आठवणीतले गाव -सांगली

एखाद्या गावाशी आपली नाळ बघता बघता जुळते. आणि एखादे गाव वर्षानुवर्षांच्या
सहवासानंतरही अनोळखीच राहते. शांत, हिरव्या गावात बरीच वर्षे काढलेले लोक
आयुष्यात नंतर कुठल्यातरी रखरखीत महानगरात येऊन पडतात आणि आपल्याला नशीब हे
कुठल्या कुठे घेऊन आले हा विचार करत आयुष्यभर तडफडत राहतात. अगदी कोवळे लहानपण,
तारुण्य ज्या गावात जाते ते गाव नेहमी आपले वाटते. पुढे मन निबर झाल्यावर
भाकरी आपल्याला ज्या ज्या गावांत घेऊन जाते त्या गावांना आपण पत्करतो खरे,
पण तिथल्या मातीचा आपल्या मनाला कधी स्पर्शच होत नाही. मग त्या गावांत
आपल्या जुन्या, आठवणीच्या गावाची आठवण काढत नाईलाजाने जगत राहावे लागते.
आवडीच्या गावात शेवटपर्यंत राहायला मिळणे, किमान आयुष्याचा एक मोठा भाग
काढायला मिळणे हे मोठे भाग्यच म्हणायचे. ते सर्वांनाच लाभते असे नाही.
आवडत्या गावांबाबत आपल्या मनात एक मृदू कोपरा असतो. धारवाड-बेळगाव या
गावांना जी.ए.कुलकर्णींनी आपली एकेक पुस्तके अर्पण केली आहेत यावरून त्या
गावांच्या ओलसर आठवणी त्यांचा मनात किती खोलवर रुतून बसल्या असतील याची कल्पना
करता येते. सांगली या गावाच्या बाबतीत माझे थोडेसे असेच झाले आहे. लहानपणी
माझ्या बघण्यातले सगळ्यात मोठे शहर म्हणजे सांगली होते. शहर कसले, थोडेसे
मोठे गावच म्हणायचे. माझ्या राहत्या गावातून धुळीने भरलेल्या, खडबडीत
रस्त्यावरून मोडकळीला आलेली यष्टी खडखडाट करत सांगलीच्या रस्त्याला लागत
असे. त्या डांबरी रस्त्याचेही अगदी फार कवतिक वाटत असे. सांगलीच्या
स्टँडवरची गर्दी, तेथून वेगवेगळ्या, अपरिचित नावाच्या गावांना जाणार्‍या
बसेस, तिथले कँटीन, त्या कॅन्टीनमध्ये मिळणारे दाक्षिणात्य पदार्थ,
स्टॅन्डवरील पुस्तकांचे स्टॉल आणि त्या स्टॉलवरील 'चांदोबा'च्या नव्या
अंकाचे आकर्षण..... हे सगळे मला अगदी कालपरवा घडल्यासारखे स्वच्छ आठवते
आहे. स्टेट ट्रान्स्पोर्टच्या बसऐवजी कधी सिटी बसने सांगलीला गेलो तर एस.टी
स्टॅन्डाऐवजी सिटी पोस्ट या गावातल्या सगळ्यात गजबजलेल्या स्टॉपवर उतरणे
होत असे. खेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या मुलाला सिटी पोस्टवरची गर्दी,
राजवाड्याजवळची दुकानाची रांग, हरभट रोड (हा मुळात 'सर हॅबर्ट रोड' होता
आणि त्याचा अपभ्रंश करत करत सांगलीकरांनी त्याला अगदी चांगला देशी 'हरभट
रोड' करून टाकला अशी वदंता होती), थिएटर रोड, गणपती पेठ अशा रस्त्यांवरची
चकचकीत दुकाने, थेटरे, हॉटेले आणि त्या हॉटेलांतून येणारे तर्‍हेतर्‍हेचे
तोंडात चळ्ळकन पाणी आणणारे वास, रस्त्यावरच्या हातगाड्या आणि त्यांवर
मांडलेली कधी न बघितलेली फळे,बर्फाचे गोळे आणि थंड सरबते विकणार्‍या
गाड्या, रस्त्यांवर खेळणी, मिठाया वगैरे विकणारे लोक हे सगळेच नवीन, न
बघितलेले वाटे. सांगलीत त्या काळात काही सुप्रसिद्ध हॉटेले होती. थिएटर
रोडचे 'कॅफे रॉयल', स्टेशन रोडवरचे 'ग्रीन्स', आणि 'इंदिरा भुवन' ,
स्टेशनसमोरचे 'शारदा भुवन' ही अगदी सहज आठवणारी नावे. नगरपालिकेजवळचे फारसे
प्रसिद्ध नसलेले 'नारायण भुवन' हे माझ्या खास आवडीचे हॉटेल. नंतर स्टेशन
