लेक म्हणणं हा अनुभव फारच सुखद होता. तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो.
         त्यामुळे मृत्युंजय बद्दल एक वेगळीच भावना मनात आहे. शिवाय बाईंची एक छान सवय म्हणजे पुस्तकातली उत्तमोत्तम वाक्यं त्या अधोरेखित करून ठेवतात. जणू काही त्या स्वतःच मला त्या पुस्तकातलं भाषावैभव दाखवून देताहेत असंच वाटायचं ते पुस्तक वाचताना. कर्णाची व्यक्तिरेखा मला जाम आवडली. माझ्या हिरोंमध्ये त्याला लगेच स्थान मिळालं. सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, विलक्षण देखणा असा हा शापित राजपुत्र.  त्याच्याकडे कोणाचंही लक्ष ओढलं न गेलं तरच नवल. मला तर त्याच्या एकाग्रतेच्या, सूर्याकडे टक लावून पाहण्याच्या, त्याच्या बाहुबलाच्या कथा वाचताना प्रचंड भारल्यासारखं होत असे. विशेषतः भीमाने जोर लावून वाकवलेली सळई रो रोज सकाळी सरळ उभी करून ठेवत असे हे वाचताना मला खूप कौतुक आणि मजा वाटायची. त्याची ती जांभळी-लालसर प्रभा फाकणारी कुंडलं, अभेद्य असं कातडं आणि स्वबळावर मिळवलेली धनुर्विद्या वगैरे गोष्टी वाचताना नुसतं स्फुरण चढायचं.
सिंहशिशुरपि निपतति गजेषु सततं कथं महौजःसु ।
 प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ॥ 
ही उक्ती सार्थ करणारी त्याच्या मनातली क्षात्रतेजाची ती घगधगती ज्वाळा, प्रत्येक अपमानानंतर संतापाने पेटून उठणारं त्याचं अमोघ क्षत्रिय मन, त्याचा पराक्रम, त्याचे दिग्विजय, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहावं तसे काळाशी सतत केलेले दोन हात, प्रत्येक वेळी अन्याय सहन करण्याची त्याची असीम सहनशीलता पाहून तो माझ्या हिरोंच्या क्रमवारीत कितीतरी वर चढला. इंद्राला कवचकुंडलांचं दान देण्यासाठी त्याने स्वतःचीच कातडी सोलून काढली होती तो प्रसंग तर मी एकदाच कसातरी वाचला. नंतरच्या पारायणांमध्ये तो वाचवलाच नाही. अर्थात कर्णाला सर्वांगावर अभेद्य कवच आणि जन्मजात मांसल कुंडलं होती ही कविकल्पना आहे. जन्मानंतर त्याला नदीच्या पाण्यात सोडताना कुंतीमातेने स्वतःची अभिमंत्रित सुवर्णकुंडलं त्याच्या शेजारी ठेवलेली होते. ती कुंडलं अभिमंत्रित असल्यामुळे त्याचं रक्षण करत होती आणि तेच कर्णाचं कवच होतं असं मूळ महाभारतात लिहिलेलं आहे हे अलिकडेच कळलं. त्यामुळे कुंडलांची मोहिनी वजा करून माणूस म्हणून हे सारं सहन करणारा कर्ण अधिकच खरा वाटायला लागला. एकूणच काही दिवस माझा महाभारताकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला होता. 
         आणि शिवाजी सावंतांनी उलगडलेल्या भरजरी भाषेच्या पोतांबद्दल, वैभवाबद्दल तर काय सांगावं? अनेक दिवस ती भाषा मनात अशी आंदोलित होत राहायची. एकूणच सावंतांनी महाभारत हे एखाद्या प्रिझमामधून दाखवावं तसं दाखवलं. रिफ्रॅक्टेड फॉर्ममधे. त्यामुळे भीमार्जुन, कृष्ण वगैरे मंडळी पळपुटी वाटायची. खरं तर अजूनही वाटतात. कर्णाबद्दल सहानुभूतीने माझं बालमन पेटून उठत असे.
