कुठे बरं वाचलंय हे? - ७

या क्षणाला विमानातल्या या सीटवर असण्यापेक्षा इतरत्र कुठेही असणे त्याला आवडले असते. ती जादू करण्यासाठी कुठल्याही वेड्याला त्याने पाचशे रुपयेसुद्धा दिले असते. विमानातल्या त्या बंद कोंदट वातावरणात त्याचा जीव उबला होता. बाजूच्या वीतभर खिडकीच्या चरे पडलेल्या मळकट काचेतून एअरपोर्टचे दिवे अस्पष्ट दिसत होते. फूटभर अरुंद पॅसेजमधून शिष्ट वाटणाऱ्या एअर होस्टेसेस कंटाळलेल्या चेहऱ्याने पुढेमागे धावत होत्या. विमानात बघावं तिथे सीटस दिसत होत्या. त्यावर टेकलेल्या डोक्यांवर अलिप्त, बधिर मुखवटे होते. प्रत्येक माणूस दुसऱ्याला त्रासलेला होता. कुबट कोंदूस उबेला वैतागला होता. एअर कंडिशनरचे सारे ब्लोअर्स सताड उघडे होते. तरीही वातावरणात घामाचा चिकटा जाणवत होता.

हळूहळू सारे स्थिरावले. कप्तानाने स्पीकर्सवरून साऱ्यांना अभिवादन केले. कर्कश आवाज करत विमान हलले. एअरपोर्टचे दिवे फिरले.

त्या दिव्यांपाठूनच कोठून तरी आई, बाबांनी, बहिणींनी, त्याच्या मित्रांनी हात उंचावले असणार. जोरजोराने हलवले असणार. इतरांना पोचवताना त्यानेही हलवला होता. कदाचित दिसला तर दिसेल या आशेने.

----------

कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?
वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!