दॉस्तायेवस्की, लेखकाचे आयुष्य आणि काही प्रश्न

"अर्थात, तुरुंगातलं आयुष्य कसं असतं याबद्दल दुमत होऊ शकतं," प्रिन्स म्हणाला. "तुरुंगात बारा वर्षं काढलेल्या एका माणसाची मी एकदा गोष्ट ऐकली होती. त्याच्याकडूनच. मी ज्या प्राध्यापकांकडून उपचार करून घेत होतो, तिथेच तोही होता. त्याला नैराश्याचे झटके येत, फीटस येत. अशावेळी मग तो आसवे गाळत बसे. एकदा तर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्याचं तुरुंगातलं आयुष्यही भकास होतं. खिडकीच्या जाळीबाहेर वाढणारं एक झाड आणि कोळी हेच त्याचे तिकडे सोबती होते. पण ते असो. त्यापेक्षा मी तुम्हांला दुसऱ्या एका माणसाबद्दल सांगतो. गेल्यावर्षी भेटलेला. त्याची केसतर निराळीच होती. विचित्र. विचित्र कारण, असं कधी घडल्याचं ऐकलेलं नाही. इतर अनेक कैद्यांबरोबर त्याला कुठल्यातरी राजकीय गुन्ह्याकरता गोळी घालून मारायला आणलं होतं. पण वीसच मिनिटांनी त्याला सोडून दिलं. देहदंडाऐवजी कुठली तरी दुसरीच शिक्षा ठोठावून. पण त्या पंधरा-वीस मिनिटांच्या काळात, आपण मरणार आहोत अशी त्याची ठाम समजूत होती. त्या जीवघेण्या वेळात त्याला काय वाटलं हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती. त्याबद्दल मी त्याला अनेकदा विचारलंही. त्याला सगळं काही लख्खपणे आठवत होतं, आणि त्यातलं काहीही आपण विसरणार नाही असा त्याचा दावा होता.

त्या कैद्यांना शिक्षेसाठी जिकडे आणलं होतं, तिकडून जवळपास वीस पावलांवर जमिनीत रोवलेले तीन खांब उभे होते. त्यांना बांधून गोळ्या घालण्यासाठी! पांढरा पायघोळ पोशाखातल्या पहिल्या तीन कैद्यांना तिथे आणलं गेलं. आपल्यावर रोखलेल्या बंदुका दिसू नयेत, म्हणून त्यांचे चेहरेही पांढऱ्या कपड्यांनी झाकले होते. मग सैनिकांची तुकडी प्रत्येक खांबासमोर उभी राहिली. माझा मित्र त्या यादीत आठवा होता. म्हणजे त्या वधस्तंभांकडे जाणाऱ्या तिसऱ्या गटात. हाती क्रूस घेऊन एक धर्मगुरु त्यांच्याकडे आला. माझ्या मित्राच्या आयुष्यात आता जेमतेम पाच मिनिटं उरली होती.

तो म्हणाला, की ती पाच मिनिटं म्हणजे त्याला प्रचंड खजिन्यासारखी वाटली. कधीच न संपणारा काळाचा खजिना. त्या पाच मिनिटांत इतकी आयुष्यं जगता येतील, की त्या शेवटच्या घटकेचा विचारही करायची काही गरज नाही. व्यवस्थितपणे त्या वेळाचे त्याने भाग पाडले. पहिला हिस्सा आपल्या साथीदारांचा निरोप घेण्यासाठी. त्याच्यासाठी दोन मिनिटं. अजून दोन मिनिटं आपल्या पार पडलेल्या आयुष्याविषयी आणि स्वतःविषयी विचार करायला. आणि बाकी मिनिट, जाताना या जगावर शेवटची नजर फिरवून जाण्यासाठी. अशी वाटणी केल्याचं त्याला चांगलंच आठवतं.

