प्रेम : एक जुनाट गोंधळ

( साधनेच्या / उपासनेच्या प्रत्येक पायरीवर  मनात सतत उद्भवणाऱ्या शंकांचे कोणी  स्वानुभवाने आणि पुराव्यासह खंडण करू शकतो का ह्याचा मी ह्या लेखमालेच्या सहाय्याने शोध घेत आहे {आत्तापर्यंत तरी निराशाच दिसत आहे  इथे शब्दच्छल करणारेच खूप दिसत आहेत , म्हणा साहित्य म्हणजे  शब्दच्छलच दुसरे काय ?? } असो . किमान सर्व शंका एकत्रित तरी करता येतील या लेखांच्या निमित्तने !! )

प्रेम : अध्यात्मात  हा शब्द वारंवार येत राहतो , काही म्हणतात प्रेम ही अवस्था आहे , काही म्हणतात प्रेम हा संबंध आहे , तर काही म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं नि आमचं सेम असत   .

असो . आता प्रेम या जे काही असेल त्याच्या मुळाशी जाऊया:

 कल्पना    करा की  आपण मानववंशाची  तिसरी चौथी पिढी आहेत , अर्थात डार्वीन मानणाऱ्यानीं समजा की आपले पणजोबा  माकड होते , म्युटेशन ने आजोबा निऍडर्थल , बाबा क्रोमॅगनोन आणि आपण होमो सॅपियन सॅपियन असे उत्क्रांत झालो आहोत , इतरांनी समजा की आपली  आज्जी आजोबा " इव्ह- ऍडम " होते !

आता  दोन क्षण शांत पणे विचार करा आणि सांगा की कोणत्याही प्राण्याचे " बेसीक इन्स्टींक्ट " ( मराठी ?? )  किती आणि कोणते ?
 तुम्हाला उत्तर मिळेल (१) अस्तित्व ( एक्झिस्टन्स ) टिकवणे  (२)  प्रजोत्पादन  बस्स या व्यतिरिक्त काही नाही .
( आणखी थोडा सुक्ष्म विचार केल्यास लक्षात येइल की  बे. इन. (२) हा बे. इन. (१) चाच एक छोटा भाग आहे , " घोळक्याचे अस्तित्व टिकले तर माझे अस्तित्व टिकवणे सोपे जाईल "  )

आता वरील दोन्ही कल्पना एकत्र जोडुन पाहा : 

माकडां मध्ये  हे दोन बे. इन. सोडून इतर काही असणे शक्य  नाही   त्यामुळेच त्यांच्यात आई बाबा भाउ बहीण प्रेयसी ( ? ) बायको  असले काही शक्य नाही  ( येथे ती अकबर बिरबलाची गोष्ट आठवली माकडीण अन तिच्या पिल्लाची  )   मग प्रेम हा घोळ कुठे निर्माण होतो ???

तसच ऍडम -इव्ह च्या ष्टोरीतही कुठेही प्रेम असण्याची तिळमात्र शक्यता नाही  , ( ते ऍडम्स ऍप्पल काय आहे हे  सर्व विवाहीत पुरुष विशेषत्वाने जाणतातच     )

थोडक्यात मानवी समाजाच्या पहिल्या काही पिढ्यात प्रेम असणे शक्य नाही , आणि नंतरच्या पिढ्यांनी  बे . इन.  " (१) अस्तित्व ( एक्झिस्टन्स ) टिकवणे,    बे. इन. (२)  प्रजोत्पादन "  हे बोलणे  खूपच कसेतरी वाटते म्हणून त्याला " प्रेम " हा गोड शब्द दिलेला दिसतो .

तात्पर्य : जिथे जिथे तुम्हाला प्रेम हा शब्द दिसेल तिथे तिथे बे. इन. (१) + / - बे. इन. (२)  हाच मुळ अर्थ असल्याचे तुम्हाला दिसेल . आणि जर प्रेम हा शब्द वापरला आहे पण ह्या दोन पैकी काही नाहीये तर असे निश्चीत समजा की तिथे काही " मानसिक  गोंधळ " ( खोपडी में केमीकल लोच्या ) आहे !

( या स्पष्टीकरणात काही लूपहोल्स ( ? ) राहीले आहेत असे वाटत असेल तर चर्चा आहेच पुढे !!)