नको ते धुम्रपान...

"मे आय कम इन सर?"
"येस."
"सर, आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाईम. आय जस्ट वाँटेड..."
"बसून बोललीस तरी चालेल तू."
प्रोजेक्ट मॅनेजर मराठीत बोलल्याने स्वरुपाला खूप बरं वाटलं.
"सर, मला प्रोजेक्ट बदलून हवा आहे."
"अच्छा. कोणाच्या प्रोजेक्टमध्ये आहे तुला इंटरेस्ट?"
"सर, पण मला प्रोजेक्ट का बदलून हवा आहे ते नाही का विचारणार तुम्ही मला?"
"कारण मला माहिती आहे म्हणूनच विचारतो आहे की ते कारण कोणाच्या ग्रुपमध्ये टळेल अशी तुला खात्री वाटते आहे ते सांग. मी तुला त्या ग्रुपमध्ये टाकतो. मी करेन तुला मदत."
"मालिनी. तिच्याकडचा प्रोजेक्ट इंटरेस्टींग सुद्धा आहे आणि तिच्याकडे मला काहीच प्रश्न नाही काम करायला.."
"तथास्तु बालिके."
धन्यवादादाखल हलकेच हसून अग्गदी आनंदाने कुठलंसं गाणं गुणगुणत स्वरुपा प्रोजेक्ट मॅनेजरच्या कक्षाबाहेर पडली. नेहमीचा तिचा हसरा चेहरा आज आणखीच जास्त खुलला होता. स्वतःच्या जागी परत जाताना मध्येच नेहाच्या जागी थांबून तिच्या डोक्यावर टपली मारत ती तिला म्हणाली,"नेहा, आज दुपारी टेबल टेनिस खेळुया बरं का न चुकता. येशील ना ?"
आश्चर्यचकीत होत नेहा,"हे चक्क तू विचारते आहेस स्वरा? इतके दिवस मी तुला विचारायची आणि तू भंजाळलेल्या अवस्थेत असायचीस आणि उडवाउडवीची कारणं देत नाही म्हणायचीस आणि आज चक्क इतकं परिवर्तन तुझ्यात.. आश्चर्य आहे. काय बढती वगैरे काही मिळाली की काय?"
"छे आत्ताच तर आले आहे या ऑफिसमध्ये. लगेच कुठली आलीये बढती?"
"मग राज क्या है आखिर आपकी इस खुशीका?"
"प्रोजेक्ट बदलून मिळाला मला." आनंदातिशयाने स्वरुपा उद्गारली.
"काऽऽऽय? तुला वेडबिड लागलंय का स्वरा? अगं तू चक्क निखिलचा प्रोजेक्ट सोडलास? आय जस्ट कांट बिलिव्ह धिस.."
"माझाच विश्वास नाही बसत आहे की मी सुटले त्या असह्य त्रासापासून.."
"अगं पण तूच म्हणत होतीस काही दिवसांपूर्वी की तुला खूप नविन शिकायला मिळण्याच्या शक्यता आहेत त्या प्रोजेक्टमध्ये वगैरे. मग?"
"प्रोजेक्ट अप्रतिम आहेच गं पण निखिलचं स्मोकींग.. आऽऽई गं.. काही प्रॉब्लेम आला काम करताना आणि त्याला विचारायला गेलं तर इतका उग्र दर्प यायचा की 'समजावू नको पण स्मोकींग आवर.' असं म्हणायची पाळी यायची अगदी. इतके दिवस केलं मी सहन पण आता जशीजशी डेडलाईन जवळ येते आहे तसं तसं त्याचं स्मोकींग वाढत चाललं आहे. मला काहीही विचारायला त्याच्याकडे जायचं म्हणजे अगदी जीवावर यायचं. आज मिळाली एकदाची त्यापासून सुटका. मालिनी निखिलहून जास्त अनुभवी आहे कामात पण तिचं माझं ट्युनिंग कितपत जमेल हे एक कोडंच आहे, पण ते जमवेन मी. तोही प्रोजेक्ट खूप इंटेरेस्टींग आहे. मग येतेस ना दुपारी?"
"हो."

दिवसभरात ही बातमी अख्ख्या फ्लोअरभर झाली. स्वरुपाने मालिनीशी ओळख करून घेतली होती.

"स्वरुपा, मलाही नाही सहन होत स्मोकींग. तुला तर माहितीच आहे की माझा आता २रा महिना चालू आहे. आधीच मला जबरदस्त त्रास होतो उलट्यांचा आणि त्यात या लोकांचं स्मोकींग म्हटलं की माझे काय हाल होत असतील.."
"खरं आहे गं मेधा."
"मीही मागू का प्रोजेक्ट बदलून?"
"विचारून बघ की. आमच्या ग्रुपमध्ये हवे आहेत कदाचित आणखीन २-३ जणं त्यामुळे तुला छान चान्स आहे."
मेधाही मालिनीच्या प्रोजेक्टमध्ये आली. असेच होता होता स्वरूपा,मेधा वगैरेंप्रमाणे बघता बघता अखिला, रुजुता गौरव आणि आशिष कधी मालिनीच्या ग्रुपमध्ये येऊन दाखल झाले कळलंच नाही.

