कुठे बरं वाचलंय हे? -१४

....

मनात सौहार्द जागं असलं तर विचारातला कठोरपणा कमी व्हायला मदत होते. बुद्धीमान असला तरी एकाकी असणारा माणूस अतिशय निर्दयतेने वागतो आणि सामान्य माणसाच्या निर्बुद्धतेने क्षुब्ध होऊ शकतो. अगदी प्रतिष्ठीत व सुसंस्कृत माणसांनाही कविमन लाभलेलं नसलं तर आयुष्य अळणी वाटू लागतं. अहंगंडाने पछाडलेल्यांना सामान्य दर्जाची कोणतीही गोष्ट म्हणजे घृणा निर्माण करणाऱ्या दलदलीसारखी वाटते. मैत्रीची भावना विचारातला एकांगीपणा घालवते आणि सामान्य बुद्धीला पडणाऱ्या मर्यादांवरच्या अवास्तव टीकेची धार बोथट करते. या मैत्रीत ताठरपणा असत नाही पण माणसातल्या अपुरेपणाकडे व वैशिष्ट्यपूर्ण स्वभावछटांकडे तिचे लक्ष असते. या रुक्ष जगरहाटीचा ताप सुसह्य होतो अंतरीच्या स्नेहामुळे! अगदी हळूहळू वाढणाऱ्या झाडांवरील सुंदर फुलासारखा किंवा मधुर फळासारखा फुलत जातो हा स्नेह! जिथे बाकी सगळं अतिसामान्य आहे तिथे हा स्नेह प्रखर ज्योतीसारखा चमकून उठतो आणि रुक्ष, नीरस परिसरात एखाद्या विविधरंगी स्फटिकासारखा दिसतो. दडलेलं अंतरंग जाणून घेण्यासाठी आपल्याला अप्रिय असलेला बाहेरचा मुखवटा दूर करायला ही मैत्री मदत करते.

बुद्धिमंतांना प्रेमाची भूक असते तर प्रेमिकांना शहाणपणाची. ज्यांचं मन विकारांनी ग्रासलेलं आहे आणि ज्यांच्या विचारांत गुंतागुंत आहे त्यांनी खरं पाहिलं तर समाजकार्यात पडता कामा नये. अशाने लोकांपुढे चुकीचा आदर्श येण्याची शक्यता आहे. परिस्थितीवर मात करण्याची तुमची जिद्द हेच तर खरं आजच्या बुद्धिमंत व निष्ठावान तरुण-तरुणींना आव्हान आहे. काल्पनिक अडचणी उभ्या करणारं नैराश्य आणि सत्यस्थितीकडे डोळेझाक करायला लावणारा आंधळा आशावाद हे दोन्ही टाळून निष्काम वृत्तीनं काम केलं तर सत्याला सामोरं जाण्याची वृत्ती व आदर्शवाद रुजवण्यात अडचण येत नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

(सदर भाग मेघना नरवणेंकडून साभार)