कुठे बरं वाचलंय हे? -१३

...

...

हर्षदकडे नजर राहील, असा विलास बसला आणि कामाला लागला. अजिबात आवाज होणार नाही, ह्याची काळजी घेत काम करू लागला. फुलपाखरांची रंगीत छायाचित्रे तो आल्बममध्ये डकवत होता. दोन छायाचित्रे डकवून झाली होती. सहा डकवायची होती. छायाचित्र आल्बममधल्या चौकटीच्या आकारात कापून घ्यायचे. मग डकवायचे. छायाचित्राखाली त्या फुलपाखराची शास्त्रीय माहिती लिहायची. विलास थांबत थांबत काम करत होता. छायाचित्राचा आकार कापताना थांबून राहायचा. फुलपाखराची शास्त्रीय माहिती लिहिताना मधेमध्ये थांबायचा. एका छायाचित्राचे काम पूर्ण झाल्यावर बराच वेळ नुस्ता बसून राह्यचा. कामात तो रंगला होता. कामत तो आनंदित होता आणि त्याला पडेल असे वाटत होते. आपण आनंदी आहोत आणि पडेल आहोत, हे त्याला अर्धवटपणे जाणवत होते. त्याची सर्जनशीलता अपरिपाक होती. फुलपाखरांची छायाचित्रे आणि शास्त्रीय माहिती ह्यांचा संबंध विलासच्या मनात आधिभौतिक मुद्द्यांपर्यंत पोहोचला नव्हता.

विलासचे चार छायाचित्रे डकवण्याचे काम पूर्ण झाले. आनंद होत होता. पडेल वाटत होते. थांबून मग त्याने पाचवे छायाचित्र हातात घेतले.

हर्षदचे दचकल्यागत होऊन डोळे उघडले गेले, त्याने मिटवून घेतले. घट्ट मिटवले. दोन्ही भुवया खाली ओढून गालांना खालून जोर लावून डोळ्यांकडे खालून फुगवून डोळे मिटायचा घट्टपणा वाढवला. चेहेऱ्याचा विपर्यास झाला. ही सक्त, अनैसर्गिक स्थिती फार वेळ टिकणे शक्यच नव्हते. भुवया जागच्या जागी गेल्या. गालांचे स्नायू मूळ जागी परतले. चेहेरा मूळ झाला. डोळे उघडले गेले. विलास दिसला. विलास डावीकडून दिसत होता. फुलपाखराचे छायाचित्र दोन्ही हातात धरून नुस्ता बघत होता. बसलेल्या विलासची उंची जाणवत होती. डावा लांबडा पूर्ण हात, उजवा कोपरापासूनचा लांबडा अर्था हात, लांबडी बोटं, लांबडी मान.... विलासचा हाडकुळेपणा रेखीव दिसत होता.

...

...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!