रोडवरच राममंदिराकडे जाण्यासाठी रस्ता वळतो तिथे 'मधुबन' नावाचे हॉटेल
निघाले आणि त्याने बाकीच्या हॉटेलांना जवळजवळ गिळूनच टाकले. दरम्यान
'ग्रीन्स' आणि 'कॅफे रॉयल' ही हॉटेले बंद पडली होती. आता सांगलीत चांगली
कुरकुरीत आणि आतमध्ये चटणी पूड भुरभुरलेली आंबोळी कुठे खावी हा प्रश्न उभा
राहिला. 'मधुबन' चे त्या काळातले दर छातीत धडकी भरावे असे होते. विलिंग्डन
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मसाला डोसा किंवा उत्तप्पा पन्नास पैशाला आणि चहा
वीस पैशाला (तोही उत्तम दर्जाचा!) मिळण्याच्या दिवसात 'मधुबन' चे
सुप्रसिद्ध व्हेज कटलेट दोन की अडीच रुपयांना होते. आता इतक्या वर्षांनंतर
'कॅफे रॉयल' पुन्हा सुरू झाले आहे (आणि दरम्यान काळाच्या अगम्य न्यायाने
'मधुबन' बंद पडले आहे!) जगात 'कॅफे रॉयल' या एकाच ठिकाणी मी 'कढी वडा' हा
पदार्थ खाल्ला आहे. ताकाची कढी आणि बटाटेवडा. 'कॅफे रॉयल' मधल्या या
कढीवड्याला जगात तोड नाही.
बाकी गावात भगवानलाल कंदीचे मिठाई दुकान आणि रेस्टॉरंट जोरात होते.
कंदीच्या गुलाबी लस्सीला एक विवक्षित खुशबू असे आणि तिच्यावर काजूचे तुकडे
मुक्तहस्ताने पेरलेले असत.कंदीच्या दुकानात ताजी मिठाई मिळत असे. 'कलाकंद'
हा जिन्नस मी पहिल्यांदा कंदीच्या हाटेलातच खाल्ला. पण मिरजेचे मार्केट
यार्डातले बस्साप्पाचे हाटेल हे सांगलीच्या कंदीपेक्षा अधिक प्रसिद्ध होते.
बस्साप्पाकडे बर्फी खाल्ली, बालुशाही खाल्ली, खाजा खाल्ला - असली देशी,
आता कुणाला माहितीही नसतील असे पदार्थ अगदी मनसोक्त खाल्ले. खाजा,
बालुशाही, पापडी(तिच्याबरोबर तळलेल्या आणि मिठात घोळवलेल्या मिरच्या!) हे
पदार्थ तेव्हा चांगल्या हॉटेलात मिळतच नसत. पण मिसळीसारखेही हे पदार्थ हॉटेल जितके गचाळ तितके अधिक चविष्ट असत. पटेल चौकात भजी-वडे मिळणारे एक
मोठे हॉटेल होते. अजूनही असेल, मला वाटते. चौकात आले की कांदा-बटाटा भजीचा
खमंग वास येत असे आणि पोट अगदी खवळून उठे. भजी खाऊन तोंड पोळले की
शेजारच्या 'आराम' कोल्ड्रिंक हाउसमध्ये जायचे ते फालुदा प्यायला. शेवया आणि
सब्जाचे बी घातलेला, वर आईस्क्रीमचा तरंगता घट्ट गोळा असलेला दाट,
गोडमिट्ट फालुदा त्या काळात केवळ पाच रुपयांना मिळे. एक रुपया पाच पैसे
सिनेमाथेटरच्य स्टॉलचे तिकिट असण्याचे ते दिवस होते. डी.पी. परांजप्यांचे गुलकंद
आईसक्रीमही फेमस होते. प्रतापसिंह उद्यानासमोर आता असतात तसेच भेळेचे,
वड्याचे गाडे लागलेले असत. त्यातल्या कुलकर्ण्यांचा वडा चवीपेक्षा लहान
आकार आणि मालकाचा उद्धटपणा यांमुळेच अधिक लक्षात आहे. सांगलीत शाकाहारी
खानावळी जोरात होत्या. मांसाहार चोरून करण्याचे ते दिवस होते. 'आवड-निवड'
नावाच्या एका बोळवजा गल्लीत शाकाहारी राईसप्लेट खाणे हे एखादा शौक
करण्यासारखे होते. गावात सदासुख थिएटरसमोर 'रसना' की 'सुरुची' असल्या
काहीशा नावाची एक खानावळ होती. तिथेही जेवण बरे असे.मांसाहार
करणार्‍यांसाठी गावातली 'शिवनेरी' खानावळ प्रसिद्ध होती. सांगली भागातल्या हजारो ब्राह्मणांना नळी फोडायला शिकवल्याबद्दल 'शिवनेरी' ची जाहीर कौतुक झाले पाहिजे. बाहेर मांसाहार याचा अर्थ मटण खाणे इतपतच होता.  घरी अंडेसुद्धा न