मृत्युंजय च्या प्रभावाखालून मी बाहेर येतानाच कर्णावरचं अजून एक अतिशय सुंदर पुस्तक वाचनात आलं. त्याचं नाव राधेय. लेखक रणजित देसाई. सावंतांचा मार्ग होता की प्रत्येक प्रसंगात कर्णावर कसा अन्याय झाला, त्याचा ज्यावर हक्क आहे असं श्रेय त्याला कसं मिळालं नाही आणि तो कसा निर्दोष आणि नियतीच्या हातचं बाहुलं होता वगैरे वगैरे.  या गोष्टी डोक्यात पक्क्या बसलेल्या असल्यामुळे रणजित देसाई यांनी चितारलेला कर्ण मला खूप जास्त माणसासारखा वाटायला. चरित्रनायक जरी झाले तरी शेवटी माणसेच असतात आणि त्या माणूस असण्यातच त्यांचं मोठेपण असतं ही अक्क्ल मला आज आली आहे आणि या प्रवासात कर्णाने मला खूपच मदत केली आहे.
         ज्यो - लॉरी- पेनी-ज्योडी यांनी माझा हात धरून मला महाविद्यालयीन वातावरणात आणून सोडलं. मग माझी नजर वळली ती इंग्रजी साहित्याकडे. मी मराठी आणि आठवीनंतर अर्धमराठी(अर्धमागधी नव्हे!) माध्यमातून शिकले. त्यामुळे किशोरवयात नॅन्सी ड्र्यू किंवा हार्डी बॉईज यांची पारायणं मी केली नाहीत. मी आठवीत असताना काकूने मला तिच्याकडचं एक परिकथांचं सचित्र इंग्रजी पुस्तक दिलं होतं आणि म्हणाली होती, आता तुला हे वाचता येईल नाही का!. मला वाटतं दुसरी तिसरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी लिहिलेलं असावं ते. पणा त्यातली चित्र इतकी सुरेख आहेत की बास. त्या प्रसंगानंतर मी निश्चय केला होता की माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बहिणी जे वाचतात ते आणि त्याहूनही काही अधिक वाचन करायचं इंग्रजी साहित्याचा व्यासंग करायचा. याची सुरुवात मी अकरावीत केली. नॅन्सी ड्र्यू पासून. खरं म्हणजे हे सगळं वाचण्याइतकी मी लहान राहिले नव्हते. पणा त्याने बैठक मारून वाचायची सवय मात्र लागली. एनिड ब्लॉयटन मात्र मी प्रचंड एन्जॉय केलं आजही करते. द फेमस फाईव्ह ही मालिका हिंदीमध्ये डब करून सुट्टीत लावायचे. ती मी कधीही सोडली नाही. हे सगळे लोक माझ्या फुटकळ हिरोंच्या यादीत मधूनमधून डोकावतात.
         अशा प्रकारे जरा सवय झाल्यावर मात्र एक मोठ्ठा हिरो माझ्या वाचनात सापडला. त्याचं नाव हॉवर्ड रोआर्क. फाऊंटनहेड या कादंबरीचा हा मनस्वी, स्वयंपूर्ण, कामावर प्रेम करणारा आणि कामासाठीच जगणारा स्वयंभू नायक मला कळायला बराच काळ जावा लागला. अत्यंत जीर्ण अवस्थेतली आणि बा‌‌ऽऽऽरिक टायपात छापलेली त्याची अत्यंत कुरूप प्रत हातात पडली तेंव्हा हे सगळं आपलं कधी वाचून होणार ही चिंता मला भेडसावू लागली होती. पण अंगभूत चिकाटीने मी तो डोंगर पार केला. वाचलेलं सगळंच समजलं असा माझा मुळीच दावा नाही. पण जे काय वाचलं ते खूप मोठं, भव्य आणि अर्थपूर्ण आहे हे नक्की जाणवलं होतं. डॉमिनिकवर तर माझी भक्तीच जडली होती. आणि रोआर्क बद्दल तर काय सांगावं? काही न सांगणंच उत्तम कारण ते सगळं सांगण्यासाठी पुरेसे बोलके शब्द माझ्यापाशी नाहीत. गेल वीनंड या इसमाचा मात्र सुरुवातीला मला अतिशय राग आला होता. रोआर्क त्याच्यावर इतकं प्रेम का करतो हे मला कळतच नव्हतं. पीटर कीटिंगची तर दया आली होती मला. मला पीटर कीटिंगसारखं करू नकोस अशी मी सारसबागेतल्या गणपतीला प्रार्थना करत असे.
