कुठे बरं वाचलंय हे? -१

--- पाटलाचे मूळ गाव डेहेणी; पण ते राहायचे यवतमाळमध्येच. यवतमाळमधला मध्यम आकाराचा त्यांचा वाडा चांगला भरवस्तीत होता. ओसऱ्यांच्या आतल्या बाजूला राहण्यासाठी आणि धान्य, शेंगा, पत्रावळी साठविण्यासाठी दोन-चार खोल्या होत्या, तर बाहेरच्या रस्त्याच्या बाजूला, दुकानांसाठी काढलेले, भाड्याने देता यावेत असे चार-सहा लहान गाळे होते. मधल्या अंगणात मोठं उंबराचं झाड, आणि त्याच्या आसपासच बोरीची दोन लहान खुरटी झुडपंही होती. त्या तेवढ्या झाडांमुळंही अंगणात पाऊल टाकणाऱ्या माणसाला आत आल्यावर थोडासा गारवा वाटायचा. पण बाकी एकूण सगळा रखरखाटच! वाड्याच्या मागच्या अंगणातल्या विहिरीला बारा महिने बऱ्यापैकी पाणी असल्यानं आजूबाजूची चार-सहा बिऱ्हाडं अडीअडचणीला तिथून पाणी भरायची,पण तीही मुकाट्यानं अन् चोरपावलानं! येणाऱ्या-जाणाऱ्या सग्या-सोयऱ्यांनी पाटलांचा वाडा गजबजलेला आहे असं कधीच नसायचं. मुख्य म्हणजे पाटलीणबाईच्या कडक स्वभावाचा घरातल्यांना आणि घराबाहेरच्यांना, सगळ्यांनाच नुसता ध्यास असायचा.केव्हा कुठून वीज कडाडेल त्याचा नेम नसायचा. स्वतः पाटील सुद्धा तिला अगदी दबून असायचे. कधी तरी गरज पडल्यासतिच्याशी दबूनच बोलायचे.

उंचापुऱ्या, रुंद हाडाच्या पाटलीणबाईचं खरं नाव होतं ----, पण गावातले लोक मात्र तिला '---- --' म्हणून ओळखायचे. जेव्हा हे नाव पडलं तेव्हा पाटलीण काही बुढ्ढी म्हणावी अशी नव्हती, प्रौढच होती. पण ते नाव तिच्या 'वडीलपणा'ला चांगलं शोभायचं.


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
ह्यातील पाटील आणि पाटलिणीची मूळ नावे कोणती?
पाटलीणीला लोक कोणत्या नावाने ओळखायचे?

सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!