असे का?

मनोगतींनो,

मनोगत हे मराठी संस्थळांपैकी आद्य आणि अनेकांचे (अर्थातच माझेही) पहिले प्रेम.

प्रत्येक संस्थळावर सभासद येतात आणि जातात. काही टिकून राहतात, काही नाममात्र राहतात काही निघून जातात अनेक जण केवळ वाचनमात्र राहतात असे सगळे चालूच असते. तरीही मनोगतच्या जुन्या आठवणी अजूनही अस्वस्थ करतात. दादर शिवाजी उद्यानात भरलेला पहिला कटा, नंतर अगदी सभागृह घेऊन जेवणासहित केलेले कट्टे. नव्या ओळखी आणि नवे स्नेहसंबंध. मेतकूट जमल्यावर सदस्यांचे रोज दुरसंभाषण वगैरे वगैरे.

वातावरण काहीसे परिटघडीचे पण निकोप. वाद व्हायचे पण अपवाद वगळता कधी ते वैयक्तिक पातळीवर वा खालच्या पातळीवर गेले नाहीत. अनेक प्रतिभावंतांचे उत्तम साहित्य इथे वाचायला मिळाले. आजही मनोगतवर गेल्याशिवाय दिवस पुरा होत नाही.

मात्र गेले काही दिवस (किंवा वर्षे? ) इथली शांतता अस्वस्थ करणारी वाटते. इतके औदासीन्य का आले असावे?

आज सहज पहिल्या पानाचा (गद्य) आढावा घेतला तर १७ दिवसात केवळ २५ लेख, त्यात दोन कोडी आणि दोन आवाहने. एकूण प्रतिसाद ८५, पैकी कोड्यांना ३८ आणि आवाहनाला ४ म्हणजे २२ लेखांना केवळ ४३ प्रतिसाद! लेखनाचा दर्जा वा विषयाचे महत्त्व प्रतिसाद संख्येवर निश्चित ठरत नसते पण एकेकाळी वाहणारा प्रतिसादांचा झरा असा आटला तरी कसा?

माझ्याविषयी सांगायचे तर मी 'जुने खोंड' या सदरात मोडणारा. आणि म्हणूनच असा प्रश्न पडलेला. कुणी सांगेल का असे का?