आणि एक दिवस...

"आनंद, या कोडकंपायलेशनमध्ये ना.." असं बोलत असतानाच रुजुताला 'तो' नकोसा वास आला. होता तो प्रश्न सोडवून घेऊन ती जागेवर आली पण काहीशी उद्विग्नच दिसत होती. दुपारी जेवणातही तिचं लक्ष नव्हतं. तिच्याकडून काही चुका व्हायला लागल्या. ग्रुपमधल्या सगळ्यांकडे लक्ष देणाऱ्या मालिनीला रुजुतातला हा बदल समजायला वेळ लागला नाही. फिरता फिरता एक दिवस असंच तिच्याकडे जाऊन मालिनी," रुजुता, कसं चाललं आहे काम? काही प्रॉब्लेम नाहीये ना?"
एकदम प्रोजेक्ट लीड मागे येऊन ठेपेल अशी कल्पना नसल्याने रुजुता हडबडली.
"अं? नाही.. काही प्रॉब्लेम नाही."
"काहितरी लपवते आहेस. काय झालंय रुजुता?"
"मॅडम, आनंदला स्मोकींगची सवय आहे. त्याच्याकडून डाऊट्स क्लीअर करून घ्यायला नको वाटतं मला अगदी."
"ठीके. मी बघते काय करायचं ते."

"सर, आनंदला निखिलच्या प्रोजेक्टमध्ये टाकता येईल का? तिकडे तसंही प्रेशर नेहमीच जास्त असतं. आनंद छान आहे कामात तसा.",
प्रोजेक्टचं डिस्कशन संपल्यावर मालिनीने धनंजय सरांना विचारलं.
"विशिष्ट नावडीचा ग्रुप बनतो आहे मालिनी तुझा. हे कितपत बरोबर आहे? आवडीनिवडीवर ग्रुप असायला हवा की काम करण्याच्या हातोटीवर? तुझ्या प्रोजेक्टमध्ये ..."
"माझ्या टीम मेंबर्सकडून कुठलीही तक्रार तुम्हाला येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते सर पण त्यांची कुठलीही गैरसोय होऊ न देणे हे बघणंही तर माझंच काम आहे ना. कोणावर अन्याय न करता जर हे होऊ शकत असेल तर काही प्रश्न नसावा, असं मला वाटतं."
"तू याबाबत आधी आनंदशी बोलून बघावंस, असं मला वाटतं. तो काय म्हणतो ते बघ आणि मग आपण काय ते ठरवू." जे काही चाललं होतं त्याला खरंतर धनंजय सरांची मूक संमतीच होती, पण तरीही कंपनीच्या नियमात याबद्दल काही नमूद नसल्याने त्यांना उघड उघड काही करता येत नव्हते.

"मालिनी, मला ग्रुपमधून काढण्याचं कारण कळेल का?"
"ग्रुपमधून काढलं नाहीये तुला आनंद. निखिलच्या ग्रुपमध्ये गरज होती म्हणून तुला तिकडे पाठवलं आहे."
"हा बदल कायमचा आहे, तात्पुरता नाही."
"आनंद.."
"माझ्या कामात काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मॅडम. माझ्या सब लिडींगमध्ये कोणाचे कुठले प्रश्न सुटले नाहीत की माझ्याबद्दल काही तक्रार?"
"स्पष्टच सांगायचं तर तुझ्या कामाबद्दल मला नितांत कौतुक आहे, आनंद पण तुझ्या धूम्रपानामुळे इतरांना तुझ्याशी संवाद साधणं कठीण होऊन बसतं. तुला आनंद ( ! ) मिळत असला तरी इतरांना खूप त्रास होतो या गोष्टीचा."
"म्हणून चक्क मला ग्रुपमधून काढून टाकायचा निर्णय घेतला? छान ! उत्तम !"
"ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुला रहायचं असेल तर ऑफीसच्या वेळांमध्ये धूम्रपान करणं पूर्णपणे बंद करावं लागेल तुला. चालेल का?"
"हो चालेल. हा खूप महत्वाचा प्रोजेक्त आहे माझ्यासाठी. मला नाही सोडायचा हा."
"ग्रेट ! तू याच प्रोजेक्टमध्ये राहशील मग. काहीच प्रश्न नाही." मालिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

होताहोता मालिनीच्या ग्रुपने हाताळलेले प्रोजेक्ट्स कंपनीत बक्षिसं पटकावत होते आणि सर्वांच्या कौतुकाचा विषय बनत गेले. तिच्या ग्रुपमध्ये काम करायला मिळावं म्हणून कित्येक जण प्रयत्न करायचे पण 'ऑफीसच्या वेळांमध्ये धूम्रपानास पूर्ण बंदी.' हा तिच्या ग्रुपचा अलिखित नियमच बनल्याने इतर तांत्रिक मुद्द्यांबरोबरच हाही एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता तिच्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवायचा !

- वेदश्री.