त्याच्या सोबत्यांचा निरोप घेताना, त्यांच्यापैकी एकाला त्याने काहीतरी नेहमीचा, जुजबी औपचारिक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न आणि त्याच्या उत्तरात आपल्याला असणारा रस, हे त्याला पक्कं आठवतंय. निरोप घेतल्यावर, त्याने स्वतःकरता राखून ठेवलेल्या दोन मिनिटांच्या वेळात आपण काय विचार करणार आहोत, हे त्याला आधीच माहीत होतं. जितका लवकर शक्य होईल तितक्या वेळात, अगदी स्पष्टपणे त्याला आपल्या मनावर एकच विचार ठसवायचा होता -- की, आता चालू असणारा आपला श्वास, आपले हे शरीर आणि विचार करणारं मन; आपलं एकंदरीत अस्तित्वच तीन मिनिटांनी नाहीसं होणार आहे. जरी ते कुठल्याप्रकारे टिकून राहिलंच, तरी कुठे आणि कसं? त्याला वाटलं, या शेवटच्या तीन मिनिटांत या प्रश्नाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा. जवळच एक चर्च होतं. मुलामा दिलेला त्याचा मनोरा, सूर्याच्या प्रकाशात झळाळून उठला होता. त्या मनोऱ्याकडे, त्या झळाळत्या किरणांकडे निग्रहाने, काहीशा हट्टीपणानं तो पाहत राहिला. डोळे खिळवून. तीन मिनिटांनी आपण त्या किरणांपैकीच एक होऊ, त्यांचाच एक भाग होऊ असं त्याला वाटलं.

पण हा विचार आणि लवकरच जे अपरिहार्यपणे घडणार आहे यातला विरोधाभास; ही अनिश्चिततेची भावना भयानक होती. पण या सर्वांपेक्षाही भयाण कल्पना ही - की जर माझी आता सुटका झाली, तर काय? मृत्युच्या छायेतून परत जीवनाकडे परतल्यावर जे कधीही न संपणारे, फक्त माझेच असणारे हे अमर्याद दिवस मला मिळतील; त्यांचं करू तरी काय? एकही क्षण वाया जाऊ नये म्हणून मग जी मिनिटामिनिटाला तगमग होईल, त्याचं काय? तो म्हणाला, की या विचारांचं, या कल्पनेचं त्याला इतकं असह्य दडपण आलं, की यापेक्षा त्या सैनिकांनी लगेच गोळ्या झाडून जीव घ्यावा आणि हे सारं एकदाचं संपवावं."

प्रिन्स बोलायचा थांबला. तो पुन्हा बोलणं सुरु करेल आणि ही गोष्ट पूर्ण करेल, या अपेक्षेने इतरही थांबून राहिले.

"एवढंच?" ऍग्लायाने विचारलं.

"हो. एवढंच," तंद्रीतून बाहेर येत प्रिन्स म्हणाला.

"आणि, हे तुम्ही आम्हांला का सांगितलंत?"

"असंच. बोलता बोलता आठवलं म्हणून."

"तुम्हांला असं म्हणायचं असावं, प्रिन्स," अलेक्झांड्रा म्हणाली,"की असे क्षण पैशांत मोजता येत नाहीत. पाच मिनिटंही कधी कधी अनमोल असतात. अगदी मान्य. पण तुमच्या त्या मित्राबद्दल एक विचारु का? त्याला सोडलं, असं तुम्ही म्हणालात. मग त्याने त्या 'कधीही न संपणाऱ्या, अमर्याद दिवसांचं' काय केलं? प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवला?"

"छे, अजिबात नाही. मी विचारलं ना स्वत:च त्याला. तो म्हणाला, की जसं ठरवलं होतं तसं अजिबात झालं नाही. कित्येक मिनिटं त्याने वाया घालवली."

"अच्छा. म्हणजे एक प्रयोग म्हणून जर आपण पाहिलं, तर निष्कर्ष हा निघतो की 'जगायचंय प्रत्येक सेकंद' असं कितीही ठरवलं; तरी ते शक्य होणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, ते अशक्यच आहे."

"खरंय," प्रिन्स म्हणाला. "मीही असाच विचार केला. पण तरी, असं का जगता येऊ नये?"

हा उतारा फ्योदोर दॉस्तायेवस्कीच्या 'द इडियट' या कादंबरीतला आहे. वर वर्णन केलेला प्रसंग, म्हणजे केवळ लेखकाचा कल्पनाविलास नाही तर त्याच्या आयुष्यात वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी गुदरलेला प्रसंग आहे. हेगल आणि इतर तत्त्वज्ञांच्या विचारांबद्दल चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या 'पेट्राशेव्हस्की सर्कल'ला राजद्रोही ठरवून रशियाच्या पहिल्या निकोलसने, दॉस्तायेवस्की आणि इतर साहित्यिक/विचारवंतांना १८४९ साली देहदंडाची शिक्षा ठोठावली. अटकेनंतर सात महिन्यांनी, रशियन हिवाळ्यात कुडकुडत सैनिकांच्या गोळ्यांची वाट पाहत असताना, दॉस्तायेव्हस्कीची देहदंडाची शिक्षा रद्द होऊन, त्याऐवजी त्याला सैबेरियात चार वर्षांच्या अज्ञातवासात पाठवले गेले.

