कुठे बरं वाचलंय हे? - ८

सकाळी उठून, कोरिन्थचा जगप्रसिद्ध कालवा ओलांडून आम्ही तिथल्या अवशेषांपर्यंत पोचेतो दुपार झाली होती, आणि बरेचसे पर्यटक जेवायच्या मागे लागले होते, म्हणून आम्हांला गर्दी भेटली नाही. दिमित्रीने तिथे मीडियाची गोष्ट सांगितली; ती ऐकून मी थक्क होऊन विचारले, "आपल्या भावाला ठार मारून तिने त्याचे तुकडे बापासमोर टाकले! बापरे! " आणि मग हसत म्हटले,"कितीही भाऊ नकोसा झाला तरी असं करतात का!"

मग तोही खूप हसला आणि म्हणाला, "ग्रीक पुराणा-इतिहासावर हा नवाच प्रकाश पाडणारा एक लेख तू का लिहित नाहीस?"

आणि मग त्या 'लेखा'मध्ये घालायला आम्ही निरनिराळे प्रसंग तयार केले : इफिगेनियाने आईची आठवण काढून रडारड आणि कटकट केली म्हणून ऍगामेम्नॉनने तिला समुद्रात ढकलून दिले; किंवा यूलिसिसला बायकोचा कंटाळा आला होता (सतत विणाकामच करत बसलेल्या बायकोचा कुणालाही येईल!) म्हणून त्याने सात आठ वर्षे जलपर्यटनात काढली, वाटेत इतर बायका मिळवून जनरल मजा केली आणि ते तिला कळू नये म्हणून फार संकटातून वाट काढल्याच्या बाता मारल्या; आणि अफ्रोडायटी खरे तर यथातथाच असली पाहिजे, नाहीतर आपण सर्वात सुंदर आहोत असे म्हणायसाठी पॅरिसला लाच द्यायची तिच्यावर का पाळी यावी?

कुठंतरी वाचल्यासारखं वाटतं ना हे? चला आठवा बरं पटकन! लेखक/लेखिका आणि पुस्तक ओळखा पाहू? शक्य झाल्यास हे वर्णन कुठलं आहे हेही आठवतंय का बघा!