कुठे बरं वाचलंय हे? -५

स्वयंपाकघरातल्या ओट्याजवळच्या सिंकमधला आमचा म्युनिसिपालटीचा नळ उघडा राहिला असेल हे आठवल्याबरोबर माझं समोरच्या गप्पांमधलं लक्ष उडालं. भरीत भर म्हणजे सिंकची खालून पाणी जाणारी वाट मीच झुरळांचा प्रतिबंध करण्यासाठी बंद केली होती. पाणी आलं असतं तर खैर नव्हती. वास्तविक माझ्या समोरच्या गप्पा फारच रंगल्या होत्या. हजर नसलेल्या बहुतेकींचे यथाशक्ति उद्धार करून झाले होते. आपापल्या मुलांची खरी आणि नवऱ्यांची खोटी कौतुकं रंगवून झालेली होती. जी ती टिपेच्या आवाजात आपापला मुद्दा लावून धरत होती. साधारणपणे टीव्हीवरच्या चर्चांमध्ये असतो तसा कलकलाट, एकाच वेळी तिघाचौघांनी बोलणं आणि दुसऱ्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं वाक्य पूर्ण करू न देणं असा प्रकार चालला होता. पण ते नळाचं आठवलं आणि माझी चुळबूळ चालू झाली. हळूच घड्याळाकडे बघत पर्स चाचपणं, स्कूटरची किल्ली बाहेर काढणं, ती बोटात खेळवणं, समारोपवजा हसणं, संभाषणात भलतीकडे 'अरे वा !' म्हणणं ('हिच्या मिस्टरांना एवढ्यातल्या एवढ्यात टक्कल पडलं ग... अरे वा! ' इ. ) अशा कृतींमधून माझी अस्वस्थता दिसत होती. शेवटी कोणीतरी विचारलंच, "का ग, तुला निघायला हवं का? "

"हूं! एकदम आठवलं, म्युनिसिपालटीचं पाणी आज दुपारी सुटणार होतं. "

"मग तू काय करणारेस? "

"घरी जाऊन नळ बंद आहे ना हे बघायला हवं. "

"तेवढ्यासाठी तू जाणार?"

"मग काय करू? संध्याकाळपर्यंत घराचा पोहण्याचा तलाव झाला तर मलाच निस्तरावं लागेल. "

"घरी कोणी नाहीये का? मुलं, नवरा वगैरे? "

"आहेत ना! पण ते नळ बंद करतीलच याची खात्री नाही. "

"पाहुणे आहेत? "

"हूं! आमच्याकडे नेहमीच पाहुणे. अगदी बारा महिने, तेरा काळ पाहुणे असतात बाई आमच्या घरात. "

...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!