कुठे बरं वाचलंय हे? -१२

     "मी श्रद्धाळू माणूस आहे. मी जितका श्रद्धाळू आहे तितकाच विज्ञानवादीही आहे. माझी देवावर आणि विज्ञानावर सारखीच श्रद्धा आहे. मी देवाच्या ठिकाणी देवाला आणि विज्ञानाच्या ठिकाणी विज्ञानाला मानतो." भाऊंच्या अशा वाक्यांचा अर्थ शोधण्याचा मूर्खपणा त्यांच्या सहवासातला शहाणा माणूस कधीच करत नव्हता. तिऱ्हाईताला मात्र अशा वाक्यांनी भोवळ यायची. तो एखाद्या वाक्याच्या अर्थासाठी झटायचा, तोवर भाऊ त्याच्यावर अशा अनाकलनीय वाक्यांचा पाऊस पाडायचे. तर भाऊ सांगत होते. "अशा पत्रिकांमधली किंवा संतोषीमातेच्या पत्रांमधली गोष्ट खरी नसते हे मला कळतं, परंतु मला जर संतोषीमातेचं पत्र आलं तर मी सोळा किंवा त्यात सांगितली असतील तितकी पत्रं इतरांना धाडल्याशिवाय राहणार नाही. आता, ह्या पत्रिकेतला मजकूर खोटा आहे हे मला कळतं, परंतु मी ती फाडू शकत नाही. त्यासाठी लागणारी हिंमत माझ्याजवळ नाही. याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा आणि मलाही मूर्ख म्हणायचं का शहाणा, अर्धमूर्ख की अर्धशहाणा, काय ते तुम्हीच ठरवा. आपला कशालाच विरोध नाही."

     "भाऊ, अनिश्चित असली तरी तुमच्याजवळ निदान भूमिका तरी आहे. तुमचं कसं सर्व स्पष्ट आणि स्वच्छ. आत एक आणि बाहेर एक असं नाही. पण इतरांजवळ अशीही भूमिका नसते ते पूर्ण अंधश्रद्धाळू असतात आणि अंधश्रद्धेलाच शहाणपणा समजतात याचा मला संताप येतो."

     "नवलाखे, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला पत्रिका फाडावीशी वाटली. तुम्ही फाडली. मला ती इथं काचेखाली ठेवावीशी वाटली. मी ठेवली. बाईंना कदाचित ती फ्रेम करून ठेवावीशी वाटेल तर ठेवू द्या. तो त्यांचा प्रश्न आहे."

     "भाऊ, मी पत्रिका फाडली. एक शब्दही बोललो नाही. माझी फाडण्याची कृती उत्स्फूर्त होती. मी माझा शहाणपणा किंवा इतरांचा मूर्खपणा ठरवण्यासाठी काही मुद्दाम तसं केलं नाही."

     "बाकी आपल्या शहाणपणाचा युक्तिवादही तुम्ही चांगला करता बरं, नवलाखे, शहाणेच तुम्ही. आम्ही मूर्ख." असं तावातावानं म्हणत पाठक मॅडम ऑफिसातून बाहेर पडल्या. त्यांच्यामागं; गायीमागं कालवडी म्हणजे काऱ्होडी जाव्यात तशा बाकीच्या उठल्या.

...


 कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?

सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे! (हा खालचा उतारा मेघना नरवणे यांच्या उताऱ्यावरून साभार.)