रात्र रात्र जागून मी ते पुस्तक वाचत होते. मला आठवतंय, मध्यरात्रीचा दीड वाजला होता. दारासमोर ट्रकमधून कसलातरी माल उतरवण्याचं काम सुरू होतं. ट्रक्सची ये जा चालली होती. आईची निकराची बोलणी खाऊनही, धडधडत्या हृदयाने आणि विस्फारित डोळ्यांनी स्वयंपाकघरात, ओट्याजवळ खाली बसून मी फाऊन्टनहेड वाचत होते. प्रसंग होता गेल वीनंड बॅनर मधून रोआर्कच्या मागे सर्वक्तीनिशी उभा राहतो तो. लोक गेल ला नाकारतात. झिडकारतात. आजवर त्याने वाट्टेल ते छापलं तरी ते सहज वाचणारे वाचक त्याचं वर्तमानपत्र विकत घेणं नाकारतात. रात्रीच्या वेळी वृत्तपत्रांच्या गाळ्यांवरून न खपलेले बॅनरचे अंक परत येतात. त्याच्या पहिल्या पानावर रोआर्कचा फोटो छापलेला असतो. तो पाहून गेल ला हसायला येतं कारण न्यू यॉर्क शहरातल्या खुरटलेल्या लोकांना , अशा लोकांना ज्यांच्यात एवढी ताकदच नाही की ते रोआर्कला समजून घेऊ शकतील, गेल हॉवर्ड रोआर्क विकत असतो. तोही तीन डॉलरला एक. ....
हा प्रसंग वाचताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. ते बाहेरचे ट्रकचे आवाज आणि गेलच्या न खपलेल्या प्रती आणणाऱ्या ट्रक्सचे आवाज माझ्या दृष्टीने एकरूप झाले होते. तो प्रसंग जणू काही मी नजरेसमोर घडताना बघत होते. तो क्षण, ती वेळ, तो प्रसंग विसरणं मला प्रयत्न करूनही जमणार नाही. फाऊंटनहेड वाचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं दैदिप्यमान फळ हातात मिळाल्यासारखं मला वाटलं होतं.....
         अजूनही नैराश्याच्या क्षणी मी रोआर्कचं कोर्टातलं तीन पानी भाषण वाचते. खूप बरं वाटतं. रोआर्क अजूनही मला पुरेसा समजलेला नाही. ती वाटचाल चालूच आहे. चालूच राहणार आहे.
रोआर्कनंतर खरं म्हणजे कोणाबद्दल लिहावं असा हिरो सापडणं एरवी मुश्किल ठरलं असतं. पण मला असा एक हिरो सापडला. साधारण पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना, जपानी भाषेच्या वर्गातल्या सेन्सेई आणि एक काका या दोघांनी माझं हॅरी पॉटर या विषयावर बौद्धिक घेतलं. तोवर मी "काय खूळ आहे ! " अशाच नजरेने हॅरीकडे बघत होते. पण हॅरीची सगळी गंमतच आहे. मी पहिलं पुस्तक वाचायच्या त्यावरचा चित्रपट पाहिला. हॅरीने मला वेड लावलं. माझ्या मनातलं जादूचं आकर्षण आणि या जगावेगळ्या पोरक्या मुलाबद्दल वाटणारी सहानुभूती यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मी या कथेत अक्षरशः ओढली गेले. मी हॅरी वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्याची पहिली चार पुस्तकं प्रकाशित झालेली होती आणि पाचव्या पुस्तकाची जोरदार प्रतीक्षा सुरू होती. सटासट एकामागोमाग मी चारही पुस्तकं वाचून काढली. तोवर पाचवं पुस्तकही माझ्या हातात पडलं. जपानीचा अभ्यास करता करता मी आणि काका हॅरी, लॉर्ड व्ही(व्होल्डी!), फॉक्स, यांच्यावर चर्चा करायचो. विशेषतः तिसरं पुस्तक मला विशेष आवडलं. पोरक्या हॅरीला वडीलधारं माणूस म्हणण्याजोगी एकच व्यक्ती म्हणजे सीरिअस भेटतो तो या पुस्तकात. शिवाय जेम्स आणि कंपनीच्या साहसी सफरींबद्दलही याच पुस्तकात वाचकाला कळतं. पॅट्रोनस, मरोडर्स मॅप आणि हॅरीचं विशिष्ट पॅट्रोनस यांच्याबद्दल वाचताना एक थरार जाणवतो. खूप छान वाटतं. हॅरी मोठा होतो तसतशी त्याच्या साहसांची पातळी वाढत जाते. ती वाचताना येणारी मजा वाढतच जाते. तरीही भूतकाळातली सफर, शंभर डिमेंटर्सच्या हल्ल्याला हॅरीने दोनदा दिलेलं समर्थ उत्तर या गोष्टी अद्वितीय आणि विलक्षण गुंगवून सोडणाऱ्या चमत्कृतींबद्दल बोलायचं झाल्यास चौथं पुस्तक जास्त रंजक आहे यात वादच नाही. आणि जादूगारांच्या विश्वाबद्दल अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने पाचव्या पुस्तकाला तोड नाही. पण माझं सगळ्यात आवडतं पुस्तक हे तिसरंच आहे.
