दिवस बिनाकाचे !

 

      दिवसाची सुरवात मंगल प्रभातच्या सनईने होण्याची शकयता माझ्या बालपणी नव्हती कारण रेडिओचा आमच्या घरालाच काय पण आख्या गावाला स्पर्श झाला नव्हता.माझ्या वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी ज्या घरात आम्ही रहायला आलो त्यासमोर असलेल्या दिलखुष हॉटेलमध्ये  एक मोठ्ठा कर्णा बसवलेला ग्रामोफोन (त्यावेळच्या आमच्या भाषेत फोनो) दिवसभर वाजत असे आणि त्यावर " ओ दूर जानेवाले " या एकाच गाण्याचे दळण  दिवसभर चालू असायचे.  माझ्या वडिलांच्या एका स्नेह्याकडेही तसलाच फोनो होता आणि त्यावर " गेला दर्यापार घरधनी " हे गाण ऐकायला मिळायच  त्यानंतर नेहमीच्या प्रथेला अनुसरून वर्षादोन वर्षांनी वडिलांनी दुसरे घर भाड्याने घेतले,त्यात मला आवडणाऱ्या दोन गोष्टी होत्या.एक म्हणजे या घराला माडी होती आणि दुसरे म्हणजे समोरच शंकरराव नावाच्या हरहुन्नरी माणसाचे दुकान होते .वरवर पहायला ते सायकली दुरुस्त करण्याचे व भाड्याने देण्याचे दुकान असले तरी या माणसाला कोणतीही गोष्ट दुरुस्त करायचा नाद होता त्यामुळे त्याच्या दुकानात आणि समोर नाना वस्तूंचा ढीग पडलेला असे त्यामुळे त्याचे दुकान नक्की कोणत्या वस्तू दुरुस्त करण्याचे होते याचा पत्ता लागणे कठीण असे.पण दुरुस्ती करताना किंवा करत नसला तरी त्याच्याकडे असलेल्या फोनोवर दिवसभर तो गाणी लावायचा,आणि ती आमच्या घरी अगदी सहज माझ्या कानापर्यंत पोचत आणि त्या सुरात अभ्यास करत असताना मी गुंगून जात असे.त्या काळात तेथे’"वसंतबहार" "कठपुतली" "तुमसा नही देखा" जनमजनमके फेरे" अशा वेगवेगळ्या सिनेमांची गाणी ऐकायला मिळायची.अर्थात ही त्या त्या सिनेमातली गाणी असल्याचे केवळ काही गाण्यातच त्या सिनेमांची नावे आल्यामुळेच मला कळले होते..

       पण शंकरकृपेने गाणी ऐकायला मिळाली तरी हवी तेव्हां ती ऐकायला मिळत नसत. माझी हौस खऱ्या अर्थाने भागली ती मी पुण्याला शिक्षणाला पुण्याला आल्यावर.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेऊन मी वसतीगृहात रहायला गेलो तेव्हां !जेवणासाठी वसतीगृहाजवळ सहा क्लब होते आणि त्याना जोडून एक मनोरंजन कक्ष होता.त्यात कॅरम.,बुद्धिबळ अशा बैठ्या खेळाचे सामान आणि विशेष महत्वाचे म्हणजे एक माझ्या समजुतीप्रमाणे एक उत्तमपैकी (कारण चांगला रेडिओ मी प्रथमच पहात होतो) रेडिओ ठेवलेला होता..संध्याकाळी जेवल्यानंतर तेथे बसून कॅरम खेळणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे हा मग आमचा संध्याकाळचा कार्यक्रम असे.आणि तेथे माझ्यासारखाच एक  संगीतप्रेमी मित्र  मला मिळाला.तो बार्शीसारख्या आमच्या गावाच्या मानाने शहर म्हणता येईल अशा ठिकाणाहून आल्यामुळे चित्रपटसंगीताचे त्याचे ज्ञान माझ्या कितीतरी पटीने अधिक होते

