कुठे बरं वाचलंय हे? -११

पुणे स्टेशनातल्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून चालत होतो. बाजूला टांगलेली पितळी घंटा सोन्यासारखी चकाकत होती. फर्स्ट क्लास वेटिंग रूमकडे जाणाऱ्या निन्यावर हिरवी कार्पेट पसरून त्यावर ठोकलेल्या पितळी चकचकीत पट्ट्या उठून दिसत होत्या. पलीकडे भिंतीवर एका शोकेसमध्ये गेली बरीच वर्षे पुणे स्टेशनला 'सर्व भारतातले स्वच्छ स्टेशन' म्हणून पारितोषिक मिळाल्याचे फोटो लावलेले होते.

प्लॅटफॉर्मच्या शेवटी असलेल्या पॅसेजमधून थर्ड क्लास वेटिंगरूमच्या प्रचंड हॉलमध्ये आलो.

तिथे माणसांचा खच पडलेला होता. पाऊल ठेवायला जागा नव्हती. खेडेगावी फेटे, स्त्रियांची लुगडी पाहून ही मंडळी नेहमीची वाटत नव्हती. कुटुंबेच्या कुटुंबे एकत्र बसली होती. प्रत्येक कुटुंबाकडे काय काय वस्तू एकत्र बांधलेले एखाददुसरे गाठोडे दिसायचे. बाहेर पडलो तर समोरचे सर्व पटांगण अशाच मंडळींनी भरून गेलेले. इथे तर चुली मांडलेल्या आणि धूरही येताना दिसत होता. सर्वत्र कचरा पडलेला होता. उघडीनागडी मुले त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा परिघ न सोडता इकडे तिकडे फिरत होती. पलीकडल्या भिंतीपाशी मानवी विष्ठेचा सडा पडलेला होता. त्याच्या पलीकडे रस्त्यावर नेहमीचे फळे विकणारे, शेंगा-खारेदाणे विकणारे लोक आपापल्या गाड्या घेऊन वैतागून उभे होते. शेजारीच रिक्षातळ होता. तिथून स्टेशनावर गाडी पकडायला जाणारे लोक हा सगळा प्रकार बघून वैतागत आणि घाईघाईने त्यातून रस्ता काढीत.

त्यांच्या वेशांवरून ते या शहरातले नेहमीचे दिसत नव्हते. नवेच, पण परप्रांतातलेही नव्हते. महाराष्ट्रातल्याच खेड्यापाड्यांतले दिसत होते. जवळपास आळंदीची किंवा पंढरपूरची यात्रा नव्हती. आणि एकूण कंगालीवरून हे कुठलेच यात्रेकरू वाटत नव्हते.

...


 कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?

सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!