कुठे बरं वाचलंय हे? -१५

कैलास बँकेतून घरी आला तेव्हा कांता ट्यूशन घेत होती. ती घरच्या घरी पाचवी ते सातवीच्या मुलांना गणित-सायन्स शिकवायची. तिची ट्यूशन संपताच कैलासने तिला घाईघाईने सांगितलं.

"यंदा एक महत्त्वाची गोष्ट घडणारे गं... "

"काय? "

"मी व्हीआरएस घेणारे! "

"घ्या. कुठलं मॉडेल घेताय? "

कांताने ह्या कानापासून त्या कानापर्यंत मान हालवत रुकार भरला. पन्नाशीच्या जवळ आल्यापासून तिने हे एक धोरण अवलंबलं होतं. नवऱ्याच्या कोणत्याही म्हणण्याला तात्काळ मान्यता द्यायची. नवं विमान घ्यायचं म्हणतोस? घे. गच्चीवरून उडी मारणारेस? मार. विरोध नको. कटकट नको. त्याला करायचं ते करू द्यावं, नाहीतरी आपण आपल्याला हवे तसे जगणार नसतोच.

"हा फार मोठा इव्हेण्ट आहे कांता. ट्राय टू अंडरस्टँड. मी व्हीआरएस घेतोय. "

"घ्या की मग. होऊन जाऊ दे मनासारखं." कांताने पुन्हा संमती दिली. व्हीआरएस हा शब्द अलीकडे बरेचदा तिच्या कानावरून गेलेला होता. पण तिने त्यात फारसं लक्ष घातलेलं नव्हतं. आपला नवरा फारसं महत्त्वाचं काही बोलत नाही, तेव्हा त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही या पक्क्या विश्वासावर तर तिने संसार केला होता. कैलास मात्र अजूनही जरा त्रासलेला दिसत होता.

"तसं नाहीये कांता. बँकेला माणसं कमी करावी लागताहेत. विशेषतः आता आपल्या वयातली माणसं नको आहेत त्यांना. त्यांना नवी टेक्नॉलॉजी हवीये. नवं रक्त हवंय. "

"मग आमच्या घरी बघा म्हणावं. सगळं नवंच रक्त आहे हल्ली. किशोर आणि किमयाच नवा कोरा संसार चाललाय आता. रोज बघावं तर नव्या वस्तू. नव्याचं कौतुक आम्हाला काय सांगताय म्हणावं? आम्ही दोघं सोडलो तर सगळं नवंच आहे घरात. " कांताने एकदमच घरगुती वळणावर गाडी नेली.

...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!