तुमचा आमचा गीतकार -शैलेंद्र

प्रत्येक लेखक / कवीच्या लिखाणाला, काव्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. अण्णा माडगूळकरांचे गाणे हे थंडीतल्या भल्या पहाटे  मुकटा नेसून उघड्या अंगाने जानव्याशी चाळा करत कसलेसे स्तोत्र म्हणतच येते (पण असे असले तरी पहाटे पहाटे त्याच्या तोंडात रंगलेले जर्द्याचे पान आहे, बरे का! ) 'राजपुत्रे ते नृपती उद्याचे, शैशव त्यांचे दीनपणाचे,रत्नकंदुकाजागी हाती, मातीची खेळणी' असे काहीसे ते गाणे असते . आपण बाजूला नम्रपणे हात बांधून उभे असतो. काही बोलण्याची छातीच होत नाही. साहिरचे गाणे आसूडाचे कडाडसंगीत वाजवत, गर्जत येते आणि आपल्या मानगुटीला हात घालून आपल्याला खेचून, फरफटत घेऊन जाते. 'मिट्टीका भी है कुछ मोल मगर, इन्सानोंकी कीमत कुछ भी नही' असले काहीतरी ते जहरी शब्द असतात.  कैफी आजमींचे गाणे नजाकतदार शेरवानी पहनून, कानात उंची अत्तराचा फायाबिया ठेवून, हातातल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा खुशबू सोबत घेऊन येते. 'वो जिनको प्यार है चांदीसे इष्क सोनेसे, वहीं कहेंगे कभी, हमने खुदखुशी कर ली' असले ते गाणे आपला एक सलाम घेऊन काहीशा तोऱ्यातच निघून जाते.  आनंद बक्षींचे गाणे मिरवणुकीतला गुलाल उधळत ढिच्यांग ढिच्यांग नाचत येते.'मस्त बहारोंका मौसम था, आंख से आंसू बहते थे...'
शैलेंद्रच्या गाण्याला असला काही बडेजाव लागत नाही. रस्त्याच्या कडेला भाकर तुकडा खाणाऱ्यांतला, कापडाच्या पट्टीसारखा जाड आणि गोडमिट्ट चहा पिणाऱ्यांतला आणि सूत घट्ट पिळून दोन्ही बाजूनी फुंकून कडक बिडी पेटवणाऱ्यांतला एकजण उठतो आणि हातातल्या जर्मनच्या थाळीवर ताल धरत धिनकधिनकतीन धिनकधिनकतीन असे काहीतरी वाजवत काहीतरी गुणगुणायला लागतो. ते शैलेंद्रचे गाणे असते. त्याला गीत वगैरे म्हणण्याचा औपचारिकपणा लागत नाही. 'बागड बुम बुम बुम बाजे डमरू, नाच रे मयूर छनछनाके घुंगरू.... ' असले ते देशी आणि सहज गुणगुणावे तसे गाणे असते.'उड उड बैठी हलवईया दोकनिया, बरफी के सब रस ले लिया रे पिंजडेवाली मुनिया' असे काहीतरी म्हणून ते गाणे नाचत राहाते.  आता परीटघडीचा औपचारिकपणा नाहीच म्हटल्यावर अंगरख्यावरच्या पानाच्या डागांची तरी त्या गाण्याने पर्वा का करावी? 'मलमलके कुरतेपे छींट लाल लाल' असले तर असले! आणि हा सैंया तरी काही कमी खट्याळ आहे का? 'हमनें मंगायी सुरमेदानी, ले आया जालिम बनारस का जरदा' आणि बनारसी जरद्याचा शौक करणारा हा सैंया केंव्हातरी एखादा घोट घेऊनही येत असला म्हणून काय झाले? घेतली तर घेतली! अहो, इथे नशेत नाही कोण? 'किसी को हरे हरे नोट का नशा है, किसी को बूट सूट कोट का नशा है....' किंवा 'जाने भी दो दिलरुबा, जो हुवा, सो हुवा...' आता कशाला पश्चातबुद्धी?
शैलेंद्रचे गाणे असे  अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याला इथल्या मातीचा वास आहे.'कोई ये चाहे माने ना माने, बहुत है मुष्किल गिर के संभलना..' असे साधे तत्त्वज्ञान सांगणारे. आणि हिंदुस्थानी गाणे हिंदुस्थानी माणसासारखेच. त्याच्या वागण्यात कुणी 'लॉजिक' शोधू नये. 'अपने ही बस में नही मैं, दिल है कहीं तो हूं कहीं मैं...' आणि हिंदुस्थानी माणसासारखेच मोकळेढाकळे. मनात आले की बोलून मोकळे 'हमने तो प्यार में ऐसा काम कर दिया, प्यार की राहोंमें अपना नाम भर दिया..' या गाण्यात चंद्राच्या साक्षीने प्रेमाचा इजहार करण्याचे धारिष्ट्य जरुर आहे, पण 'दम भर जो उधर मूंह फेरे, ओ चंदा मै उनसे प्यार कर लूंगी.. ' असे सांगण्याची शालीनताही. आणि अगदी प्रियेला तुझ्याशी नजरभेट झाली आणि मीच नाही तर तूपण अडचणीत आलीस असे सांगण्याचा मोकळेपणा असणारे. आणि  प्रेमभंग जरी झाला तरी 'ये गम ही सही आपसे हम कुछ तो पा गये.. ' असा आशावाद ठेवणारे.
