जास्तीत जास्त प्रतिसादः हमखास युक्त्या

रसिक वाचक मंडळी(हे म्हणजे उग्गाच हं! रसिक असती तर हा 'रिटन बिलो' पाल्हाळीक लेख वाचत बसली असती का? !!),


मनोगतावर (प्रतिसाद देणे याव्यतीरिक्त) लेखन तुम्ही आम्ही सर्व कधी ना कधी करतोच/केले असेलच. लिखाण लिहील्यानंतर दर १-२ तासांनी मनोगत उघडून बघून आपल्या लिखाणापुढे 'प्रतिसाद' या सदराखाली जास्तीत जास्त आकडा आणि सारखे 'नविन' असा हिरवा शब्द वाचण्यात किती आनंद असतो हे मी मनोगतींस सांगणे नलगे. तर आता आपण बघूया आपल्या लिखाणाला जास्तीत जास्त प्रतिसाद कमवण्याच्या हमखास यशस्वी युक्त्याः


१. व्यासंगपूर्णः
या प्रकारात मोडण्यासाठी तुमचा दांडगा अभ्यास आणि स्मरणशक्ती असावी लागते.१८९८ साली दिल्लीत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा अहवाल, वेदातील अमुक एक पानावरील तमुक एका ऋचेचा खालून दुसरा चरण, बोलिव्हियाचा इतिहास, रसायनशास्त्रातील जटील अभिक्रिया, अमक्या एका संगीताबद्दल सखोल माहिती, तमकी एखादी करायला भयंकर कठीण आणि आपण सामान्यतः विकत घेऊन खात असलेल्या पदार्थाची पाककृती, एकाच पदार्थाच्या अनेक प्रकारे पाककृत्या, अमक्या शब्दकोषाच्या तमक्या पानावरील दुसऱ्या स्तंभातील वरुन १८ वा शब्द, १९२४ ला झालेला भारत-युगोस्लाव्हिया हॉकी सामना व त्यातले खेळाडू,अमक्या वृत्तातील सातवी मात्रा, अशा काही बहुजनांना अवगत नसलेल्या माहित्या मुखोद्गत असाव्या लागतात आणि त्या योग्य वेळी अधून मधून टाकता याव्या लागतात. या प्रकाराला येणारे प्रतिसाद हे 'भक्ती' या भावनेतून आलेले असतात. एखादा बहिरा भाविक भक्त 'म्हाराजांची लीला म्हान हाय' हे भाव ओतप्रोत डोळ्यात घेऊन महाराजांच्या किर्तनाला बसलेला असतो आणि दाद देत असतो तसे. या प्रतिसाद 'रँकर' वर्गात मोडायला(हे असं मोडताना प्रत्येक वेळी काडकन आवाज येतो का हो?) आणि मोडत रहायला खूप मोठी तपस्या लागते. त्यामुळे सामान्य बहुजन मनोगती सामान्यतः या प्रकारात मोडायचा प्रयत्न करत नाहीत.


२. भावनात्मकः
या प्रकारात आपली मैत्रिण/मित्र/नातेवाईक/गुरु/शेजारी याबाबतचा एखादा हृद्यस्पर्शी(म्हणजे, बोलीभाषेत म्हणायचं तर 'गपकन हृद्याला हात घालणारा' प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी लागते. प्रसंग शक्यतो सामान्य जीवनातला आणि कोणालाही लागू होईल असा असावा. 'या कथेतल्या पात्राच्या जागी मी/माझी आई/वडील/बहिण/मित्र/बायको/नवरा' असता/असती तर' या काल्पनिक दुःखाने वाचकांच्या डोळ्यात कचकन(अरेच्च्या! विशेषण चुकलं वाटतं, 'टचकन' बरं का!) पाणी आलं की ते पाणी निपटत प्रत्येकी एक प्रतिसाद टंकीत झालाच म्हणून समजा!


३. वादग्रस्तः
या प्रकारात मोडण्यासाठी मनोगतावरील चर्चांचा अभ्यास लागतो. कोणता मुद्दा कोणाचा मर्मबिंदू आहे आणि या मर्मबिंदूवर किमान १५ ओळी प्रतिसाद दिल्याशिवाय तो मनुष्य राहूच शकत नाही हे निरीक्षण लागते. तसेच जो मुद्दा आपण चर्चेसाठी ऐरणीवर घेणार तो शक्यतो कोणताही मधला मार्ग(आम्हा गुंड लोकांच्या भाषेत याला 'मांडवाली' असं म्हणतात, पण मनोगतावर आमचा 'सभ्यपण बुरखा' असल्याने तूर्तास आपण हा शब्द बाजूला ठेऊ.)निघून एकमत होऊन 'पंक्चर' होणार नाही असाच असावा. (उदाः आधी कोंबडी की अंडे?, गांधी की गोडसे?)एकदा हा विषय चर्चा म्हणून मांडायचा, आपण कोणत्या बाजूला आहोत हे चर्चेत सुरुवातीला स्पष्टपणे कळू द्यायचे नाही आणि मग मनोगतावरील विद्वानांची जुंपलेली साठमारी बघत बसायची. अधून मधून येऊन एखादा प्रतिसाद टाकायचा , अन्यथा 'इतरांची जुंपवून हा गृहस्थ पळून गेला' अशी नाडी ओळखून ती ओढली जाते.