चालण्याच्या त्या दिवसांत थिएटर रोडवरच्या 'मध्यांतर' नावाच्या हाटेलात
जाऊन अंडा आम्लेट खाणे ही पर्वणी असे.सांगलीत बरीच जुनी सिनेमा थिएटरे
होती. 'आनंद' हे आधी अगदी पडके, दुर्लक्षित थिएटर होते. तेथे बहुदा मराठी
सिनेमे लागत. त्याचे नूतनीकरण होऊन मग ते एकदमच झकपक झाले.  सतत  सांधेदुखीची  तक्रार  करणारे  एखादे  किरकिरे आजोबा  एखाद्या  दिवशी  ट्रॅक  सूट  घालून,  कलपबिलप  लावून  जॉगिंगला  जाताना  दिसावे  तसे  काहीसे  या  नव्या  'आनंद'  कडे  बघून  वाटत असे.  'सदासुख' हे
गावातले थिएटर पण त्याच्या तिकिटांची बारी आठवली की आजही गुदमरल्यासारखे
होते. जेमतेम एक माणूस मावेल असा तो एक लांबलचक कुबट बोळ होता. 'सरस्वती'
हे एक असेच बकाल थिएटर. तिथे बाजारू, गल्लाभरू सिनेमे लागत. हमरस्त्यावरचे
'पद्मा' ही तसलेच.इंदिरा भुवनसमोरचे 'प्रताप' आणि गावातले हरभट रोडवरचे
'जयश्री' ही तसलेच गचाळ होते. या सगळ्या थिएटरविश्वात पहिली क्रांती झाली
ती 'स्वरूप' या गावाबाहेरच्या थिएटरमुळे. 'स्वरूप' वातानुकूलित होते, भव्य
होते आणि स्वच्छ होते. 'स्वरूप' वर उसळलेली तोबा गर्दी आजही आठवते.
त्यानंतर गावात 'त्रिमूर्ती' हे गोडाऊनसारखे अतिभव्य थिएटर झाले.
'त्रिमूर्ती' हे त्या वेळी त्या भागातले सर्वात मोठे थिएटर होते. पण नुसतेच
मोठे- अगदी भीती वाटावी इतके मोठे, त्याला काही रूप ना आकार. खालच्या
वर्गात बसले की वर छताकडे बघताना गरगरायला होई. पण एकूण चित्रपटांचीच त्या
काळात इतकी चलती होती की हे थिएटरही लोकांनी डोक्यावर घेतले. अमिताभ
बच्चनचे एकूणेक नवीन सिनेमे 'त्रिमूर्ती'ला लागत आणि रसिकांच्या
त्यांच्यावर उड्या पडत. गावात प्रतापसिंह उद्यान, गणपतीचे देऊळ आणि आमराई हीच काय ती विरंगुळ्याची ठिकाणे. प्रतापसिंह उद्यानात कोणे एके काळी सिंहाची संख्या भरमसाट वाढली होती आणि त्या इतक्या सिंहांना पोसणे नगरपालिकेला अवघड होऊन बसले होते. गणपतीचे देऊळ त्या काळात फार भव्य वाटत असे. पण मुख्य आकर्षण असे ते त्या देवळातल्या हत्तीचे. सांगलीचा 'सुंदर' हत्ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. पुढे वृद्धापकाळाने तो गेला तेव्हा सांगलीकरांना घरातला कुणीतरी ज्येष्ठ माणूस जावा तसे दुःख झाले. त्या दिवशी सगळ्या गावाने स्वयंस्फूर्तीने पाळलेला बंद माझ्या चांगला लक्षात आहे.
विलिंग्डन कॉलेज गावाबाहेर, विश्रामबागला होते. हा भाग विलक्षण शांत होता.
दर पाच-दहा मिनिटाला सांगली स्टँडवरुन मिरज मार्केटला जाणारी बस सुटत असे.
रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी आणि एक वाजून पाच मिनिटांनी सुटणारी बस ही खास शेवटचा 'शो' बघायला आलेल्या होस्टेलवासियांची सोय होती. कधीकधी त्या बसेसही  चुकत  असत  आणि  मग  गावापासून  विश्रामबागेपर्यंत  चालत  जावे लागत  असे.  आज ते अंतर आठवले की दडपल्यासारखे होते, पण अशी तंगडतोड  त्या  दिवसांत असंख्य वेळा केली आहे.   बाकी गावात राहणारे विलिंगडनचे बरेच विद्यार्थी सायकलने कॉलेजला येत.
