गीतसंगीतांचे ऋणानुबंध

भावगीते भक्तीगीते लागली की मला नेहमी शाळेची आठवण होते. सकाळी साडेसातची शाळा त्यामुळे सहाला उठून गाणी ऐकत ऐकतच आम्ही आमचे सर्व आवरायचो. सव्वासातची बस असायची. माझ्या आईबाबांना गाण्याची आवड असल्याने आमच्याकडे सतत रेडिओ लावलेला असायचा. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, विविध भारतीवर छायागीत, बेलाके फूल हे तर अगदी आठवणीतले. गाण्यांची आवड असलेले सर्वच गाणी ऐकतात. रेडिओ, दूरदर्शन, किंवा गाण्यांच्या कार्यक्रमातून विविध गाण्यांची ओळख होते. त्यातली काही गाणी आवडली की आपण तीच तीच ऐकतो आणि अशातूनच काही गाण्यांच्या आठवणी पण कायमच्या जोडल्या जातात. काही वेळेला गाणे आधी ऐकले जाते व ते गाणे आवडले म्हणून तो चित्रपट आपण पाहतो तर काही वेळेला एखादा चित्रपट पाहिला तर त्यातले गाणे आपल्या मनात कायम घर करून राहते.

 कौसल्येचा राम बाई, रूप पाहता लोचनी, पूर्व दिशेला अरूण रथावर, उठी उठी गोपाळा ही गाणी सकाळी रेडिओवर लागायची आणि थंडी पावसाळ्यात दुलईतून उठणे जीवावर यायचे. असे वाटायचे ही गाणी ऐकत असेच झोपावे, नको ती शाळा!   माझे बाबा सुधीर फडक्यांचे खूप चाहते आहेत. "सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला" व "शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम" ही दोन्ही गाणी ऐकली की मला माझ्या बाबांची आठवण येते. ही गाणी बाबा इतके काही छान म्हणतात कि हुबेहूब सुधीर फडके! पूर्वी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये लाऊडस्पीकरवर गाणी मोठमोठ्यांदा वाजवली जायची त्यातले हे एक गाणे. पुणे सातारा रोडवर मी नोकरी निमित्ताने जायचे तेव्हा सकाळी सकाळी हे गाणे मी बरेच वेळा ऐकलेले आहे. " जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे.. " हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे व मनातल्या मनात गुणगुणायचे. हे गाणे आधी ऐकले व नंतर बेताब पाहिला. मला वाटते की या चित्रपटात गायक शब्बीरकुमार, सनी देओल व अमृतासिंग हे सगळे नवीनच होते. गणपती आणि "होठोमें ऐसी बातमें... " ही जोडी ठरलेली. पूर्वी पुण्यात आम्ही गणपती उत्सवात गणपती पहायला जायचो तेव्हा बाबू गेनू चोकात जो गणपती असायचा त्यावर हे गाणे लायटिंगवर असायचे. त्या फिरत्या लायटिंगवर अगदी तल्लीन होऊन जायचो. कितीही वेळा पाहिले तरी समाधान व्हायचे नाही.

"आखोही आखोमें इशारा हो गया.... " व हम किसीसे कम मधली दहा मिनिटांची मेलडी म्हणजे आमचे कॉलेजचे गॅदरिंग. आमच्या वर्गात एक मुलगा किशोरकुमार फॅन होता आणि आवाजही अगदी सेम किशोरकुमार. त्याचे दुसरे विशेष असे की तो मुलगा व मुलगी दोन्ही आवाजात गाणे गायचा. आँखोही आँखोमें इशारा... हेही असेच दोन्ही आवाजात गायले होते आणि "मै हँ झूम झूम झुमरू बनके.... " हे गाणे आवाजांच्या कसरतीसह म्हणले होते. हम किसीसे कम नही च्या मेलडीवर तिघांनी डान्स केला होता टायकोट घालून. त्यातल्या मुलीला आम्ही नंतर काजलकिरण म्हणायचो. नंतर बरेच दिवस आमच्या मैत्रिणींमध्ये हीच चर्चा की आँखोही आँखोमें कसे काय दोन्ही आवाजात गायले असेल गाणे??

" राधा कैसे न जले... " हे लगानमधले गाणे अगदी न चुकता रोज अमेरिकेतल्या रेडिओवर लागायचे. डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित व्हायची. एक दिवस लागले नाही तरी चुकल्यासारखे वाटायचे. यामध्ये आशाचा आवाज खूपच मधूर आहे. सकाळी उठून रेडिओ ऑन . घरातली कामे करता करता कान मात्र राधा कैसे न जले कडे. आता युट्युबचा जमाना आला आहे. पूर्वी बरेच वेळा ऐकलेली गाणी युट्युबवर पाहिली आणि एक वेगळाच आनंद देवून गेली. त्यातले "निगाहे मिलाने को जी... " हे गाणे पूर्वी बरेच वेळा ऐकले होते पण ते जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हापासून मी या गाण्याच्या प्रेमातच पडले आहे. इतके सुंदर चित्रिकरण आहे. नूतनचे बोलके डोळे, निरागस चेहरा त्यावरील गाण्यांच्या ओळीप्रमाणे केलेले हावभाव. हे सर्व पाहिले की त्या गाण्यामध्ये अगदी तल्लीन व्हायला होते.

आजकालच्या नेटच्या जमान्यात पूर्वीचे ऋणानुबंध संपल्यासारखे वाटतात. रेडिओच्या माध्यमातून गाणी ऐकणे. tape recorder जरी असला तरी आपल्याला पाहिजे असलेली गाणी शोधणे, त्याकरता कॅसेट विकत घेणे. एखादे आवडीचे गाणे एखाद्या कॅसेटमध्ये असले तरी ती पूर्ण कॅसेट विकत घेणे किंवा two-in-one मध्ये रेडिओवर आवडीचे गीत लागले की ते आपल्या कॅसेटमध्ये साठवून घेण्यासाठी अगदी लगच्यालगेच हातातले काम टाकून, play +record एकाच वेळी ऑन करणे. टेपचे ट्युनिंग सेट केलेलेच असायचे. अर्थात अनेक आवडीची गाणी आपण घरबसल्या कितीही वेळा आणि कोणत्याही वेळेला ऐकूबघू शकतो हे मात्र मान्य करायलाच हवे.

हे गाणे जरूर पहा. निगाहे मिलाने को जी चाहता है