अर्थात, या घटनेचा दॉस्तायेव्हस्कीच्या आयुष्यावर आणि पर्यायाने लेखनावर खोल परिणाम झाला. "जगणं आपल्या हाती आहे, इतरांच्या नाही. माणसांमध्ये फक्त एक माणूस बनून राहणं; आणि कितीही संकटं, दुर्दैवी प्रसंग आले तरी निराश वा विचलीत न होणं हेच जीवनाचं ध्येय आहे; हेच जीवन आहे." -- त्या अग्निदिव्यातून पार पडल्यावर काही दिवसांतच आपल्याला भावाला लिहिलेल्या पत्रातील या वाक्यातून त्याच्या विचारांच्या दिशेची कल्पना येते. शिक्षा भोगून परत आल्यावर, त्याने लिहिलेल्या 'क्राईम अँड पनिशमेंट', 'द इडियट' आणि 'द ब्रदर्स कॅरामाझोव्ह' या कादंबऱ्यांची गणना आत्तापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांत होते. ज्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची (Existentialism) पायाभरणी दॉस्तायेव्हस्कीने केली, त्या तत्त्वज्ञानाचा या कादंबऱ्यांवर मोठा प्रभाव आहे. 

पण या तिन्हींपैकी, 'द इडियट' कादंबरीत दॉस्तायेव्हस्कीच्या वैयक्तिक आयुष्यातील भाग अधिक आहे. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असणारा; ख्रिस्ताच्या जीवनाने, त्यागाने प्रभावित झालेला; युरोपातील उपचार संपल्यावर पीटर्सबर्गच्या उच्चभ्रू वर्तुळात आलेला 'इडियट' प्रिन्स मिश्किन आणि सैबेरियातून सुटून आलेला, प्रिन्ससारखेच विचार असणारा, लहानपणापासून येणाऱ्या फीट्सच्या आजाराने बेजार दॉस्तायेव्हस्की यांच्यात कमालीचे साम्य आहे.

अर्थात, वर लिहिलेला खोट्या देहदंडाच्या शिक्षेचा प्रसंगाने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली यात संशय नाही. पण मला यावरून एक प्रश्न पडतो, की जर दॉस्तायेव्हस्की पूर्वीचे आपले सुखासीन आयुष्य जगत राहिला असता तर त्याच्या हातून हे लेखन झालं असतं का? दुसऱ्या शब्दांत, असलं असामान्य लेखन करायला प्रतिभेच्या वरदानाबरोबरच त्या लेखकाचं जीवनही तसंच चाकोरीबाहेरचं हवं का? की फक्त प्रतिभेची झेपच इतकी विलक्षण असते, की ती दैनंदिन जीवनाच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते?

नागपुरातील एका डॉक्टरांनी मेघदूत वाचून हाती घेतलेल्या एका उपक्रमाबद्दल काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचल्याचं आठवतं. मेघदुतातील त्या ढगाचा रामगिरी ते हिमालय हा प्रवास त्यांनी विमानातून केला. वाटेत लागणाऱ्या नद्यांचे, सरोवरांचे आकार किंवा दरी-डोंगरांमुळे निर्माण होणारे आकृतिबंध -- अशा गोष्टी ज्या केवळ इतक्या उंचीवरुन पाहिल्यावरच लक्षात येऊ शकतात आणि त्यांची मेघदुतातील वर्णने, तंतोतंत जुळत होती. कालिदासाची प्रतिभा अचूक निसर्गवर्णनापुरतीच मर्यादित होती, हे सांगायचा अर्थातच यामागचा उद्देश नाही; तर फक्त वरील परिच्छेदातील शेवटच्या वाक्यातील मुद्दा स्पष्ट करणे एवढाच आहे. (शिवाय ही माहिती केवळ स्मरणातून देत आहे, त्याबद्दलचा दुवा माझ्याकडे नाही. तेव्हा चू. भू. दे. घे.)

