कुठे बरं वाचलंय हे? -२

-- मुंबईला निघून गेला. त्याच्यासोबत असण्याची मला फार सवय झाली होती. आता सगळा दिवस मला खायला उठू लागला.काही कारणानं आम्ही सारखे भेटायचो; खूप वेळ एकत्र घालवायचो. कधी ग्राऊंडवर, कधी नुसतंच फिरायला, कधी सिनेमा तर कधी नुसत्याच गप्पा. त्याचे सारखे मनसुबे चाललेले असायचे. मी मुंबईला जाणार, मोठा सर्जन होणार; आणि मी काय करावं हे मला कळायचं नाही! ऍनेस्थेशिया, पॅथोलॉजी असं काहीही मला करत येईल असं तो म्हणायचा, पण मला पेशंटच्या इलाजा संबंधानं काहीतरी करायचं होतं. ऍनेस्थेशियाबद्दल त्या काळात खूप माहिती नव्हती, परंतु कुतूहल होतं. पॅथोलॉजी मात्रअजिबात आवडत नव्हती. तो म्हणाला, "तुला सर्जरी करायची तर माझी हरकत नाही, पण दोघांना सर्जरी करायची असेल तरलग्न, मुलं वगैरे नक्कीच विसरायला लागेल!" म्हणून मी ऍनेस्थेशिया घेतला. मलाही सर्जन व्हायची इच्छा होती. पण वाटायलालागलं, की तो सर्जन होणार असेल तर आपण ऍनेस्थेटिस्ट झालेलं बरं. दोघांना पूरक काम करता येईल.

मला पदव्युत्तर शिक्षण करायला जमेल की नाही अशी भीती वाटायची. कारण माझ्या मनात संसार, आमचं घर, आम्ही दोघंअशी स्वप्नं असायची. बाकी फारसं काही सुचायचं नाही. प्रत्येक वेळी तो मला सांगायचा, की आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे. तुलाही खूप शिकायचं आहे. तुलाही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. आई-काकांचंही म्हणणं पडलं की मी एम. डी.करावं. तो मुंबईला जायला निघाल्यावर मी त्याच्याकडून कबूल करून घेतलं होतं, की त्यानं मला वरचेवर पत्रं लिहायला हवीत. शिवाय वेळ मिळेल तेव्हा पुण्याला भेटायला यायचंही. तिथं गेल्यावर तो कामात इतका अडकला! मात्र मला वरच्यावर सुंदर पत्र  लिहायचा. तरीही मी त्याच्यावर नाखूष असायची. एवढी पत्रं लिहूनसुद्धा मला समाधान वाटायचं नाही. तिथं पोचल्यापोचल्या, त्यानं पत्र लिहिलं. त्यात त्यानं 'ब्रह्मचाऱ्याचा संसार' थाटला असं लिहिलं होतं. तो नीट लावून द्यायलासुद्धा मी त्याला हवी होते. तिथला उगवतीचा सूर्य पाहताना त्याला माझी आठवण होते हे पाहून मी हुरळून गेले.

...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?

सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी,
प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या
तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!