कुठे बरं वाचलंय हे? -३

महाभारताची शोकांतिका कशात आहे? द्रौपदीच्या पुत्रांच्या निधनात? कर्णाच्या बलिदानात? कुंतीच्या अविरत वाहत्या दुःखाच्याधारेत? कौरवाच्या भीषण संहारात? मला वाटते, हे सारे दुःख एकत्र केले तरी ज्ञानलालसेतून जन्मलेल्या ज्या अभिमानाने, आणिलीनतेने काठोकाठ भरलेल्या ज्या अभिनव अनामिक दुःखाने एकलव्याला पूर्णपणे एकाकी केले, त्या दुःखाच्या कणाचीही बरोबरी याथोरांच्या जगन्मान्य दुःखांना यायची नाही. आणि कशी येणार? त्यांच्या प्रत्येकाच्या दुःखांत स्वतःचीही काही प्रमादांची भागीदारी होती. स्वतःच्या कर्माचे भोक्तृत्व होते. पण एकलव्याचे भोक्तृत्व? त्याचे अखेरपर्यंत वर्णन करायला व्यासांचीही लेखणी आखडली. मात्र जिथे एकलव्याची कथा संपली, तिथे तो धागा एकदमच गुंडाळून घेऊन त्याला कायमचा विराम--अपुऱ्या अवस्थेतविराम--देण्याचे जे कसब व्यासाने दाखविले आहे त्याला तोड नाही. कवीचे मौन हे सर्वात निर्माणशील असते असे म्हणतात. त्यादृष्टीने पाहिले तर आपल्या कृतीत असे निर्मितीची बीजे पोटी साठवणारे मौन एकट्या व्यासानेच धारण केलेले मला दिसते. मात्र कधी संदेह येतो की, प्रतिष्ठितपणाच्या गाभ्यालाच आव्हान देणाऱ्या झोंबऱ्या व चावऱ्या सत्यालाच झाकून टाकायची'नरो वा कुंजरो वा' अशी चलाखी तर याच्यामागे नसेल? थोडे सांतिगले व सत्याची एक झलक कायम राखली. वरवरपाहता एकलव्याची कथा जशी घडली तशी आली. पण तिचे साद-पडसाद? कुठे गेले ते? देवयानीच्या प्रेमहानीचा आक्रोश, त्याचे सारे सारे सूक्ष्म प्रतिध्वनी स्वच्छपणे ऐकू येतात. दमयंतीची व्यथा, तिचे सुखही किती कोमलपणे सांगितले गेले. सावित्रीच्यापातिव्रत्याची कथा पावित्र्याने ओसंडून गेली. पण एकलव्याची कथा सांगताना मात्र रोकडा एकसूरआणि अतिसंक्षिप्त वाणी का वापरली गेली? इथे कविमन तुडुंब भरून जाण्यासारखे काहीच नव्हते? ओसंडून पुरासारखे वाहूनजाण्याइतके आवेगी सत्य इथे नव्हतेच काय?
...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?

सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी,
प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या
तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!