      एक दिवस संध्याकाळी  प्रफ़ुल्ल (मित्र) म्हणाला "आज बिनाका,तेव्हा जेवण लवकर आटोपून घ्यायला पाहिजे" त्यावेळपर्यंत बिनाका ही काय भानगड आहे हे मला माहीतच नव्हते.आणि  मी त्याला तसे विचारल्यावर तो माझ्याकडे अगदी अविश्वासाने पहायला लागला (हल्ली बाकुगान म्हणजे काय असे मी विचारल्यावर माझा नातू माझ्याकडे असा बघतो.)पण मग खरेच मला काही माहीत नाही हे ध्यानात आल्यावर त्याने मला बिनाका गीतमाला, अमीन सायानी वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या   .त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदाच मी बिनाका गीतमाला ऐकली. आणि त्यानंतर गाणी ऐकण्यासाठी बराच वेळेचा अपव्यय म्हणजे आमच्या दृष्टीने सदुपयोग आम्ही करू लागलो. रेडिओ सिलोनवरील सकाळची फरमाइश आम्ही फर्गसन रस्त्यावरील त्यावेळी असलेल्या कॅफे वेलकम(याचेच बहुधा प्रख्यात होटेल वैशालीत रूपांतर झाले) किंवा दुसऱ्या एका उडिपी हॉटेलमध्ये बसून ऐकायचे तर ,विविध भारतीची दुपारची फरमाइश सुद्धा काही लेक्चरना दांडी मारूनसुद्धा आम्ही ऐकत असू.

           त्याचवेळी त्याच रस्त्यावर "स्वरविहार ’ नावाच्या रेकॉर्ड लायब्ररीचा पत्ता आम्हाला लागला.तेथे त्या वेळी एक किंवा दोन आण्यात एक रेकॉर्ड ऐकायला मिळायची,त्यानंतर काही इराणी हॉटेलात ज्युक बॉक्स आली त्यात मात्र एक गाणे ऐकायला चार आणे लागायचे शिवाय त्यासाठी वसतीगृहापासून बरेच अंतर चालावे लागे त्यामुळे आमचा भर दिवसा जवळच्या हॉटेलातील आणि संध्याकाळी मनोरंजन कक्षातील  रेडिओवरच असे.

     त्यावेळी आमच्यात निरनिराळ्या संगीत दिग्दर्शकाच्या फॅन्सचे गट असत.खर तर त्यावेळी सर्वच संगीत दिग्दर्शक ऐन भरात होते.अगदी शंकर जयकिशनचा सहाय्यक दत्ताराम याने संगीत दिलेला "परवरीश" ही चांगलाच गाजत होता.तर बऱ्याच दिवसांनी सलील चौधरीचा "मधुमती ’ सुपरहिट झाला होता.कल्याणजी वीरजींचा " सम्राट चंद्रगुप्त "ही हिट ठरला होता.नंतर त्यानी आनंदजींच्याबरोबर युती करून संगीत द्यायला सुरवात केली होती.व सध्या त्यांचा "सट्टाबाजार " चालू होता.

      त्याच वर्षी "उषा खन्ना" या एकमेव संगीत दिग्दर्शिकेने ती पहिलीच संगीत दिग्दर्शिका असल्याने -- आम्ही पुरुषप्रधान संस्कृतीच्या खंद्या पुरस्कर्त्यांनी तिची जरी कुचेष्टा केली तरी  तिने जोरात आगमन करून "दिल देके देखो" ची गाणी चांगलीच  गाजवली होती हे मात्र मान्यच करावे लागले कारण दिल देके देखो या गाण्याला आम्ही आरती म्हणून हिणवत असलो तरी ती आरती बरेच दिवस बिनकाच्या पहिल्या पादानवर वाजत होती.ऊषा खन्नानंतर मात्र आनंद घन एवढाच काय तो संगीत दिग्दर्शन क्षेत्रात महिलाप्रभाव !

   नौशाद वर्षातून अगदी मोजक्याच चित्रपटांना संगीत देत होते.त्यांचे बैजू बावरा वगैरे चित्रपट येऊन गेले होते आणि त्यावेळी " मदर इंडिया"चे संगीत देऊन ते बहुधा विश्रांती घेत होते. त्यानंतर त्यांचा "सोनी महिवाल" आला.आणि त्याचबरोबर पार्श्वगायक म्हणून महेंद्र कपूरचा उदय झाला..आजच्यासारख्या सारेगमपाच्या स्पर्धा त्यावेळी नव्हत्या पण सी.रामचंद्र, रवी आणि नौशाद या  संगीत दिग्दर्शकांनी महेंद्र कपूरची अशाच प्रकारच्या कार्यक्रमातून निवड केली होती अशी मौलिक माहिती प्रफुल्लने मला दिली.