आणि कधीकधी हे गाणे अगदी निराश, हताश झालेले असते. 'अपनी भी क्या जिंदगी है निराली, जहां गये ठुकराये गये, जैसे बोतल खाली...' ही मनाची सैरभैर अवस्था.'तेरी याद में बेखबर, शमा की तरह रातभर, जली आरजू दिल जला...' असे ठसठसणारे मन. 'मेरे किस्मत के खरीदार अब तो आजा...'  एका अंधाऱ्या गल्लीतून दूरवर जाणारा एकाकी आवाज. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत कुडकुडत, थरथरत राहाणारा आवाज आणि हातातला रिकामा पेला..'उनके ही हाथों हाल हुवा ये, बैठे है दिल को थाम...' एका आठवणीच्या आधारावर काढावे लागलेले आयुष्य 'अरमां लिये बैठे है हम, सीनेमें है तेरा ही गम, तेरे दिल से प्यार की, वो तडप किधर गयी...' आता जाऊन जाऊन जाणार कुठे? 'अपने साये से भी लोग डरने लगे, इस जहां में तो कोई हमारा नहीं...' सगळीकडेच हा अंधार 'चल जहां गम के मारे न हो, झूठी आशा के तारे न हो'..
शैलेंद्रचे गाणे म्हणूनच तुमचे आमचे सगळ्यांचे वाटते. ' अजब है दासतां तेरी ये जिंदगी, कभी हसा दिया रुला दिया कभी.. ' हे साधे सोपे शब्द मनाला स्पर्श करून जातात. 'ये भी मुष्कील है तो क्या आसान है.. ' यातला खट्याळपणा आणि 'उपरवाला' या शब्दावरचा श्लेष एक हसरी आठवण ठेवून जातो. 'जीने की चाहत नहीं, मरके भी राहत नही..' ही अस्वस्थता काय किंवा 'जल की मछलिया, जल में है प्यासी, सपनोंके दिन है, फिर भी उदासी.. ' ही उलझन काय, 'तुम तो पराये हो, यूंही ललचाये हो, जाने किस दुनियासे जाने क्यूं आये हो... ' यातली शोख अदा काय किंवा 'जहां हम आके पहुंचे है, वहां से लौटकर जाना, नही मुमकिन, मगर मुशकिल है दुनिया से भी टकराना.. ' हे वास्तवाचे भान काय, 'चाहे नैना चुराओ चाहे दामन बचाओ प्यार होके रहेगा... ' ही केवळ एखादा आशिकच देऊ शकेल अशी खात्री काय किंवा ठोकर खाल्लेल्या आशिकाचा 'हम तो ये समझे के हमने इक पत्थर को पूजा, लेकीन तुमको अपने जैसा नही मिलेगा दूजा.. ' हा आत्मविश्वास काय.. या सगळ्याच मानवी भावनांना सोबत घेऊन आपल्यासोबत चालणारे शैलेंद्रचे गाणे. चुकतमाकत, वेडेवाकडे नाचत, हसत, रडत, कधी आपल्या खांद्यावर हात ठेवून सोबत चालत, कधी हळूच चिमटा काढून पळून जात, कधी पाठीत धपाटा घालत तर कधी आपल्याला  चक्क कुशीत घेऊन  थोपटत'आज कल में ढल गया, दिन हुवा तमाम, तू भी सो जा, सो गयी, रंग भरी शाम' अशी अंगाई गाणारे शैलेंद्रचे गाणे.
आणि असला हा शैलेंद्र आपल्याला कळायला लागला असे वाटते न वाटते तोवर 'केतकी गुलाब जूही चंपकबन फूले... ' असे घन ओथंबून येतात. 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा.. ' असे समूहगीत ऐकू येते. 'घिर के आया है तूफान ऐसा, बच के साहिल का रहना है मुष्किल...' असे एका विरहिणीचे आर्त सूर ऐकू येतात, आणि हा आपल्याला कळू लागलेला शायर किती खोल आहे हे न कळालेलेच राहाते. पण त्याचे एवढे काही नाही. शायर कळो किंवा ना कळो, त्याची गाणी आपल्याभोवती पिंगा घालत असतातच. साधी, तुमच्या आमच्यासारखी सोपी, साधी गाणी.

हा लेख म्हणजे विनायक यांच्या शैलेंद्रवरील उत्कृष्ट लेखाला लिहिलेला प्रतिसादच आहे, पण इतका मोठा प्रतिसाद देण्याऐवजी त्याचा स्वतंत्र लेखच करावासा वाटला. शैलेंद्र यांच्या काही लोकप्रिय गीतांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. पण ही काही शैलेंद्रच्या गाण्यांची जंत्री नव्हे. सहजा जाताजाता आठवलेल्या शैलेंद्रच्या गाण्यातून या कवीला पकडण्याचा हा एक प्रयत्न.