पण हे असं कालिदासासारखं वा ज्ञानेश्वरांसारखं अलौकिक प्रतिभेचं देणं, शतकाशतकांतून केवळ एखाद्यालाच मिळतं. इतरांच्या बाबत मात्र 'मज अंगीच्या अनुभवे, मज वाईट बरवे ठावें' हेच खरं असावं आणि त्यामुळे मग मोजके अपवाद सोडले, तर 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?' अशी स्थिती.

 प्रत्यक्ष लेखकांना याबाबत काय वाटतं? 'रथचक्र'च्या प्रस्तावनेत श्री. ना. पेंडसे म्हणतात, "पाश्चात्यांच्या तुलनेने मराठी कादंबरी, लघुकथा आजही खुज्या वाटतील. पण अशा तऱ्हेची तुलना मराठी कादंबरीकार, कथाकार, टीकाकार यांना एका दृष्टीने अन्याय करणारी आहे. आपल्या एकंदर जीवनाची लांबीरुंदीच इतकी छाटछूट आहे - त्यापैकी ललित साहित्याला खड्यासारखं उचलून त्यावर ही तुलनेची तरवार चालवायची तर त्यातून विपरीत निष्कर्षापलीकडे हाती काही लागणार नाही."..."कोणतीही कलाकृती मूलतः आत्मचरित्रात्मकच असते. आपल्या अनुभवविश्वाच्या कक्षा कलावंताला ओलांडता येत नाहीत. ज्या क्षणी हे इमान तो सोडतो त्या क्षणी कलेतील सच्चेपणा संपतो. "

मराठीला नोबेल कधी मिळणार किंवा मराठी साहित्यात शेक्सपिअर-टॉलस्टॉय-टागोर कसे निर्माण होतील, याविषयावर अनेक हेमंत-वसंत-शिशिर व्याख्यानमाला रंगतात; परिसंवाद झडतात. त्यासंदर्भात पेंडशांचे विचार महत्त्वाचे आहेत. संपूर्ण समाज ढवळून काढणाऱ्या, जुन्या जीवनपद्धतीला मोडीत काढणाऱ्या कितीशा घटना महाराष्ट्रात घडल्या? रशियन राज्यक्रांती, दोन्ही महायुद्धे किंवा फाळणी यासारख्या घटनांचा थेट परिणाम असा आपल्या जीवनावर झालाच नाही. [हे सारं, 'अ = ब' इतकं सोपं नाहीच. उद्या महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली तर त्यामुळे लगेच उत्कृष्ट साहित्य निर्माण होईल, असे नाही.] हे एक कारण, आणि बहुजन वर्गाला अजून मराठीत लेखन करता येत नाही आणि अभिजनांना इंग्रजी अधिक जवळची वाटते, त्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायांतले लोक आणि त्यांचे अनुभव मराठीत अजूनही म्हणावे तितके येत नाहीत, हे दुसरे.

अर्थात, हे चित्र आता थोडेफार बदलू लागले आहे. 'इडली, ऑर्किड आणि मी', 'ब्र', 'चकवाचांदण' अशी वेगळ्या वाटेवरची पुस्तके मराठीत येत आहेत. जागतिक साहित्यातही, युरोपीय भाषांव्यतिरिक्त इतर साहित्याची, लेखकांची दखल अधिक प्रमाणात घेतली जाऊ लागली आहे. जागतिकीकरणामुळे नवीन अनुभवांची मक्तेदारी केवळ पहिल्या दोन जगांकडेच राहिलेली नाही. जागतिकीकरणाचा रेटा, त्याचे फायदे-तोटे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे साऱ्याच समाजांना स्पर्शणारे विषय आहेत. त्यांचे पडसाद तिसऱ्या जगातील लेखकांच्या लेखनातून उमटायला सुरुवात झाली आहे. किरण देसाईंचे पुलित्झर पारितोषिक मिळवणारे 'द इन्हेरिटन्स ऑफ लॉस' असो किंवा ओरहान पामुकांचे 'इस्तंबूल', त्यामागची मूळ प्रेरणा हीच आहे. तेव्हा मराठीतही काही काळाने याच तोलामोलाचे साहित्य निर्माण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी का?

[हाच लेख येथेही वाचता येईल.]