भवन तव उत्तुंग आहे ...

नायकः
भवन तव उत्तुंग आहे आणि अवरत उद्वहन
मी कसा येणार पर्युत्सुक
जरी झालेय मन ।ध्रु।

नायिकाः
वाद्यवृंदाला सवे घेऊन कर तू आगमन
नवरदेवा ये अता छळते मला
तव आठवण ।ध्रु।

नायकः
मी झणी येईन तवप्रीत्यर्थ धावुन स-त्वरण
आणि आरोहीन स्वबलाने तसे शतनिश्रयण

नायिकाः
हृदयवर मम तू तुला अनिवार्य आहे आगमन
सोसणे अनिवार्य अन् मम सर्व चंचल आचरण

नायकः
तीव्र झंझावात अन् घेरे जिवाला विप्लवन
यायचे आहे मला पण करतसे मन व्यभिचरण

भवन तव उत्तुंग आहे आणि अवरत उद्वहन
मी कसा येणार पर्युत्सुक
जरी झालेय मन

नायकः
होत अग्रेसरण तव तेथे घडे मम अनुसरण
जातसे मी कर्षिला जणु चुंबकाप्रत लोहकण

नायिकाः
जात अससी तू कुठे हे अर्धवट मिटुनी नयन
मायकेलाच्या द्विचक्रीखालती होइल दलन

नायकः
तव निकटता दूरतेशी मांडतेय समीकरण
काय ही आश्चर्यकन्या! करत लोचनसंकुचन

बंद आहे मुंबईचे औपनगरिक परिवहन
मी कसा येणार पर्युत्सुक
जरी झालेय मन

दीप विझले सर्व, हे आरंभले भारनियमन
मी कसा येणार पर्युत्सुक
जरी झालेय मन

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

टीपा:

चाल : भाषांतर मूळ गाण्याच्या चालीत नाही. भाषांतराची चाल : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळींच्या शेवटचा उच्चार अन किंवा अण असा उच्चार न करता अन् किंवा अण् असा केल्यास म्हणायला चांगले वाटते.

नायकाचे आणि नायिकेचे ध्रुवपद वेगळे आहे. दरवेळी नायकाच्या ध्रुवपदानंतर नायिकेचे ध्रुवपद म्हणावे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   अन किंवा अण असे जमवा बरका. यमकाची जागा ठळक केलेली आहेच.