विलिंग्डनचा परिसर हिरवागार आणि स्वच्छ होता. त्या कॉलेजवर एकूणच अभ्यासू
आणि सोज्वळ वातावरण होते. तिथले प्राध्यापकही त्या काळात ऋषितुल्य वाटत
असत. नुकतेच निधन पावलेले प्रा.दिलीप परदेशी मराठी शिकवत. तरुण विद्यार्थ्यांत,
विशेषतः मुलींमध्ये परदेशी सर फार लोकप्रिय होते. एकतर दिसायला ते अत्यंत
देखणे. त्यात त्यांचे कपडे अगदी आधुनिक फॅशनचे आणि महागडे असत. वर्गात
येताना त्यांच्यासोबत सिगरेटचा आणि एखाद्या उंची अत्तराचा मंद वास येत असे.
त्यात त्यांची शैलीदार लेखकाची असावी अशी भाषा. ते होतेच लेखक त्या काळात.
'काळोख देत हुंकार', 'स्वप्न एका वाल्याचे' अशा त्यांच्या एकांकिका त्या
काळात त्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांची पल्लेदार मराठी ऐकताना
त्या काळात तंद्री लागत असे. "क्रांतदर्शी तत्त्वज्ञ, आत्मानुभवी योगी,
भूतदयावादी संत आणि अलौकिक प्रतिभासंपन्न कवी अशा चतुर्विद भूमिकांनी
ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते" किंवा "महानुभाव पंथ म्हणजे
महातेजाने युक्त असा पंथ होय आणि महानुभावीय साहित्य म्हणजे मराठी
साहित्याच्या उगमाला लागलेला निर्मळ रुचिरांचा झराच होय" असली त्यांची
लांबलचक वाक्ये आजही लक्षात आहेत. इंग्रजी विभागातील डिलॉन, खळदकर या लोकांचा भीती
वाटावी असा व्यासंग होता. फिजिक्सचे फडके, गणिताचे कुलकर्णी , केमिस्ट्रीचे गोखले , बॉटनीचे बी. ए. पाटील यांनी शिकण्याची आवड निर्माण व्हावी असे शिकवले. हातकणंगलेकर  त्या वेळी प्राचार्य होते. बोडस,
आगाशे हे उपप्राचार्य. एकूणच सगळीकडे ज्ञान आणि ज्ञानाला दिला जाणारा आदर
असे काहीसे वातावरण होते. विलिंग्डनचे वर्ग जुनाट होते, इमारत दगडी होती  आणि एकूणच या कॉलेजचा चेहरा गंभीर होता. विलिंग्डनच्या समोर वालचंद कॉलेज होते, अजूनही आहे. वालचंद इंजिनिअरिंगचे आणि विलिंग्डन आर्टस आणि सायन्सचे. वालचंदवर मुली जवळजवळ नसतच आणि विलिंग्डनवर सुंदर मुलींची गर्दी असे. विशेषतः आर्टसला. त्यामुळे वालचंदची मुले विलिंग्डनवर 'डोळे शेकायला' येत असत. विलिंग्डनच्या मुलींनाही त्या करीयरिस्ट होऊ घातलेल्या इंजिनिअर  मुलांचे  आकर्षण  वाटत  असे.  आणि  त्यांचे  हे  असले ' आंखो  ही  आंखों  में'  होणारे  इशारे   आम्ही दुसऱ्याच्या हातातले जिलबीचे कडे बघावे तसे बघत असू.
विश्रामबाग हा होस्टेलवासियांचा मोठा आधार होता. तिथे एकदोन हाटेले होती, दोनपाच गाडे होते आणि मुख्य म्हणजे तेथे शीजनला सटालेंचे रसवंती गृह लागत असे. या रसवंती गृहाचे त्या काळात तिथे असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांवर न फेडता येण्याइतके उपकार आहेत. सटालेमामा ताजा रस प्रेमाने देत आणि कितीही वेळा बर्फ मागून घेतला तरी तक्रार करत नसत. या रसवंती गृहात काढलेले तासनतास आणि पोटात उतरवलेला कित्येक लिटर गोड, गार, चविष्ट रस या आठवणीने आज गोड खाता येत नाही याची सल जराशी कमी होते.   
आता सांगलीला जातो तेव्हा त्या गावाची मनाला हाकच येत नाही. आजही आयर्विन
पूल तसाच्या आहे, कंदीचे हॉटेल तेच आहे, कॅफे रॉयलमधला कढी वडा तसाच आहे आणि
विलिंग्डन कॉलेजची इमारतही तशीच आहे. पण या इतक्या वर्षांत मी पार बदलून
गेलो आहे. आज हे शहर मला माझे वाटत नाही, आणि या शहरालाही मी त्याचा वाटत
नसणार. पण 'टायटॅनिक' मधल्या रोझप्रमाणे कधीकधी माझ्या स्वप्नात हे गाव
येते. माझ्या आयुष्यात मला आपले वाटलेले एकमेव गाव - सांगली!