कुठे बरं वाचलंय हे? -१०

आम्ही  सर्व भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असू. मध्यम उंची. काळा ओबडधोबड चेहरा. मुद्रा करारी. पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खट्याळ छटा. धोतर, पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव. हातात काठी, मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठी जास्त. मध्यमवर्गीय नोकरपेशे 'ऑफिसमधून' येत असतात. दादा 'कामावरून' यायचे आणि येताना आम्हा मुलांसाठी नानकटाई आणायचे.

दादा सहसा रागावत नसत. मात्र रागावले की साक्षात जमदग्नी. भावंडांमध्ये मी सहावा आणि सर्वात धाकटा. त्यामुळे माझ्या लहानपणी ते पन्नाशीत पोचले असावेत; त्यांचे काही दात पडून गेले होते. त्यामुळे रागावून त्यांनी दातओठ खाल्ले की ते अक्राळविक्राळ दिसत. माझी तर पाचावर धारण बसत असे. त्यावेळी ते चिडले की 'डॅमलाडी बिस्किट' म्हणून ओरडायचे.

'डॅमलाडी बिस्किट' हा काय प्रकार आहे हे मला सुरुवातीला कळत नव्हते. "आता यापुढे तुला नानकटाईसारखी बिस्किटं आणणार नाही" असा त्याचा अर्थ असवा असे मला वाटत होते. 'डॅमलाडी बिस्किट' म्हणजे 'डॅम, ब्लडी, बास्टर्ड' हे कळायला बरीच वर्षे जावी लागली. पुढे स्वतः होऊन त्यांनी अशा शिव्या द्यायचे बंद केले. खूप वर्षांनी, 'डॅमलाडी बिस्किट'बद्दल मी त्यांना टोकले. त्यावेळी, 'इरोपेन सायबा'बरोबर काम केल्यामुळे त्या शिव्या तोंडात बसल्या हे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ते सांगताना, "मी इंग्लिश शिकलो ते काय तुमच्यासारखे फादर-मदर आणि चादर एकत्र गुंडाळणाऱ्या एखाद्या देशी मास्तरकडून नाही" तर 'डायरेक्ट इरोपेन सायबा'कडून याबद्दलच्या अभिमानाने त्यांचे डोळे लकलकत होते.


 कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!