३. भाषांतरः
हा प्रतिसाद जमवायचा सर्वात सुरक्षित आणि राजमार्ग आहे. यात मुख्य कौशल्याचा भाग म्हणजे योग्य कथेची निवड. एकदा ती जमली की मग पुढचं जमत जातंच! खाली 'अमक्या कथेचा स्वैर अनुवाद' लिहीलं की बाकीचे संभाव्य धोके टळतात. पण शक्यतो ते लिहू नये, म्हणजे दुरुस्त्या सुचवण्याने आणि सुचवणाऱ्यांचे एकमत न झाल्याने प्रतिसादसंख्या आपसूक वाढते. नंतर प्रत्येकाच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आपले प्रतिसाद मध्ये मध्ये कोंबून संख्या आणखी घसघशीत करता येते.


४. शुभेच्छाः
आपल्यापाशी लिखाणाला जास्त वेळ नसेल तर प्रतिसाद मिळवण्याचा हा चांगला व सात्विक मार्ग आहे. पण यालाही थोडाफार अभ्यास लागतो. विशीष्ठ दिवसाचे महत्व, मनोगतींपैकी कोणालातरी मिळालेला पुरस्कार,इतिहासातील व्यक्तींचे वाढदिवस याची वेळोवेळी नोंद ठेवावी लागते. जमल्यास आपल्या भ्रमणदूरध्वनीसंचाच्या स्मरणवहीत गजरासहीत त्या दिवसाचे स्मरण टाकून ठेवावे. अमुक एक दिवसासाठी द्यायच्या शुभेच्छा आधीच तयार करुन अप्रकाशित ठेवाव्यात आणि बरोबर शून्य वाजता उठून त्या प्रकाशित कराव्यात, कारण अन्यथा जगाच्या तिसऱ्याच कोपऱ्यातून चौथेच कोणी आपल्या आधी शुभेच्छा देऊन टाकते आणि आपल्याला त्याची प्रतिसादसंख्या वाढवून 'मम' म्हणावे लागते.  


५. संगणक तंत्रज्ञानः
याप्रकारात मोडायला तुम्ही संगणकाला चिकटून कायम संगणकावर प्रयोग(घरच्या नव्हे, कचेरीतल्या संगणकावर!)  करणारे लागता. अमूक मराठी टंकलेखन अक्षरप्रणाली, तमूक संगणकीय विषाणूमारक, ढमूक ब्राऊजर कुठे मोफत मिळतात याची तुम्हाला माहिती असावी लागते. मनोगतावर तुमचे महत्व देवांचा वैद्य अश्विनीकुमारांइतके वाढते आणि भलेभले तुम्हाला शरण येऊन आपल्या संगणकावर मनोगताला होणारे आजार कथन करतात. प्रतिसाद मिळवण्याचा हा प्रकार अत्यंत आदराने पाहिला जातो. 


६. कंपूबाजीः
या प्रकारासाठी आवश्यक तपस्या म्हणजे सतत मनोगतावर पडिक असणे आणि जास्तीत जास्त जणांशी व्य. नि., निरोपक, दूरध्वनी याद्वारे संपर्कात असणे. तसेच एक शब्द का होईना, पण मनोगतावरील प्रत्येक लिखाणप्रकाराला आवर्जून प्रतिसाद देणे. व्य. नि. मधून आपल्या ओळखी नीट वाढवून प्रत्येकाशी जिव्हाळ्याची नाती जोडणे. 


७. अश्लीलताः
सर्वात जास्त प्रतिसाद मिळवून देणारा हा यशस्वी मार्ग आहे. पण ही एक दुधारी तलवार आहे. 'साप मेला पाहिजे पण लाठी तुटली नाही पाहिजे' याप्रमाणे 'प्रतिसाद मिळवण्यासाठी पुरेसे अश्लील पाहिजे पण प्रशासकांनी लिखाणाला कात्री लावण्याइतके अश्लील नको' हा सुवर्णमध्य नीट जमल्यास भरपूर प्रतिसाद मिळतात. शक्यतो अश्लील वाक्याचा एक 'बॅक अप' सभ्य अर्थ काढून तो तयार ठेवावा. प्रतिसाद पुरेसे जमल्यावर तो अर्थ सांगून आपली कॉलर पांढरी करता येते. (म्हणजे पुन्हा तीनचार महिन्यांनी परत याच युक्तीने प्रतिसाद मिळवता येतात व लोकांकडून 'नेहमीचं आहे हे' किंवा 'दुर्लक्ष' असे प्रतिसाद येऊन लोकप्रियता कमी होत नाही.) 


(प्रस्तुत लेखिका कोणती युक्ती वापरते हे  गोपनिय आहे. प्रस्तुत लेखाचे आणि कविता खपल्या! आणि तुम्हाला प्रसिद्ध व्हायचेय? या लिखाणांशी साम्य आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. (कशाचीतरी सन्माननीय नक्कल  करायची असल्यास ही ओळ न चुकता वापरावी.))