         मनोगतावरही अनेक सदस्यांशी हॅरीबाबत चर्चा झाली. माझा एक मनोगती मित्र फ्रेड आणि जॉर्ज या खोडकर जोडगोळीचं काम एकटा निभावू शकेल असं माझं स्पष्ट मत आहे. ते त्यालाही चांगलं ठाऊक आहे. माझी अजून एक मनोगती मैत्रीण आणि मी तर दिवसरात्र हॅरी याच विषयावर चर्चा करत असतो. त्यापायी मोबाईल कंपन्यांना आम्ही कितीतरी नफा मिळवून दिला आहे. आता सातव्या पुस्तकात नक्की काय काय होणार, हॅरी सातवा हॉरक्ऱक्स आहे का? फॉक्स परत येणार का, आर ए बी म्हणजे रेग्यूलस ब्लॅक हे कितपत बरोबर आहे? स्नेप चांगला की वाईट, क्रीचरचा लॉकेट चोरण्यात हात असणं शक्य आहे का? असल्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा करत असतो. सव्वीस जुलै दोन हजार सात दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. पण स्वतः जेकेआर ने म्हटल्याप्रमाणे आता हा मित्र पुन्हा भेटीला येणार नाही म्हणून मनाला चुटपूट लागलेली आहे. हुरहूर लागलेली आहे. एकीकडे सातवं पुस्तक वाचायची अनावर उत्सुकता आणि दुसरीकडे ही मालिका संपल्याबद्दलचं दुःख अशी मनाची रस्सीखेच सुरू आहे.
हॅरीने माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खडतर काळात मला धीर दिलाय. साथ दिली आहे. निखळ आनंद दिला आहे. अनेक कोडी घातली आहेत आणि सोडवूनही दाखवली आहेत. अद्भुतरम्य जगाची सफर घडवून रंजन केलं आहे. सोसायला अवघड अशा दुःखाचा काही काळापुरता का विसर पाडला आहे. आणि दूर गेलेल्या रम्य शालेय जीवनाची गोडी पुन्हा एकदा अनुभवायला दिली आहे. हॅरी नसता तर हा काळ खूपच कठीण गेला असता. यासाठी मी हॅरीची आणि जेकेआरची ऋणी आहे. 
         या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, राऊ, थोरले माधवराव पेशवे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि मदनलाल धिंग्रांपासून ते अनंत कान्हेऱ्यांपर्यंत सगळे वीरवृत्तीचे क्रांतिकारक यांचा समावेश नसेल तर ही यादी निरर्थक ठरेल. पणा ही सगळी खरी माणसं आहेत. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे बराच अभ्यास करायला हवा. त्याशिवाय काहीही लिहिण्याची माझी लायकी नाही. पण वैराग्याचा भगवा रंग माझ्या भावविश्वात मिसळून ते अधिक तेजस्वी करण्यात या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यापुढे मी अक्षरशः नतमस्तक आहे.
सध्या तरी माझं हे हिरोपुराण इथेच थांबवते आहे. पुन्हा नवीन हिरो सापडले की लिहीनच इथे.
राजते लेखनावधिः!
--अदिती
(१ मे २००७,
वैशाख शुद्ध चतुर्दशी, शके १९२९)