 .      ओपींचे "तुमसा नही देखा" आणि "नया दौर" नुकतेच येऊन गेले होते आणि  "सोनेकी चिडिया" आणि "फागुन" त्यामानाने कमी गाजत (आणि वाजत) होते.."सी आय डी " पण अगोदरच येऊन गेला होता. सचिन देव बर्मनच्या सोलवा सालमधील "ऐ अपना दिल तो आवारा " या गाण्याने बिनाकाच्या प्रथम पादानवर जास्तीत जास्त वेळा वाजण्याचा विक्रम केला होता.मदनमोहन मधूनच चमकून जाई.त्या वर्षी त्यांचा ’जेलर " येऊन गेला होता आणि "दुनिया ना माने" मधील एकच गाणे आलटुन पालटुन बिनाकात वाजत होते. तीच गत रोशनची.त्यांचा "अजी बस शुक्रिया" येऊन गेला होता आणि त्यातले "सारी सारी रात तेरी याद " हे एक गाणे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत होते पण ते बिनाकात अगोदरच येऊन गेले असावे.त्यांचा "बरसातकी रात" अजून यायचा होता..

       चितळकर अण्णांचा बहर ओसरल्यासारखे वाटत होते..तरी त्या वर्षी देव आनंदच्या " अमरदीप" चे एक गाणे " देख हमे आवाज " बिनाकात मधे मधे डोकावून जाई पण त्याचा मुखडा " यहुदी"तील "ये मेरा दीवानापन " ची नक्कल आहे असे आमचे मत होते.त्यानंतर अण्णांचे "नवरंग" चे संगीत खूप गाजले.पण "स्त्री" मात्र फारसे भावले नाही.

      चित्रगुप्त,एस. एन. त्रिपाठी, आणि रवी यांचा मध्यममार्ग असे म्हणजे प्रत्येक वर्षी एक दोन चित्रपट आणि त्यात एक दोन बरी गाणी देणे हा त्यांचा प्रघात होता.आमचा गट शंकर जयकिशनचा होता.कारण त्यावेळी त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक चित्रपटातील जवळ जवळ प्रत्येक गाणे  बिनाकात  कोणत्या तरी  पादानावर वाजत असायचे.आणि एकाच वेळी त्यानी चार पाच चित्रपटांना तरी संगीत दिलेले असायचे.त्या  एकाच वर्षी  त्यांचे अनाडी,कन्हैय्या,मै नशेमे हूं,छोटी बहन,लव्ह मॅरेज, शरारत,उजाला इतके  चित्रपट चालू असल्याने बिनाकातील सोळापैकी आठापेक्षाही जास्त गाणी  त्यांच्या चित्रपटातली असत.

      आमच्या मित्रांपैकी एकजण मात्र मदनमोहनचा भक्त होता.तो आम्हाला नावे ठेवून म्हणायचा " काय त्या शंकर जयकिशनचे कौतुक करताय ?एक ऍकॉर्डियन आणि व्हायोलीनचा ताफा यापलीकडे काय वाजवतात ते " त्याच्या मते मदन मोहन च्या संगीतातील गोडवा,दर्द वगैरे शंज च्या संगीतात नव्हता.त्याच्या सांगण्यावरून आमच्या मतात बदल होण्याची शक्यता नव्हती ती गोष्ट निराळी.त्या वर्षी ओ.पी., नौशाद यांचे चित्रपटच न आल्याने त्यांच्या भक्ताना काही बोलायला वाव नव्हता.

      बिनाका गीतमाला न चुकता ऐकायला लागल्यावर त्या वर्षी वार्षिक बिनाकात पहिला नंबर कोणता संगीत दिग्दर्शक पटकावतोय याची आम्हाला चांगलीच उत्सुकता होती.त्याबाबतीत मात्र शं.ज. ने आमची निराशा केली कारण त्यावर्षी(१९५९) पहिला नंबर पटकावला सचिनदांच्या " हाल कैसा है " या आशा आणि किशोरच्या"चलतीका नाम गाडी"मधील गाण्याने.अर्थात तो पिक्चर त्यावर्षी अगदी तुफान करत होता आणि त्यामुळे शं.ज. ने पहिला नंबर न मिळवल्यामुळे जरी आमची निराशा झाली तरी वाईट मात्र वाटले नाही.यापूर्वी मी बिनाका ऐकू लागण्यापूर्वी शं.ज.नी १९५५मध्ये  ’श्री चारसौ बीस"मधील"मेरा जूता है जापानी" या गाण्यासाठी वार्षिक बिनाकात पहिला नंबर मिळवला होता असे प्रफुल्लच्या स्मृतिकोषातल्या माहितीवरून मला समजले..पण मी ऐकायला सुरवात केल्यावर त्यानी आपला शिरस्ता मोडून आणखी दोन वर्षे आम्हाला ते समाधान मिळू दिले नाही.शेवटी १९६१ मध्ये " तेरी प्यारी प्यारी सूरत " ला ते मिळाले पण त्यावेळी आमचा भक्तमेळा फुटला होता.

