मनोगत - आर्थिक बाजू

नमस्कार,


मनोगत माझ्याकरता (आणि आपल्यातील खूप जणांकरताही) सतत, वारंवार भेट देण्याचे संकेतस्थळ झाले आहे. मी मनोगत कडे फक्त मनोरंजन किंवा प्रबोधनाचे किंवा वेळ घालवण्याचे एक साधन म्हणून पहात नाही; तर मनोगत मला 'ह्या महाजालाच्या युगात मराठीचे काय होईल?' ह्या प्रश्नाचे उत्तर वाटते.


मराठीतील आजचे, उद्याचे लेखक, कवी येथे तयार होताहेत. शब्दभांडार सारख्या प्रकल्पांना व्यासपीठ लाभते आहे. महाजालात मराठी लिहिणे, वाचणे सहज शक्य झाले आहे. मराठी शब्द वापरण्याचा आग्रह धरला जातोय आणि कित्येक शब्द मनोगतींच्या लिहिण्याबोलण्यात चांगलेच रूळले आहेत.


मराठीचे महाजालावरील भविष्य निर्मिल्याबद्दल मनोगतकारांचे हार्दिक अभिनंदन!


मग आपल्या 'मनोगत' साठी आपण काही योगदान द्यायचे का? माझा रोख 'आर्थिक बाजू' च्या दिशेने आहे.


मला असे म्हणायचे आहे -


१. हे संकेतस्थळ बनवण्यासाठी आणि चालवण्यासाठी काही खर्च नक्कीच आला-येत असेल.


२. मनोगत वर जाहिराती नाहीत. पॉप अप खिडक्या नाहीत. मनोगत मनोगतींची वैयक्तिक माहिती नक्कीच कोणाला विकत नसेल.


३. म्हणजे, हे संकेतस्थळ कोणीतरी आपल्या वैयक्तिक खर्चाद्वारे चालवत आहे.


४. मग आपण मनोगतींनी ह्या खर्चात आपला वाटा उचलावा का?


५. कित्येक मुक्तस्त्रोत प्रकल्प उपयोजकांच्या (मायक्रोसॉफ्ट चा user साठीचा प्रतिशब्द!) आर्थिक मदतीवर चालतात. मग त्याच तत्वावर 'मनोगत' चालू शकते ना!


तुम्हा सर्वांच्या (आणि प्रशासकांच्या) प्रतिसादांची वाट पहात आहे,


- चैतन्य.