       त्यावेळी वसंत देसाईंच्या "गूंज उठी शहनाई" ने बिनाका बरीच गाजवली होती. तर खैय्यामसारख्या आमच्या दृष्टीने किरकोळ संगीत दिग्दर्शकाचा " फिर सुबह होगी " बराच गाजत होता..रवीचा "दिल्लीका ठग"ही गाजत होता.तसाच एन.दत्ता यांचा "धूलका फूल" सज्जाद हे नावही आम्हाला माहीत नव्हते आणि ते माहीत व्हायला पुढे बरीच वर्षे जावी लागली.मात्र त्यावेळी अगदी टुकार संगीतकाराच्या संगीतात गोडवा असायचा हे आता त्यांची काही गाणी ऐकायला लागल्यावर समजते.

       केवळ त्याच काळात संगीत देऊन आम्हाला माहीत झालेले संगीतकार म्हणजे आदि नारायण राव.यांनी "सुवर्णसुंदरी " या एकाच चित्रपटाचे संगीत देऊन बिनाकात चांगलीच खळबळ माजवली..त्यातही " कुहू कुहू" ह्या एकाच गाण्यान,त्या चित्रपटात चक्क तेरा गाणी होती  अजूनही शास्त्रीय फिल्मसंगीत म्हटलेकी पहिल्यांदा कुहू कुहू च आठवते.मूळ  दाक्षिणात्य चित्रपटांनाच संगीत देणाऱ्या आदि नारायण रावांचा हिंदी चित्रपटसृष्टीत एवढाच प्रवेश.त्यानी नंतरही "फूलोंकी सेज"या एकमेव हिंदी सिनेमाला संगीत दिलेले आढळते पण तेही काही फार ध्यानात रहाण्यासारखे नव्हते..

    अगदी तसेच नाही तरी त्यावेळी तरी फक्त एका "सारंगा" या चित्रपटाच्या संगीतामुळे लक्षात राहिले ते सरदार मलिक !.हे अनु मलिक याचे वडील हे नंतर कळले.(कदाचित त्यावेळी अनुचा जन्मही झाला नसेल.).त्यानी त्यापूर्वी "आबे हयात"या चित्रपटाला संगीत दिले होते म्हणे.! तसेच इक्बाल कुरेशी हेही फक्त एका "लव्ह इन शिमला" मुळे ध्यानात राहिले.नंतर व पूर्वीही त्यांनी संगीत दिले होते तरीही !  

        त्यावेळच्या संगीत दिग्दर्शकांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाच्या संगीताचा बाज अलगच असायचा.आणि त्यामुळे कोणतेही गाणे ऐकले की हे अमुक एका संगीत दिग्दर्शकाचे असावे असा अंदाज आम्ही करत असू आणि सहसा तो चुकत नसे.

       ज्या संगीतकारांचे एकही गाणे आम्हाला बिनाकात ऐकायला मिळाले नाही असेही काही होते.त्यांची गाणी विविध भारतीवर ऐकायला मिळायची.त्यात एक म्हणजे हन्सराज बहल. कदाचित त्याना चांगले चित्रपट न मिळाल्याचाही परिणाम असेल.तसेच दुसरे एक तसेच संगीतकार म्हणजे हेमंतकुमार.तशी त्यांनी गाइलेली काही गाणी मात्र बिनाकात वाजत आणि गाजतही होती.सोलवा साल "ऐ अपना दिल तो आवारा " आणि सट्टाबाजारमधील "तुम्हे याद होगा "ही त्यातील दोन महत्वाची..त्यापूर्वी "नागिन" ची त्यांनी संगीत दिलेली गाणी खूपच गाजली होती.त्यानंतर पुढे त्यांचे " बीस साल बाद" आणि "साहिब बीबी और गुलाम" आले.

       पुढे काही काळ बिनाका ऐकणे हा एक महत्वाचा कार्यक्रम होता.बिनाकामुळे फिल्मसंगीत ऐकण्याची गोडी लागली आणि नंतर ती शास्त्रीय संगीत ऐकण्यापर्यंत वाढलीही.! पण अजूनही ती गाणी ऐकली की त्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जाग्या होतात..तो चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ्च होता असे म्हणावे लागेल.

      त्यावेळचे फारच थोडे संगीत दिग्दर्शक स्वतः गायचे. एस. डी. बर्मन सी रामचंद्र हे अपवाद ! हेमंतकुमार प्रथम गायकच होते.

त्यामानाने आजकालच्या संगीत दिग्दर्शकांना स्वतः गाण्याची हौस जास्त दिसते.